You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवजयंतीच्या तारखेचा दुसरा वाद उद्धव ठाकरे मिटवणार का?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
मराठा साम्राज्य उभे करणारे आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती 19 फेब्रुवारीला साजरी होणार आहे.
यातला 'शासकीय' आणि '19 फेब्रुवारी' हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. कारण, सगळ्यांनाच माहीत आहे की, शिवजयंतीच्या निश्चित तारखेवरून राज्यात वाद आहेत.
शिवाजी महाराजांचा नक्की जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी की 6 एप्रिल...हा वाद नेमका का आहे, शिवजयंतीची नेमकी तारीख शोधून काढण्यासाठी सरकार पातळीवर आतापर्यंत कोणते प्रयत्न झाले, त्यातून काय निष्पन्न निघालं, हे सगळं आज समजून घेऊया.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ला झाला असं मानलं जातं. महाराष्ट्र सरकारने 2000 साली विधिमंडळात तसा ठराव मांडून शासकीय कार्यक्रमांसाठी ही तारीख मंजूर करून घेतली. पण, राज्यात अजूनही एक गट असा आहे जो शिवाजी महाराजांची जन्मतारीख 6 एप्रिल 1627 म्हणजे वैशाख वद्य द्वितीया शके 1549 असल्याचं मानतो.
शिवजयंती साजरी करण्यात टिळक, फुले यांचं योगदान
शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी व्हावी जेणेकरून समाजात शिवाजी महाराजांच्या बद्दल जागृती होईल आणि लोकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल, लोक एकत्र येतील असे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळात दोन नेत्यांनी केले, ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळक.
ज्योतिबा फुले यांना 1869मध्ये राजगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लागला आणि त्यांनी महाराजांच्या आयुष्यावर एक मोठा पोवाडा लिहिला, असा उल्लेख इतिहासात आहे. पुढे 1870मध्ये पुण्यात त्यांनी पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही पुढच्या काळात दोनदा या शिवजयंती कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
तर लोकमान्य टिळक यांनी 14 एप्रिल 1900 रोजी केसरी या आपल्या दैनिकात लिहिलेल्या लेखातही शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल मोठा उहापोह केला आहे. त्यांच्या बरोबरीने इतिहासकार वि. का. राजवाडे यांनीही शिवाजी महाराजांची जन्मतारीख शोधण्यासाठी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांचा या तारखेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास डी व्ही आपटे आणि एम आर परांजपे यांनी लिहिलेलं 'बर्थडेट ऑफ शिवाजी' या पुस्तकात पाहायला मिळतो. हे पुस्तक 1927मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
तेव्हाच्या उपलब्ध काही बखरींचा आसरा घेऊन यात प्रमुख्याने मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीचा उल्लेख करता येईल. ही बखर शिवाजी महाराज मरण पावल्यावर 130 वर्षांनी लिहिलीय. आणि यात शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1627 ला झाला असा उल्लेख आहे. अशा काही बखरी गृहित धरून तेव्हाच्या काळात 6 एप्रिल हीच शिवजयंतीची तारीख मानली जात होती. आणि जन्मसाल होतं 1627. लोकमान्य टिळकांनी अनेकदा शिवजयंतीची निश्चित तारीख उपलब्ध नाही यावरून निराशा व्यक्त केली आहे.
पण ही परिस्थिती बदलली 1916मध्ये जेव्हा भोर संस्थानचे देशमुख दाजीसाहेब जेधे यांनी त्यांच्या कुटुंबाकडे असलेली जेधे शकावली लोकमान्य टिळकांच्या हवाली केली. यात 23 महत्त्वाची कागदपत्रं आहेत. यात शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाल्याचा उल्लेख आहे.
या जेधे शकावलीच्या इतरही काही नोंदी जसं की, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तो दिवस, मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी केलेला तह या तारखा इंग्रजांकडे असलेल्या नोंदींशी जुळतात. त्यामुळे ही शकावली पुढे इतिहासकारांनी उचलून धरली. जोधपूर संस्थानात शिवाजी महाराजांची कुंडली सापडली तीही जन्मसाल 1630 असल्याचं सुचवत होती. त्यामुळे पुढे लोकमान्य टिळकांनीही 19 फेब्रुवारी 1630 हीच खरी तारीख असल्याचा निर्वाळा दिला.
अखेर तारीख निश्चित कशी केली?
शिवजयंतीच्या दोन तारखा आणि तिथी यांचा घोळ सोडवण्यासाठी पहिल्यांदा 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमली. कारण त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी होती. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.
समितीच्या सदस्यांची तारखेवर एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आपापली निवेदनं समितीसमोर ठेवली आणि अखेर सरकारलाच निर्णय घ्यायला सुचवलं. त्यामुळे सरकारनेही जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही, तोपर्यंत जुनीच तारीख कायम ठेवण्याचा निर्वाळा दिला.
पण, अखेर 2000 साली आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधिमंडळात उपलब्ध पुरावे आणि 1966च्या समितीचा अहवाल मांडून 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने मान्य केला. आणि अशापद्धतीने शिवजयंतीचा शासकीय दिवस ठरला 19 फेब्रुवारी.
शिवाजी महाराजांवर स्मृतिग्रंथ लिहिणारे इतिहासकार जयसिंगवार पवार यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना याच तारखेच्या बाजूने आपला कौल दिला आहे. त्यांच्या मते,
समकालीन ऐतिहासिक पुरावे पाहता शिवाजीमहाराजांचे जन्मसाल 1630 असावे असेच दिसते. त्यामुळे त्या वर्षात दिलेली तारीखच सुयोग्य मानावी. आम्हीही त्याचाच पाठपुरावा करतो.
तरीही दोन शिवजयंती का?
महाराष्ट्र सरकारचा निर्णय आलेला असतानाही शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार न करता शालिवान शकाच्या तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह शिवसेनेसारख्या काही राजकीय पक्षांनी धरला. आताही, शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला झाली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तरी शिवसेनेचा शिवजयंती कार्यक्रम नंतर तिथीनुसार होईल अशी भूमिका मंत्री अनिल परब यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला आवाहन केलं आहे की त्यांनीही तारखेनुसार शिवजयंती साजरी करून दुसऱ्या वादावरही पडदा टाकावा. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तसंच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही राज्यात एकाच दिवशी शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शिवसेनेला आवाहन केलं आहे.
याविषयी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेची भूमिका मांडली.
'शिवसेना रीतीप्रमाणे तिथीने शिवजयंती साजरी करत आलेली आहे. गेल्यावर्षीही शिवसेनेची हीच भूमिका होती. शिवजयंती एकच साजरी व्हावी असा वाद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे,' अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.
थोडक्यात, शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी होणार असली तरी शिवजयंतीवरून वाद इतक्यात मिटणार नाही आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)