सचिन-लता मंगेशकरांना भाजपने ट्वीट करायला सांगितले? देवेंद्र फडणवीस म्हणतात...

शेतकरी आंदोलनासंदर्भात गायिका लता मंगेशकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी केलेले ट्वीट्स वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

या सेलिब्रिटींना ट्वीट करण्यासाठी भाजपनं प्रवृत्त तर केलं नाही ना, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. राज्याचा गुप्तहेर विभाग या ट्वीट्स प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला.

आम्ही ट्वीट करायला सांगितलं असेल तर अभिमान आहे - फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "टूलकिटविरूद्ध लतादीदी आणि सचिन तेंडुलकर यांनी काय ट्वीट केलं, तर #IndiaAgainstPropoganda आणि #IndiaStandsUnited. मग त्यांनी काय शेतकऱ्यांच्या विरोधात ट्वीट केलं का? या देशात #IndiaStandsUnited म्हणणं चूक आहे का? कुणीतरी उठतं, गृहमंत्र्यांकडे जातं."

"एक मिनिटाकरता असं समजू, की हे मी करायला लावलं. मग काय गुन्हा केला? माझ्या देशाच्या विरुद्ध जर प्रपोगंडा होत असेल आणि मी या देशातल्या सेलिब्रिटींना सांगितलं की आपल्या देशाच्या बाजूने उभे राहा, तर यात कसला गुन्हा आहे? तुमच्या चौकशांना घाबरत नाही. कितीही चौकशा करा," असं फडणवीस पुढे म्हणाले.

आमच्या देशाबद्दल जर कुणाला ट्वीट करायला सांगितलं असेल, तर आम्हाला अभिमान आहे, असंही फडणवीस म्हणाले.

भाजपच्या आयटी सेलची चौकशी - अनिल देशमुख

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशी करणार असल्याचं नाकारलं. त्यांनी म्हटलं, "लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर यांची कोणतीही चौकशी करण्याचं आम्ही बोललो नाही. एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी झाली. त्यातून 12 लोकांची नावं पुढे आली. त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे."

भाजपच्या आयटी सेलने जे ट्वीट केले, त्याबद्दल आम्ही चौकशी लावली आहे, असंही देशमुख पुढे म्हणाले.

मात्र, यानंतर फडणवीस म्हणाले, "मी आभार मानतो की, देशाकरता आम्ही केलेल्या ट्वीट्सबाबत तुम्ही चौकशी लावली. आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती काय, हे यातून स्पष्ट होतं."

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, "भाजपातर्फे सेलिब्रिटींना ट्वीट करायला भाग पाडले गेले हे आता स्पष्ट झाले आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकाच का? सुनील शेट्टीने भाजपा पदाधिकाऱ्याला टॅग का केलं? यांचे उत्तर मिळाले. आता भाजपाने दबाव टाकला का? धमक्या दिल्या का? यांचे ही उत्तर चौकशी अंती मिळेल"

नेमकं प्रकरण काय आहे?

आंतराराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर भारतीय खेळाडू, कलाकार आणि संगीतकारांनी हा देशांतर्गत विषय असल्याबाबत आपले मत मांडले. पण असे सर्व ट्वीट्स दबावाअंतर्गत केले आहेत का? याची चौकशी महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

एकाच दिवशी साधारण एकाच मताचे आणि एकसमान सलग ट्वीट्स केल्याने सेलिब्रिटींवर दबाव असल्याचे दिसून येते असा आरोप काँग्रेसने केला होता.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. सेलिब्रिटींना अशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्रवृत्त केले का? यामागे राजकीय दबाव होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले होता.

काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेलिब्रिटींच्या ट्वीट मालिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारने आपली बाजू सावरण्यासाठी भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.

या मागणीनंतर याप्रकरणाची चौकशी राज्याचा गुप्तहेर विभाग करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)