You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रणिती शिंदे: महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या शिंदेंबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज करण्यात आली. त्यामध्ये प्रणिती शिंदे यांच्या नावाची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा झाली. त्यांच्याबरोबर यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे यांच्याही नावाची घोषणा झाली.
प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती पण त्यांची वर्णी आता कार्याध्यक्षपदी लागल्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या. मूळ गाव सोलापूर.
सोलापूरसह राज्यातील सर्वच भागातील तरूणांमध्ये आणि महिलांमध्ये त्या विशेष लोकप्रिय असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी सलग तीनवेळा निवडून येण्याची किमया साधलेली आहे.
सर्वप्रथम 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुढच्या दोन निवडणुकांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवलं.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचा मोठा चेहरा. पण त्यांनासुद्धा सलग दोनवेळा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांचा मार्गही खडतर असल्याचं म्हटलं जात होतं. पण प्रणिती शिंदे यांनी आपली क्षमता दाखवून दिली.
प्रणिती शिंदे यांच्याबाबत बोलताना सोलापुरातील स्थानिक ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर हे सांगतात, "प्रणिती शिंदे यांची महिला आणि तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, पण त्यांच्यासाठी पुढची म्हणजेच 2024 ची निवडणूक सोपी नसेल. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस देशभरात कमकुवत झाली. तसंच यावेळी त्यांचेच एकेकाळचे सहकारी दिलीप माने आणि महेश कोठे त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते. तसंच MIM नेही त्यांच्याविरुद्ध मोठं आव्हान उभं केलं होतं. पण प्रणिती आपल्या विजयाची मालिका सुरूच ठेवली होती."
2014 तसंच 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत वडिलांचा पराभव होऊनसुद्धा प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत आपली जागा राखली.
मंत्रिपदाऐवजी कार्याध्यक्षपद?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण सत्तावाटपाच्या समीकरणात प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.
पण मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज असल्याबाबत त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही. किंवा कुठेही सार्वजनिकरीत्या याची वाच्यताही केली नाही. काँग्रेस पक्षानेही हा विषय फारसा ताणू न देता त्यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
प्रणिती शिंदे यांना कार्याध्यक्षपद मिळणं ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नच आहे, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने यांच्या मते, "प्रणिती शिंदे यांना कार्याध्यक्षपद देणं यामागे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच असू शकतो.
याविषयी माहिती देताना माने सांगतात, "प्रणिती शिंदे यांना काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नेमून काँग्रेस पक्ष त्यांची नाराजी दूर करू पाहत आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये मूळातच काँग्रेसच्या वाट्याला कमी मंत्रिपदं आली आहेत. यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे प्रणिती शिंदे यांचं नाव मागे पडलं होतं. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती. आता त्यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांना आनंद वाटेल."
"प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. कारण त्या सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मंत्रीपद मिळावं म्हणून त्यांच्या समर्थकांनी उपोषणं केली, सामूहिक राजीनाम्याचं शस्त्रही उपसलं होतं. पण, त्यांना डावलण्यात आलं होतं," असं मत सोलापूरमधील पत्रकार सागर सुरवसे व्यक्त करतात.
सोलापुरातील अॅक्टिव्ह काँग्रेस चेहरा
सोलापुरातील काँग्रेसचा विचार केल्यास प्रणिती शिंदे यांच्याशिवाय इतर कुणी मोठं सक्रिय नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही.
जाई-जुई या एनजीओ आणि बचतगटांच्या माध्यमातून त्या सोलापूर जिल्ह्यातील युवक आणि महिलांपर्यंत पोहोचल्या आहेत.
त्यामुळे प्रणिती यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढीकडे लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जात आहे.
सागर सुरवसे यांच्या मते, "प्रणिती शिंदे यांच्याकडे मंत्रिपद नसलं तरी कार्याध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या एकमेव आमदार असल्यामुळे त्याचा फायदा पक्षाला नक्की होईल. जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)