कोरोना व्हायरस : अमरावती, यवतमाळ, अकोल्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार - अजित पवार

अमरावती, यवतमाळ, अकोल्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार, सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. फक्त 3 शहरांमध्ये लावायचा की तिन्ही जिल्हे लॉकडाऊन करायचे हे ठरवू. 12.30 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यात निर्णय घेऊ, असं अजिता पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

1 फेब्रुवारीपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण जास्त येऊ लागले आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

"मुंबईपेक्षा जास्त पॉझिटिव्ह अमरावतीत आहेत. मी आधीच म्हटलं होतं की कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका. गोष्टी गांभिर्याने घ्या. कोरोना कमी झालाय, आता पूर्वीसारखं वागायला हरकत नाही असं अनेकांना वाटलं. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली," असं अजित पवार यांनी म्हटलंय.

"प्रसार वाढू नये म्हणून जी खबरदारी घ्यायची असेल ती राज्य सरकार घेईल. अधिवेशनाबद्दल आजच कामकाज समितीची बैठक आहे. त्यात अधिवेशनाबद्दल विचार करू," असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना रुणांची संख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळतेय.

राज्यात बुधवारी (17 फेब्रुवारी) 4,787 कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 70 दिवसांच्या तुलनेत करण्यात आलेली ही रुग्णांची सर्वात जास्त नोंद आहे. तर, मुंबईत 721 कोरोनाग्रस्त आढळून आले. हा गेल्या 42 दिवसांच्या तुलनेत सर्वोच्च आकडा आहे.

राज्यातील अमरावती, अकोला यांसारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोरोनावर आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

गेल्या 9 दिवसांत राज्यात 32,451 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)