कोरोना व्हायरस : आकड्यांमधील सध्याची घसरण ही दुसऱ्या लाटेआधीची शांतता आहे का?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनेकांना वाटतंय त्याप्रमाणे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या खालावणं ही नाट्यमय किंवा अनाकलनीय बाब आहे का?

ज्या भारत देशात कोरोनामुळे लाखो जणांचा जीव जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, त्या देशातून कोरोना व्हायरस माघार घेत आहे का?

देशभरात कोरोनाचा प्रसार कमी का होत चालला आहे, याविषयी मी ऑक्टोबर महिन्यात सविस्तर लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात मात्र कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला होता. लाखो रुग्ण या महिन्यात आढळले होते. त्यानंतर मात्र नियमितपणे करण्यात आलेल्या टेस्टिंगमुळे दररोजचे रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाण घटलं होतं.

तेव्हापासून परिस्थितीत आता बरीच सुधारणा झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून देशात दररोज सरासरी 10 हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे सात दिवसांत दररोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी 100पेक्षा कमी झाली आहे. देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये कोरोनामुळे कुणाचा मृत्यू होत नसल्याचं चित्र आहे. मंगळवारी (9 फेब्रुवारी) दिल्लीत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. गेल्या 10 महिन्यांत दिल्लीनं पहिल्यांदा असा अनुभव घेतला.

आतापर्यंत भारतात 1 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. तर दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. 10 लाखांमागे 112 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. युरोप आणि अमेरिकापेक्षा ही संख्या खूपच कमी आहे. रुग्णांची संख्या टेस्टिंगचं प्रमाण कमी झाल्यामुळे खालावली नसल्याचंही आता स्पष्ट झालं आहे.

बहुतेक साथीचे रोग साधारणपणे घंटीच्या आकारात (bell-shaped curve) वाढतात आणि तसेच खालावतात. भारतही त्याला अपवाद राहिलेला नाही. देशात अतिशय दाटवस्तीत राहणाऱ्या 65 वर्षांहून अधिक वय असलेल्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले आहेत.

भारतातील कोरोनाचं संक्रमण कमी होतंय तर त्यात विलक्षण असं काही नाहीये. यामागे कोणताही चमत्कार नाहीये, असं विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहीद जामील सांगतात.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यामागे अनेक संभाव्य कारणं असल्याचं तज्ञांचं मत आहे.

मिशिगन विद्यापीठातील जीवशास्त्र आणि महामारीशास्त्रातील प्राध्यापक भ्रमर मुखर्जी म्हणतात, "साथीच्या रोगाविषयीचं स्पष्टीकरण अद्याप आपल्याकडे नाहीये. पण आपल्याला हे माहिती आहे की भारत अजून हर्ड इम्यूनिटीपासून दूर आहे."

हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. म्हणजे जेव्हा समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाची प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो.

भारत हर्ड इम्यूनिटीपासून दूर का आहे?

नुकताच झालेला सिरो सर्व्हे सांगतो की, 21 टक्के वयस्कर आणि 25 टक्के तरुणांना आधीच कोरोनाची लागण झाली आहे.

तसंच झोपडपट्टीत राहणारे 31 टक्के, झोपडपट्टीत न राहणारे पण शहरातले 26 टक्के नागरिक आणि 19 टक्के ग्रामीण नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचंही अहवाल स्पष्ट करतो. दिल्ली आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तर हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे. याचा अर्थ या भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संपर्कात यायची शक्यता खूप जास्त आहे आणि ही ठिकाणं हर्ड इम्यूनिटीच्या अगदी जवळ आहेत.

पण तज्ञ म्हणतात की अजूनही ही संख्या फारच कमी आहे.

दिल्लीतील थिंक टँक 'पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. के श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलं की, "देशात असा कोणताही प्रदेश नाही ज्यानं हर्ड इम्यूनिटी प्राप्त केली आहे. असं असलं तरी काही लहान भाग अस्तित्त्वात असू शकतात."

त्यामुळे संसर्गाचं प्रमाण जास्त असूनही ज्या लोकांना अद्याप कोरोनाची लागण झाली नाही, असे लोक आपापल्या संरक्षित भागात राहू शकतात. पण, जर ही माणसं कमी संसर्ग असलेल्या भागात गेल्यास ते असुरक्षित होऊ शकतात.

रुग्णांची संख्या कमी का होत आहे?

यामागे वेगेवगेळी कारणं असू शकतात, असं तज्ञ सांगतात.

एक म्हणजे देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्णांची प्रकरणं कमी होत आहेत.

लहान गावांपेक्षा दाटवस्त्या असलेल्या शहरांमधील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या ठिकाणी त्यांचा ज्या विषाणूशी संपर्क आला त्यात लक्षणीय बदल झाले आहेत. बर्‍याच शहरी भागात आता कोरोनाची प्रकरणं मंदावली आहेत, पण, ग्रामीण भारत अजूनही थोड्या प्रमाणात रहस्य कायम आहे.

"माझ्या मते सर्वेक्षणात जे सांगितलं जात आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका आहे. तसंच भारताला आपण एक घटक म्हणून ग्राह्य धरत नाही आहोत. दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूसारख्या शहरांत 60 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे हे सगळं समसमान नाही," डॉ. शाहीद जामिल सांगतात.

यामागचे दुसरं कारण असं आहे की भारतातील अनेक रुग्णांचं निदान झालं नाही, कारण संसर्गाची लागण झालेल्या शेकडो लोकांना कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. दिसत असली तरी ती खूप कमी प्रमाणात होती.

"जर आपल्याकडे खूपच सौम्य किंवा लक्षणं नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर असते, तर आपण आधीच हर्ड इम्यूनिटीपर्यंत पोहोचलो असतो. पण, जर खरंच असं असेल तर आपल्याला हे समजून सांगावं लागेल की, भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर सौम्य लक्षणं असलेलं रुग्ण का आढळले," असं दिल्लीस्थित सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे पार्थ मुखोपाध्याय विचारतात.

कमी मृत्यूदर हे रहस्य आहे का?

बहुतांश शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, अधिकृत आकडेवारीपेक्षाही अधिक भारतीयांचा कोरोना ससंर्गामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचं प्रमाणीकरण करण्याची भारताची पद्धत कमकुवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक घरी मरण पावले.

असं असलं तरी आकडेवारी कमी प्रमाणात दिल्यामुळे सार्वजनिक भीतीचं वातावरण तयार झालं नाही. भारतात जवळपास 6 लाख गावं आहेत. प्रत्येक गावात दररोज एक मृत्यू जरी कोरोनामुळे झाला म्हटला तरी यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर परिणाम होणार नाही.

भारतानं विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन जाहीर केला. जवळपास 70 दिवस चाललेल्या या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्ग आणि मृत्यू मोठ्या प्रमाणावर टळले, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

मास्कचा विस्तारित उपयोग, शाळा आणि कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आल्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमधील संसर्गाचं प्रमाण कमी झालं.

कोरोनामुळे तरुणांचे कमी प्रमाणात मृत्यू झाले, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, असंही शास्त्रज्ञ सांगतात.

पण, 65 टक्क्यांहून अधिक भारतीय ग्रामीण भागात राहतात आणि तिथंच काम करतात. उदाहरणार्थ ब्राझीलचं भारताहून तीनपट अधिक शहरीकरण झालं आहे आणि यामुळेच तिथे संसर्ग आणि मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात.

शहरांधील बहुसंख्य कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. यात बांधकाम मजूर, रस्त्यावरील विक्रेत्यांचा समावेश होतो. ही माणसं मोकळ्या जागेत काम करतात.

"मोकळ्या किंवा अर्धबंद जागेत काम करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग व्हायचा धोका कमी असतो," असं डॉ. रेड्डी सांगतात.

भारतात दुसरी लाट आलीय का?

असं म्हणणं घाईचं ठरेल.

काही तज्ज्ञांना भीती आहे की पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात भारतातील कोरोना संसर्गात बरीच वाढ होऊ शकेल. जून ते सप्टेंबर देशात पाऊस असतो आणि दरवर्षी दक्षिण आशियामध्ये पूर येतो. या काळात भारतात influenza (फ्लू) ची सुरुवात होते.

"मॉन्सून संपल्यानंतर कोरोनानं देशात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे का, याबाबत आपण फक्त उपलब्ध माहितीनुसार मूल्यांकन करू शकतो," असं एका साथरोग तज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि यूकेमध्ये सापडलेली कोरोनाची नवी प्रजात ही खरी समस्या असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

भारतातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये. त्यामुळे संसर्गापासून दूर असलेल्या भागात कोरोनाची नवी प्रजात वेगानं पोहोचू शकते आणि मग यामुळे नवा उद्रेक होऊ शकतो.

जानेवारीच्या शेवटापर्यंत भारतात कोरोनाच्या यूके स्ट्रेनचे 160 रुग्ण आढळले होते. इतर काही प्रजाती देशात आधीच पसरल्या आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाहीये. इतकंच काय देशांतर्गत निर्माण झालेल्या कोरोनाच्या काही प्रजातीही अस्तित्वात असू शकतात.

यूकेतल्या केंट इथं सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला होता आणि पुढच्या दोन महिन्यांत त्यामुळे दुसरी लाट आली. आतापर्यंत हा स्ट्रेन जगभरातल्या 50 देशांमध्ये आढळला आहे आणि आता तो जगातील प्रमुख स्ट्रेन म्हणून ओळखला जात आहे.

भारतात पुरेशा वैज्ञानिक प्रयोगशाळा आहेत, पण जिनोम सिक्वेसिंग हे अजूनही आव्हान असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

"कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची कहाणी खूप मोठी आहे. यामुळे आपली सगळी गणितं बिघडू शकतात. आपण खूप जागरूक राहणं अपेक्षित आहे. या स्ट्रेनवर काम करण्यासाठी आपल्याकडील प्रयोगशाळांनी जिनोम सिक्वेसिंगसाठी सज्ज असायला हव्यात," डॉ. जामील सांगतात.

भारताला लसीकरण मोहिमेस वेग देण्याची आवश्यकता आहे. एका महिन्यातच जवळजवळ 60 लाख लोकांना लस देण्यात आली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत व्यापक संसर्ग होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी ऑगस्टपर्यंत 30 कोटी लोकांना लस देण्याचा सरकारचा हेतू आहे.

पण, अजून यात समाधानकारक प्रगती नाहीये. गर्दी करू नका, मास्कचा वापर नियमितपणे करा आणि हात वारंवार धुवा, असं आवाहन तज्ज्ञ मंडळी लोकांना करत आहे.

(शादाब नाझमी यांचे ग्राफिक्स)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)