कंगना राणावतचे वादग्रस्त ट्वीट चित्रपट प्रमोशनसाठीच की आणखी काही कारण?

इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केलं आणि तेव्हापासून बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने मनोरंजन क्षेत्रातल्या इंटरनॅशल सेलिब्रिटींना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

नुकतंच कंगनाने तिच्या दोन आगामी चित्रपटांचे फोटो शेअर करत स्वतःची तुलना ऑक्सर विजेत्या मेरील स्ट्रीप आणि गॅल गॅडोटशी या अभिनेत्रींशी केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, "मी जेवढ्या विविधांगी भूमिका केल्या ते बघता माझ्यासारखी विलक्षण प्रतिभा असणारी अभिनेत्री ब्रह्मांडात नाही. मी जगातली सर्वोत्तम अभिनेत्री आहे. चरित्र भूमिका साकारण्यासाठी गरजेची असणारी मेरील स्ट्रीपसारखी अत्युच्च प्रतिभा तर माझ्यात आहेच. शिवाय, गॅल गॅडोटसारखं अॅक्शनचं कौशल्य आणि ग्लॅमरही माझ्याकडे आहे."

कंगनाच्या या ट्वीटनंतर गॅल गॅडोट आणि मेरील स्ट्रीप ट्वीटरवर ट्रेंड होऊ लागल्या.

कंगनाला झाली ट्रोल

कंगनाच्या या ट्वीटनंतर तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिची थट्टा केली. कुणी तिला अटेंशनजीवी म्हटलं, कुणी खुद मिया मिठ्ठू होना (स्वतःवरच स्तुतीसुमनं उधळणं) लिहिलं.

एक यूजर लिहितात, "माझी आई मला कायम सांगायची, ज्याची कुणीच स्तुती करत नाही तो स्वतःच स्वतःचं कौतुक करतो."

अनेकांनी बॉलीवुडचे मीम्स पोस्ट करत कंगणाला खिजवलं.

एका यूजरने कंगनाला आहे त्याच्या 10 टक्के जरी आत्मविश्वास माझ्यात असता तर… असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार सतिश आचार्य यांनीही कंगनाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना 'किती हा विनम्रपणा' अशी खोचक टिप्पणी केली आहे.

अँड्रे बॉर्गिस नावाच्या यूजरने कंगनाने स्वतःची तुलना मेरील स्ट्रीपशी करणं म्हणजे अर्णब गोस्वामीने स्वतःची तुलना पत्रकाराशी करण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.

तिच्या या ट्वीटनंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. मेरील स्ट्रीपशी तुलना करण्याआधी तिला स्वतःला किती ऑस्कर पुरस्कार मिळााले, हे तिने सांगावं, असंही अनेकांनी विचारलं.

त्यावर उत्तर देताना कंगना म्हणते, "मला किती ऑस्कर मिळाले, हे विचारणाऱ्यांनी मेरील स्ट्रीपला किती राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळाले, हेदेखील विचारवं. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडा. आत्मसन्मान आणि आत्ममूल्य जाणणू घेण्याची वेळ आली आहे."

यानंतर कंगनाने आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे -

"मी खुल्या चर्चेसाठी तयार आहे. या पृथ्वीतलावर माझ्यापेक्षा जास्त विविधांगी भूमिका केलेली आणि कलेचं ज्ञान असणारी अभिनेत्री दाखवा, मी माझा अभिमान सोडून देईन. मात्र, तोवर मी हा अभिमान मिरवणारच."

तिच्या या ट्वीटला उत्तर देताना एका यूजरने कंगणाच्या प्लॉप चित्रपटांची यादीच पोस्ट केलीय.

तर एका यूजरने प्रियंका चोप्रा आणि भूमी पेडणेकर यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिकांचे फोटो शेअर करत चॅलेंज एक्सेप्टेड म्हटलं आहे.

तर एकाने लोकांकडे जेव्हा खूप वेळ असतो किंवा कंटाळा आलेला असतो तेव्हा ते मूर्खपणाच्या गोष्टी करत असतात. किंवा मग पूर्णपणे वाया गेलेली व्यक्तीच असं करते, असं म्हटलं आहे.

मेरील स्ट्रीप कोण आहेत?

कंगनाने ज्या मेरील स्ट्रीपशी स्वतःची तुलना केली, त्या कोण आहे हे जाणून घेऊया. मेरिल स्ट्रीप अमेरिकन अभिनेत्री आहेत. मेरील स्ट्रीप यांना ऑस्कर पुरस्कारांसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल 21 वेळा नामांकनं मिळाली आहेत. यापैकी तीनवेळा त्यांना ऑस्कर मिळाला. इतकंच नाही गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठीही त्यांना 32 वेळा नामांकनं मिळाली आणि त्यापैकी 9 वेळा त्यांनी हा खिताब पटकावला.

1977 साली 'ज्युलिया' या सिनेमातून मेरील स्ट्रीप यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. पुढच्या वर्षी त्यांना एमी पुरस्कार मिळाला. 'द डियर हंटर' चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा ऑस्करचं नामांकन मिळालं. 'क्रेमर व्हर्सेस क्रेमर', 1983 साली आलेला 'सोफीज च्वॉईस' तर 2012 साली आलेल्या 'द आयर्न लेडी' या तीन चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी मेरील स्ट्रीप यांना ऑस्कर मिळाले आहेत. 'द आयर्न लेडी' चित्रपटात त्यांनी मार्गारेट थॅचरची भूमिका निभावली होती.

आउट ऑफ आफ्रिका, डेथ बिकम्स हर, द ब्रिजेस ऑफ मॅडिसिन काउंटी, डाउट, मामा मिया, इट्स कॉम्प्लिकेटेड, ज्युली अँड ज्युलिया, लिटिल विमेन, द पोस्ट, द हॉर्स, द डेव्हिल वियर्स प्राडा यासारख्या अनेक चित्रपटांतल्या उत्तम अभिनयासाठी प्रेक्षकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

अभिनयासोबतच गायनातही मेरील स्ट्रीप यांनी हात आजमावला. आपल्या विशेष अॅक्सेंटसाठीही त्यांची वेगळी ओळख आहे. हॉलीवुडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये मेरील स्ट्रीप यांचं नाव घेतलं जातं.

गॅल गॅडोट कोण आहे?

गॅल गॅडोट इस्रायली अभिनेत्री आहे. आपल्या ग्लॅमरस लूक आणि अॅक्शनसाठी ती ओळखली जाते. अभिनेत्रीसोबतच ती चित्रपट निर्माती आणि मॉडलही आहे.

2004 साली तिने 'मिस इस्रायल'चा खिताब पटकावला होता. त्यानंतर दोन वर्ष तिने इस्रायली लष्करात जवान म्हणूनही काम केलं. पुढे शिक्षण पूर्ण करत ती मॉडेलिंग आणि चित्रपट क्षेत्रात उतरली.

2009 साली आलेल्या फास्ट अँड फ्युरियस चित्रपटातून तिने हॉलीवुडमध्ये पदार्पण केलं. बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन - डॉन ऑफ जस्टिस, वंडर वुमन, जस्टिस लिग यासारख्या सिनेमांमध्ये गॅल गॅडोटने अभिनय केला आहे.

बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन - डॉन ऑफ जस्टिस या चित्रपटातल्या वंडर वुमनच्या भूमिकेसाठी गॅल गॅडोटने तलवारबाजी, कुंग-फू, किकबॉक्सिंग, ब्राझिलियन मार्शल आर्टचं खास प्रशिक्षणही घेतलं होतं. तिच्या अॅक्शन्समुळे तिची ही भूमिका इतकी गाजली की तिला वंडर वुमन म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं.

2018 साली टाईम मॅगेझिनने तिला जगातल्या 100 सर्वांत प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हटलं. जगातल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही गॅल गॅडोटने दोनवेळा स्थान मिळवलं आहे.

चित्रपटांचं प्रमोशन

मेरील स्ट्रीप आणि गॅल गॅडोटशी स्वतःची तुलना करताना कंगनाने तिच्या थलायवी आणि धाकड या दोन आगामी चित्रपटातल्या शूटिंगचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कंगना अशाप्रकारचे ट्वीट करत असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

पब्लिसिटी कशीही असो ती फायद्याचीच असते, यावर कंगनाचा विश्वास असल्याचं एका यूजरने म्हटलं आहे.

कंगनाचे थलायवी आणि धाकड हे दोन चित्रपट येऊ घातले आहेत. यापैकी थलायवी हा चित्रपट अण्णाद्रमुच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यावर आधारित आहेत. या चित्रपटात कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

तर धाकड हा एका स्पाय-अॅक्शन सिनेमा आहे. यात कंगनाने एका गुप्तहेराची भूमिका बजावली आहे. धाकड म्हणजे शूर. या चित्रपटातल्या भूमिकेचं नाव अग्नि असल्याचं कंगनानेच यापूर्वीच्या एका ट्वीटमध्ये सांगितलं होतं. तिचं नाव अग्नी असलं तरी मला ती मृत्यूची देवता भैरवी वाटत असल्याचं ती म्हणाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)