मोहम्मद बिन सलमान यांनीच पत्रकार खाशोग्जींच्या हत्येला मंजुरी दिली होती - अमेरिका

अमेरिकन गुप्तहेर संघटनेच्या एका अहवालात सौदी अरेबियाच्या युवराजांवरच हत्येसंदर्भात आरोप करण्यात आला आहे.

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी निर्वासित जीवन जगत असलेल्या जमाल खाशोग्जी या पत्रकाराची हत्या करण्यासाठी परवानगी दिली होती, असं या अहवालात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाने शुक्रवारी (26 फेब्रुवारी) एक गुप्त अहवाल सार्वजनिक केला.

अमेरिकेत राहत असलेल्या जमाल खाशोग्जी या पत्रकाराला जिवंत पकडणं किंवा मारण्याच्या योजनेला सौदी युवराजांनी परवानगी दिली होती, असं यामध्ये म्हटलं आहे.

म्हणजेच, खाशोग्जी यांच्या हत्येसाठी अमेरिकेने थेट सौदी अरेबियाचे युवराज सलमान बिन मोहम्मद यांचं नाव घेतलं आहे. पण युवराजांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

2018 मध्ये पत्रकार जमाल खाशोग्जी यांची इस्तांबूलमधल्याल सौदी अरेबियाच्या वाणिज्य दुतावासात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी खाशोग्जी हे आपली काही खासगी कागदपत्र घेण्यासाठी वाणिज्य दूतावासात गेले होते.

जमाल खाशोग्जी यांना सौदी सरकारचे टीकाकार म्हणून ओळखलं जात होतं.

2018 मध्ये झालेल्या या हत्येचे आदेश सौदी अरेबियाच्या युवराजांनीच दिले आहेत, असा ठाम विश्वास CIA या अमेरिकन गुप्तहेर संस्थेला होता.

पण आजपर्यंत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या हे कधीच म्हटलं नव्हतं.

अमेरिकेत आता राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या तुलनेत बायडन यांची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. सौदी अरेबियातील मानवाधिकार आणि कायद्याचं राज्य या संदर्भात ते कठोर भूमिका घेतील, असं मानलं जात आहे.

मात्र दुसरीकडे, आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया हा देश अमेरिकेचा खूपच जुना आणि महत्त्वाचा सहयोगी आहे.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बायडन यांनी सौदी अरेबियाचे बादशाह शाह सलमान यांच्याशी फोनवर बातचीत केली होती.

अमेरिका जागतिक मानवाधिकार आणि कायद्याचं राज्य या गोष्टींना किती महत्त्व देतं, हे त्यांनी शाह सलमान यांना सांगितलं होतं.

पण, बायडन प्रशासन आता सौदी अरेबियासोबतचा शस्त्रांचा करार मोडण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्राच्या हवाल्याने दिली आहे.

या कराराने मानवाधिकार संदर्भात चिंता वाढवल्या असून बायडन प्रशासन भविष्यात शस्त्रास्त्रांची विक्री फक्त स्वयंसंरक्षणापुरतीच मर्यादित ठेवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

सौदी अरेबियाच्या एजंटनीच खाशोग्जींची हत्या केली, असं आतापर्यंत सौदी अरेबियाकडून सांगण्यात येत होतं. खाशोग्जी यांना पकडून सौदी अरेबियात आणा, एवढंच त्यांना सांगितलं होतं, असं त्यांनी म्हटलं होतं.

या प्रकरणात सौदीच्या न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण गेल्या वर्षी त्यांची शिक्षा बदलून त्यांना 20 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे (UN) विशेष अधिकारी एग्नेस कॉलामार्ड यांनी सौदी सरकारवर पूर्वनियोजित पद्धतीने खाशोग्जी यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. सौदी अरेबियाने चालवलेला खटला न्यायाच्या पूर्णपणे विरोधात असल्याचंही ते म्हणाले होते.

खाशोग्जी यांची हत्या कशी झाली?

59 वर्षीय जमाल खाशोग्जी हे पत्रकार 2018 मध्ये इस्तांबूलमधील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात गेले होते. तिथं त्यांना आपली काही खासगी कागदपत्रं घ्यायची होती.

त्या कागदपत्रांच्या आधारेच ते आपली तुर्की प्रेयसी हतीजे जेंग्गिज हिच्याशी लग्न करू शकणार होते.

खाशोग्जी यांनी सौदी अरेबियाच्या दूतावासात जाणं पूर्णपणे सुरक्षित असेल, असं आश्वासन युवराजांचे भाऊ खालिद बिन सलमान यांनी दिलं होतं, असं म्हटलं जातं.

युवराज खालिद हे त्यावेळी अमेरिकेत सौदी अरेबियाचे राजदूत होते. पण खाशोग्जी यांच्याशी कोणत्याही मार्गाने संपर्कात असल्याचं खालिद यांनी फेटाळून लावलं आहे.

सुरुवातीच्या झटापटीनंतर खाशोज्जी यांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देण्यात आले. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर खाशोग्जी यांच्या शरिराचे तुकडे-तुकडे करण्यात आले. सौदी अरेबियाच्या दुतावासाबाहेर उपस्थित असलेल्या एका स्थानिकाला ते देण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत खाशोग्जी यांचा मृतदेह मिळू शकलेला नाही.

तुर्कस्तानच्या गुप्तहेर संस्थेने या हत्येदरम्यान झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तुर्कस्तान सरकारने ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर लोकांना या हत्येची माहिती मिळाली होती.

एकेकाळी खाशोग्जी हे सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबाच्या अत्यंत जवळचे होते. त्यांचे ते सल्लागारही होते. पण नंतर त्यांच्यातील संबंध बिघडले. त्यानंतर खाशोग्जी हे अमेरिकेला निघून गेले. तिथं ते निर्वासिताचं जीवन जगत होते.

अमेरिकेतून ते वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक स्तंभ लिहायचे. यामध्ये ते नेहमीच सौदी अरेबियाच्या युवराजावर टीका करताना दिसून येत.

सौदी प्रशासनाबाबतची असहमति दाबण्याच्या प्रयत्नात आपल्यालाही अटक केली जाऊ शकते, असं खाशोग्जी यांना नेहमी वाटायचं. या संपूर्ण गोष्टींवर सौदीचे युवराज स्वतः नजर ठेवून होते, असं त्यांनी आपल्या पहिल्या स्तंभातच लिहिलं होतं.

आपल्या शेवटच्या स्तंभात त्यांनी सौदी अरेबिया येमेनमध्ये करत असलेल्या हस्तक्षेपावर टीका केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)