You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
INDvsENG: भारतानं दुसऱ्याच दिवशी संपवली कसोटी, इंग्लंडवर 10 विकेट्स राखून मिळवला विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताने एक मोठा विजय मिळवला आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत केले.
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताने एकही विकेट न गमावता 8 व्या षटकात कसोटी संपवली. दुसऱ्या डावात रोहित शर्माने 25 आणि शुभनन गिलने 15 धावा केल्या.
पहिल्या डावात काय झालं?
पहिल्या डावात इंग्लंडला 112 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने या सामन्यात 3 बाद 99 पर्यंत मजल मारली. सध्या भारत इंग्लंडपेक्षा 13 धावांनी मागे आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 57 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका धावावर नाबाद होते.
अक्षर पटेलचे सहा बळी
हा सामना दिवसरात्र स्वरुपात गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा. पण हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला.
अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या भारतीय फिरकीपटूंच्या जोडगोळीसमोर इंग्लंडचा टिकाव लागला नाही. दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडची आघाडी फळी कापून काढत पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रांमध्येच भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली.
सुरुवातीपासून कोणताच फलंदाज टिकून न शकल्याने इंग्लंडचा डाव 112 धावांवर आटोपला.
पण तिसऱ्याच षटकातच इंग्लडच्या दोन धावा असताना इशांत शर्माने सलामीवीर डॉमिनिक सिब्लीला बाद करून त्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर बेअरस्टही झटपट बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था 2 बाद 27 अशी बनली होती. पण सलामीवीर झॅक क्रॉऊली याने कर्णधार जो रुटसोबत डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला.
पण मागच्या सामन्यातील किमयागार रविचंद्रन अश्विन पुन्हा भारताच्या मदतीला धावून आला. अश्विनने मोठा अडथळा ठरू शकणाऱ्या जो रूटला माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 3 बाद 74 अशी बनली. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरची पकड सुटू दिली नाही. ठराविक अंतराने एकामागून एक गडी बाद करत इंग्लंडला 112 धावांत गुंडाळले.
इंग्लंडकडून सर्वाधिक धावा क्रॉऊलीने केल्या त्याने 84 चेंडूंमध्ये 53 धावांची खेळी केली. तर भारताकडून अक्षर पटेलने 6 तर रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले.
रोहित शर्माचं अर्धशतक
इंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भारताच्या वाट्याला दिवसातील उर्वरित 33 षटकं आली. भारताने सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सलामीवीर गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या रुपाने तीन धक्के भारताला बसले.
विराट कोहली तर केवळ एक षटक उरलं असताना माघारी परतल्याने भारतीय संघात निराशा पसरल्याचं दिसून आलं.
दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने आपल्या नावास साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली. त्याने एक बाजू लावून धरली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)