You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवजयंती : कोरोनाच्या लढाईत मास्क आपली ढाल आहे - उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आज 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी शिवनेरीवर पोहचले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.
"युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागतो, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय. कोरोनाच्या लढाईत मास्क आपली ढाल आहे, हे विसरू नका," असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
अजित पवार यांनी म्हटलं, "यंदा कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यावर मर्यादा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीचं काम दर्जेदार पद्धतीनं झाली पाहिजेत. हा निधी परिसराच्या विकासासाठी आहे. कामाच्या दर्जेत आणि गुणवत्तेतील कमी खपवून घेतली जाणार नाही."
भारतीय पुरातत्त्व विभागानं 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर प्रकाशयोजना केली आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती.
याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, "काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करतात, त्या थांबल्या गेल्या पाहिजे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पुन्हा अशा घडू नये यासाठीची खबरदारी प्रशासनानं घ्यायला पाहिजे."
संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच 20 कोटी रुपये निधी रायगड प्राधिकरणासाठी दिले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."
जलदुर्ग प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि रायगड यांना जोडण्यात यावं, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
शिवजयंतीनिमित्त रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे.
याशिवाय रायगड परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारच्या इतर सूचना खालील प्रमाणे आहेत...
- सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यानं, गाणी, नाटक इत्यादींचं सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचं केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
- कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा.
- या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी.
- शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरं आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसंच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
शिवजयंतीनिमित्त खेळाडू, राजकारणी आणि सामान्य माणसं अशा अनेकांनी व्यक्त होत शिवाजी महाराजांविषयीचा आदर व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलंय, "शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमत्त त्यांना प्रणाम. त्यांचं शौर्य, बुद्धिमत्ता देशाला युगानुयुगे प्रेरित करत राहिल."
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने ट्वीट करत म्हटलंय, "शिवाजी महाराजांचं धैर्य आणि त्याग पिढ्यांना प्रेरणा देत राहिल."
शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी शिवाजी महाराजांची वाळूची प्रतिमा रेखाटली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)