उदय सामंत - इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार #5मोठ्यााबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार, उदय सामंतांची घोषणा

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

या संदर्भातील एक निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्टपणे होण्यास मदत होईल, असं उदय सामंत म्हणाले.

मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचं कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. ते 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असं उदय सामंत म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. फक्त 18 तासांत 25 किलोमीटर डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद

सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान एका विक्रमाची नोंद झाली आहे.

या मार्गावरील 25 किलोमीटर रस्त्याचं काम फक्त 18 तासांत पूर्ण करण्याची किमया कंत्राटदार कंपनीने केली आहे. या घटनेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

सोलापूर ते विजापूरदरम्यान 110 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. याठिकाणच्या 25 किलोमीटच्या टप्प्यात हे काम करण्यात आलं. 500 मजुरांनी या कामात योगदान दिलं. ऑक्टोबर 2021 पर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

3. मोदी-शहांच्या सोयीनुसार निवडणूक वेळापत्रक ठरवलं का? - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक शुक्रवारी (26 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आलं.

पश्चिम बंगालमध्ये या निवडणुका 8 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. पण या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून बनवण्यात आलं की अमित शाह यांच्या? त्यांच्या प्रचाराला सोयीस्कर होतील अशा तारखा नियोजित करण्यात आल्या का? आसाम आणि तामिळनाडूच्या निवडणुका संपवून ते बंगालमध्ये येतील, असं नियोजन केलं का? हे भाजपच्या फायद्याचं ठरणार नाही, आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सत्तेचा दुरूपयोग करू नये, त्यांनी संपूर्ण देशासाठी काम करावं, असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

4. धावपटू हिमा दास पोलीस उप-अधीक्षक पदावर रुजू

भारताची सुप्रसिद्ध धावपटू हिमा दास ही आसामच्या पोलीस उप-अधीक्षक पदावर रुजू झाली आहे. शुक्रवारी (26 फेब्रुवारी) हिमाने हा पदभार स्वीकारला.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आसाम पोलीस दलातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

"लहान असल्यापासूनच पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून होते.आईलाही मला पोलिसांच्या वेशात पाहायचं होतं. ते स्वप्न आज सत्यात उतरलं, असं हिमा म्हणाली.

हिमा दास ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती धावपटू आहे. तसंच ती जागतिक ज्यूनियर चॅम्पियनशीपची विजेतीही आहे. पोलीस दलात नियुक्ती झाल्यानंतरही हिमा दास आपला खेळ पुढे चालू ठेवणार आहे. खेळावर आता जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचं हिमाने सांगितलं. ही बातमी सकाळ स्पोर्ट्सने दिली.

5. कुणाचीही तोंडं फोटोला चिकटवा, मला फरक पडत नाही - चित्रा वाघ

माझे कितीही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिकटवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे, असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकत्र दिसत आहेत. या फोटोंवरुन चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली.

माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचंय? वारंवार फोन करुन मला त्रास दिला जातोय. तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार, असं चित्रा वाघ म्हणाल्या. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)