ई श्रीधरन : जवळपास अडवाणींच्या वयाचे असलेले 'मेट्रो मॅन' आता भाजपमध्ये जाऊन काय करणार?

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून

राजकारणाविषयीचा दृष्टीकोन काळानुरूप बदलत असतो. ताजं उदाहरण आहे 89 वर्षांच्या ई. श्रीधरन यांचं. त्यांना भारताचे 'मेट्रो मॅन' म्हणूनही ओळखतात.

तंत्रज्ञानाचे उत्तम जाणकार असलेले ई. श्रीधरन यांनी तब्बल 6 दशकं सेवा बजावली आणि आपल्या कामातून राजधानी दिल्लीत बसलेल्या 'पॉवरफुल' राजकीय वर्गाला माझ्या कामात हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा कडक संदेशही दिला.

त्यांच्यासाठी काम सर्वोच्च होतं.

दिल्ली मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं त्याकाळात ते आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी डेडलाईन आखून द्यायचे आणि कर्मचाऱ्यांना सतत या डेडलाईनची आठवण करून द्यायचे.

आपल्या प्रत्येक कामात त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि थोडक्यात सांगायचं तर लखनौ ते कोचिनपर्यंत देशातल्या अनेक शहरात मेट्रोचं जाळं विणण्याचं काम त्यांनीच केलं आहे.

इंजिनिअरिंग प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी वेळेत काम पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक अधिकारी अशी स्वतःची प्रतिमा तयार केली. याच प्रतिमेमुळे त्यांचे पंतप्रधान कार्यालयाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाल्याचंही बोललं जातं.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, "त्यांनी काम करून दाखवलं, यात शंका नाही. मात्र, ते एक असे अधिकारी होते जे कुणाचंच ऐकायचे नाही."

याच कारणामुळे ई. श्रीधरन इंडियन रेल्वे इंजीनिअर सर्व्हिसचे (IRES) सदस्य असूनही त्यांना भारतीय रेल्वेमध्ये काम न देता मेट्रो प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली.

राजकारणातली बदलती भूमिका

जवळपास 18 महिन्यांपूर्वी ई. श्रीधरन दिल्लीतल्या बीबीसीच्या कार्यालयात येऊन गेले. त्यावेळी राजकारणात जाण्याचा तुमचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

मात्र, 'राजकारण माझा प्रांत नाही', असं उत्तर त्यांनी त्यावेळी बीबीसी हिंदीचे डिजीटल एडिटर राजेश प्रियदर्शी यांना दिलं होतं.

केरळमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर बीबीसी हिंदीशी बोलताना ई. श्रीधरन म्हणाले, "त्यावेळी मला खरंच राजकारणात यायचं नव्हतं. मी तंत्रज्ञानाशी संबंधित व्यक्ती आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांचा इन्चार्ज होतो. त्यामुळे मला राजकारणात यायचं नव्हतं. मात्र, आज मी माझ्या सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि म्हणूनच मी राजकारणात येण्याचा विचार केला."

ज्याप्रमाणे राजकारणाविषयी ई. श्रीधरन यांचे विचार बदलले त्याच प्रमाणे कदाचित 75 वर्षांहून अधिक वयाच्या नेत्यांनी निवृत्त व्हावं, हा विचार भाजपने बदलला असावाा.

भाजप त्यांचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर वरिष्ठांना मार्गदर्शक मंडळाचे सदस्य मानतात. हे सर्व ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या राजकारणात भागही घेत नाहीत. मात्र, ई. श्रीधरन वयाने मुरली मनोहर जोशी यांच्याहूनही ज्येष्ठ आहेत.

केरळचे भाजप नेते आणि परराष्ट्र राज्यमंत्री. व्ही. मुरलीधरन म्हणतात, "त्यांच्या वयाची सर्वांनाच कल्पना आहे आणि आम्हाला आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून ई. श्रीधरन यांना तिकीट देऊ नये, असे कुठलेही निर्देश नाहीत. आमच्याच पक्षाचे ओ. राजगोपाल गेल्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांचं वय 85 वर्ष होतं."

भाजपच्या या नियमाला आणखी एक व्यक्ती अपवाद आहेत आणि ते आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा. येडियुरप्पा या महिन्यात वयाची 78 वर्षं पूर्ण करत आहेत.

मुरलीधरन सांगतात, "लोक श्रीधरन यांना वेगळ्या नजरेने आणि येदीयुरप्पा यांना वेगळ्या नजरेने बघतात. श्रीधरन यांनी वयाच्या 80व्या वर्षी दिल्ली मेट्रो प्रकल्प पूर्ण केला आणि आजही लोकांना त्यांचा फायदा होईल."

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे प्रशंसक असल्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं ई. श्रीधरन यांनी यापूर्वीच बीबीसी हिंदीला सांगितलं होतं.

फारसं राजकीय समर्थन नाही

तंत्रज्ञानात पारंगत असल्याने त्यांची तुलना देशातल्या दोन सर्वोच्च तंत्रज्ञांशी केली जाते. पहिले सॅम पित्रोदा ज्यांनी देशात दूरसंचार क्रांती आणली आणि दुसरे डॉ. वर्गिस कुरीयन ज्यांनी अमूल डेअरीच्या माध्यमातून श्वेत क्रांती आणली.

या सर्वांनाच राजकीय समर्थन होतं आणि त्यांच्या योगदानाला जनतेनेही पावती दिली होती. मग ते दूरसंचार असो, श्वेत क्रांती किंवा नागरी परिवहन.

मात्र, श्रीधरन या दोन तंत्रज्ञांपेक्षा जरा वेगळे आहेत. श्रीधरन रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच आयएएस अधिकाऱ्यांनाही सोबत ठेवायचे. एकदा तर श्रीधरन यांना भाजप आणि भाजपच्या ताकदवान नेत्यांचा सामनाही करावा लागला होता.

याविषयावर स्पष्टीकरण देताना ई. श्रीधरन म्हणाले, "त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊ नये, असं मी कधीही म्हटलेलं नाही. मी एवढंच म्हणालो होतो की, मी राजकारण्यांना माझ्या कामात हस्तक्षेप करू देणार नाही. त्यावेळी मेट्रो कुठे बनणार, स्टेशन्स कुठे असतील, कंत्राट कुणाला मिळेल, असे बरेच विषय होते."

एका अधिकाऱ्याने सांगितलं, "त्यांना अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह यांच्यासारके पंतप्रधान आणि शीला दीक्षितांसारख्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता."

प्रतिष्ठित कोकण रेल्वेचं काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच तत्कालीन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस कन्स्ट्रक्शन साईटवरून बंगळुरूला गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीलगत सर्व राज्यांना जोडण्यासाठी मोठ-मोठे डोंगर फोडण्यात आल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं.

ते म्हणाले होते, "हे सर्व या असामान्य व्यक्तीमुळे घडतंय. त्यांचं नाव आहे ई. श्रीधरन. या सर्व राज्यातली जनता आता 760 किमीचा प्रवास रेल्वेने अत्यंत स्वस्त दरात करू शकतील."

त्यावेळी फर्नांडिस यांनीच श्रीधरन यांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाढवली होती. 58 वर्षांचे झाल्यानंतर ते रेल्वेतून निवृत्तीची तयारी करत होते. त्यांना निवृत्त व्हायचं होतं. मात्र, रेल्वे मंत्र्यांच्या दबावामुळे रेल्वेला त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागला.

सात वर्षांनंतर श्रीधरन यांनी सागरी किनाऱ्याला लागून रेल्वे कनेक्टिव्हिटी दिली. यात केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रापर्यंत 179 मोठे पूल आणि 190 बोगदे उभारण्यात आले.

रेल्वेने दिला धडा

कोकण रेल्वेआधी ई. श्रीधरन यांनी अशक्य असणारी एक कामगिरी बजावली होती. त्यांनी पम्बन पूल बांधला होता. तो पूल पडला खरा. मात्र, रामेश्वरमला तामिळनाडूच्या मुख्य भूभागापासून अवघ्या 50 दिवसात जोडून देण्याचं काम त्यांनी करून दाखवलं होतं. यासाठी त्यांना रेल्वे मंत्र्यांकडून पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

60 च्या दशकातली ही गोष्ट. 70 च्या दशकात भारतात मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव आला आणि हे काम श्रीधरन यांना सोपवण्यात आलं.

90 च्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपचे मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांनी दिल्ली मेट्रो प्रकल्पासाठी त्यांची निवड केली. हा प्रकल्प काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे नेला. इतकंच नाही तर भाजपचे विरोधी पक्षनेते मदनलाल खुराना यांच्या प्रत्येक हल्ल्यापासून त्यांचा बचाव केला.

त्यावेळी भारतात मेट्रोचे फारसे एक्सपर्ट नव्हते. त्यामुळे दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात त्यांना बऱ्याचशा परदेशी सल्लागारांची मदत मिळाली. यातल्या अनेक सल्लागारांनी श्रीधरन यांना 'कडक शिस्तीचे अधिकारी' म्हटलं होतं. तर एकाने टीव्हीवर त्यांना चांगल्या अर्थााने 'गॉडफादरही' म्हटलं.

पत्रकार शेखर गुप्ता यांना दिलेल्या एका मुलाखतीत ई. श्रीधरन यांनी आपल्याला एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा उत्तम पगार मिळत असल्याचं सांगितलं होतं. त्यांचा पगार होता 38 हजार रुपये.

ते म्हणाले होते, "मी एखाद्या खाजगी कंपनीत असतो तर यापेक्षा 50-60 पट जास्त पगार कमावला असता. मी तक्रार करत नाहीय."

मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर ई. श्रीधरन नियमित मेट्रो स्टेशनवर जायचे आणि तिथल्या पायऱ्यांना हात लावून हे का स्वच्छ नाही, असा जाब विचारायचे.

मात्र, दिल्ली बाहेरच्या मेट्रोच्या भिंतीवरही कुणी पान थुंकायचं नाही. हे बघून दिल्ली बाहेरच्या लोकांना जास्त आश्चर्य वाटायचं.

या सर्व कारणांमुळे 2009 सालच्या जुलै महिन्यात बांधकाम सुरू असलेला मेट्रोचा पूल पडल्याची घटना घडूनही लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही.

भाजपमध्ये गेल्याने काय होणार?

एका भाजप कार्यकर्त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, "कठोर शब्दात सांगायचं तर इतकी वर्ष स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केल्यानंतर श्रीधरन यांना आता राजकारणात जायला नको होतं. त्यांचा अनुभव बघता त्यांनी राज्यसभेत असायला हवं होतं आणि देशातल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यायला हवं होतं."

या टीकेवर एका ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया देत म्हटलं, "या टीकेवर आम्ही काय बोलायचं. हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार आहे. ते विधानसभा लढवण्यास इच्छुक असतील तर चांगलंच आहे."

राजकीय विश्लेषक आणि एशियानेट नेटवर्कचे एडिटर-इन-चीफ एम. जी. राधाकृष्णन बीबीसीशी बोलतानाना म्हणाले, "भाजपसाठी श्रीधरन चांगला चेहरा आहे. प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण आहे आणि आपण लोकांना काही देऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. आता भाजप केरळमध्ये त्यांचा वापर कसा करणार, हा अवघड प्रश्न आहे."

या सर्व घडामोडींची एक विचित्र बाजू अशी की श्रीधरन सारख्या व्यक्तीला कसं हाताळायचं, हे राजकारण्यांना ठाऊक नाही. टी. एन. शेषनच्या बाबतीत जे घडलं अगदी तसंच. टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयुक्त असताना राजकारण्यांना धडकी भरवली होती.

योगायोगाने टी. एन. शेषन आणि ई. श्रीधरन दोघेही शाळा आणि कॉलेजमध्ये सोबत होते. पुढे दोघांनी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, पुढे शेषन यांनी इंजिनिअरिंग सोडलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)