You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात चर्चा, सीमेवर गोळीबार थांबवण्याबाबत एकमत
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चर्चा झाल्यानंतर दोघांनीही नियंत्रण रेषा आणि इतर भागांमध्ये 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून गोळीबार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही देशांच्या डीजीएमओ (सैन्य कारवाईचे महासंचालक) यांच्यात ही चर्चा झाली. दोन्ही देशांकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने युद्धबंदीचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली.
या सततच्या संघर्षाचा दोन्ही देशांमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या गावांवर वाईट परिणाम झाला आहे.
दोन्ही देशांच्या सैन्याने एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं आहे, "दोन्ही पक्ष नियंत्रण रेषा आणि इतर सेक्टर्ससंबंधी सर्व करार, परस्पर सामंजस्य आणि युद्धबंदीचं 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून कठोर पालन करतील."
दोन्ही देशांच्या सैन्याने चर्चेदरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर सर्व सेक्टर्समधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. हॉटलाईनच्या माध्यमातून ही चर्चा करण्यात आली.
दोन्ही सैन्यांच्या सैन्य कारवाईच्या महासंचालकांनी परस्परांच्या अंतर्गत समस्या आणि चिंता समजून घेत नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांसाठी हितकारी असणारी शांती भंग होईल, अशी कुठलीही कारवाई न करण्यावर समहती दर्शवल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
मात्र, नियंत्रण रेषा आणि जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारची कट्टरतावाद विरोधी कारवाई करण्यात आणि पाकिस्तानी लष्कर समर्थित कट्टरतावाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यात कसूर ठेवणार नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलं.
राजनाथ सिंह यांनी दिला होता इशारा
दरम्यान, 30 डिसेंबर 2020 रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती.
मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले होते, "गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानने शेकडो वेळा सीज-फायर आदेशांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तान तयार झाल्यापासूनच भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला. पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. फक्त आपल्याच सीमेमध्ये नव्हे तर सीमेपलिकडे जाऊन शत्रूला प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतामध्ये आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)