कोरोना व्हायरस: लाँग कोव्हिडचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

"मला धावणं, सायकल चालवणं आवडतं. गेल्या वर्षीपर्यंत मी मॅरेथॉनमध्येही आरामात धावत होतो, पण आता शंभर पावलं चालल्यावरही दम लागतो. मी कधी बरा होणार आहे? आजारातून बरं झाल्यावरही आजारपणानं पाठ सोडलेली नाही. कितीही सकारात्मक विचार केला तरी निराशा दाटून येतेच कधीकधी."

45 वर्षांचे महेश त्यांचा अनुभव सांगतात. एका बँकेत नोकरी करणाऱ्या महेश यांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोव्हिडची लागण झाली होती. दोन आठवड्यांनी ते त्यातून बरे झाले, पण दोन महिने खोकला सुरूच होता. आठ महिन्यांनंतरही त्यांना सतत थकवा जाणवतो, कधी कधी श्वास घेताना त्रास होतो आणि धापही लागते.

महेश यांना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रासही जाणवू लागला आहे आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही झाला.

महेश यांना जाणवणाऱ्या लक्षणांना 'लाँग कोव्हिड' म्हणून ओळखलं जातं. म्हणजे कोव्हिड होऊन गेल्यावरही किंवा विषाणू शरीरातून नष्ट झाल्यावरही पुढचे काही महिने जाणवत राहणारी लक्षणं. अशा लांबलेल्या कोव्हिडनं शारिरीक त्रास तर होतोच, पण मानसिक ताणतणावातही वाढ होते आहे.

लाँग कोव्हिड आणि मानसिक समस्या

कोव्हिडमुळे होणाऱ्या मानसिक त्रासांची विभागणी काही मानसशास्त्रज्ञ ढोबळमानानं तीन प्रकारांत करतात-

1. थेट मेंदू किंवा चेतासंस्थेवर झालेले परिणाम,

2. हॉस्पिटल किंवा आयसीयूमधल्या विलगीकरणाचे परिणाम आणि

3. दीर्घकाळ आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या

साताऱ्यात राहणारे डॉ. अजिंक्य सांगतात, "कोव्हिड केवळ एक विषाणूमुळे होणारा संसर्ग नाही, तर त्यात मानसिक आजाराचा आणि मानसोपचारांचाही भाग येतो. डॉक्टर उपचार करत असतात, पण रुग्ण मानसिकदृष्ट्या जितकं सकारात्मक राहतील, तितकं यातून लवकर बाहेर पडू शकतात."

डॉ. अजिंक्य स्वतः कोव्हिड रुग्णांवर उपचार करत होते, तेव्हाच त्यांनाही कोव्हिडची लागण झाली होती. "दहा दिवस हॉस्पिटलमध्ये काढणं हा तुरुंगवासच वाटतो. घरातले कुणी भेटत नाहीत. जेवणाचा डबा घरून आला, तरी त्याला चव नसते, नीट जेवण होत नाही, त्यामुळे आधीचे मानसिक आजार बळावू शकतात, किंवा नवीन आजार होऊ शकतात."

लक्षणं जितकी लांबतात, तितक्या मानसिक समस्याही वाढत जातात. विशेषतः आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागलेल्या व्यक्तींना PTSD (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) सारख्या मानसिक समस्या जाणवत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे.

महेश यांनाही याच त्रासातून जावं लागलं. ते तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यातले दहा दिवस त्यांना आयसीयूमध्येही ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. आसपास सगळेच लोक पीपीई घालून असल्यानं बरेच दिवस जवळून माणसांचा चेहराही पाहता आला नाही असं ते सांगतात.

"मी जवळपास रोजच कुणाला ना कुणाला प्राण सोडताना पाहिलं होतं. बरं होऊन घरी आल्यावरही मला रात्र रात्र झोप लागत नसे. कधी कधी तर दचकून जागा व्हायचो. आपल्याला नेमकं काय होतंय हेच कळत नव्हतं. बेचैन, निराश वाटायचं आणि विनाकारण चीडचीड व्हायची."

महेश पुढे सांगतात, "मी आयसीयूमध्ये भीतीदायक गोष्टी पाहिल्या आहेत. मला त्या विसरायच्या आहेत. पण लाँग कोव्हिडमुळे मी अजूनही त्या भीतीच्या सावटाखाली असतो."

दोन महिन्यांनी खोकला कमी झाल्यावर महेश पुन्हा ऑफिसला जाऊ लागले, पण बराच वेळ एका जागी बसून अंग दुखू लागायचं. त्यामुळे कामातही उत्साह वाटेनासा झाला आणि ताण आणखी वाढत गेला. नैराश्याची लक्षणं दिसू लागल्यावर त्यांनी मदत घ्यायचं ठरवलं.

समुपदेशन आणि मनोविकारतज्ज्ञांनी दिलेली औषधं घेऊ लागल्यापासून महेश यांना फरक जाणवतो आहे.

पण लांबलेल्या कोव्हिडच्या मानसिक परिणामांचा सामना कसा करावा, किंवा अशा समस्यांतून जात असलेल्या व्यक्तींसोबत राहणाऱ्यांनी काय करायला हवं याविषयी अजूनही जागरुकता निर्माण व्हायला हवी, असं त्यांना वाटतं.

नवा आजार, नव्या मानसिक समस्या

खरं तर कोव्हिड हा अजूनही नवा आजार आहे. त्याच्याविषयी रोज नवी माहिती समोर येते आहे, तसे लांबलेल्या कोव्हिडचे नेमके परिणाम दिसू लागले आहेत आणि लाँग कोव्हिडमुळे होणाऱ्या मानसिक समस्यांविषयीही आता कुठे माहिती मिळू लागली आहे.

योगिता यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवरच कोव्हिडमुळे परिणाम झाला आहे. त्यांना ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. एक दिवस आलेला ताप आणि अंगदुखी यांशिवाय त्यांना कुठल्या गंभीर समस्या जाणवल्या नाहीत. फक्त दोन आठवडे त्यांची वास घेण्याची क्षमता पूर्णपणे गेली होती.

त्या सांगतात, "जवळपास दोन महिन्यांनी मला अधुनमधून जळकट वास येऊ लागला. आधी मला कळतही नव्हतं की असं का होतंय. मी इंटरनेटवर एक लेख वाचला, तेव्हा पॅरॉस्मियाविषयी माहिती मिळाली."

पॅरॉस्मिया म्हणजे वस्तूंचा वास नेहमीसारखा न येता काहीतरी उग्र दर्प किंवा किळसवाणा वास येणं. असं काही झालं, तर त्याचा परिणाम तुमच्या जेवणावरही होतो, कारण कुठल्याही खाद्यपदार्थाची चव त्या पदार्थाच्या वासावरही अवलंबून असते.

"मी एक फूडी आहे. पण आता मला अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही. दररोज काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला अशा वासामुळे खावीशी वाटन नाही, याची जाणीव होते आणि त्याचा मानसिक त्रासही होतो. मला चॉकलेट आवडतं, पण आता मला त्याचा जळकट वास येत असल्यानं मी ते खाऊच शकत नाही. असं काही झालं की मनच उडतं, हे पुन्हा पूर्वीसारखं कधी होणार असा प्रश्न पडतो."

कोव्हिडच्या अशा परिणामांविषयी फारशी माहिती नसल्यानं त्यातून जाणाऱ्या काहींना असहाय्य वाटू शकतं. पण योगिता यांनी त्यातून मार्ग काढला आहे. त्यांच्यासारखाच पॅरॉस्मिया झालेल्या लोकांच्या फेसबुक ग्रुपमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत.

"तिथे लोक आपल्या अनुभवांविषयी लिहितात. कुणाची वास घेण्याची क्षमता काही महिन्यांनी परतली आहे. माझ्या बाबतीतही असं होईल अशी मी अपेक्षा करते. वास ओळखण्याचं ट्रेनिंग स्वतःला देते आहे."

सकारात्मक विचार फायद्याचा

काही अभ्यासक कोव्हिडच्या सकारात्मक परिणामांकडेही लक्ष वेधतात.

स्टीव्हन टेलर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये मानसोपचार विषयाचे प्राध्यापक आहेत आणि 'सायकॉलॉजी ऑफ पँडेमिक्स' या पुस्तकाचे लेखक आहेत. कोव्हिडनं लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी बोलतं केलं आहे, एवढ्या मोठ्या संकटातून सावरल्यावर अनेकजण सकारात्मकतेनं जगण्याकडे पाहू लागले आहेत, याकडे ते लक्ष वेधतात.

पण कोव्हिडची लक्षणं लांबली, तर याच सकारात्मक विचारांवरही त्याचा परिणाम होतो.

मनोविकारतज्ज्ञ डॉ. अक्षता भट यांनाही वाटतं. त्या म्हणतात, "लोकांना येणारे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्याचा सामना करण्याची त्यांची पद्धतही वेगळी असते."

लाँग कोव्हिडचा सामना करताना मानसिक आरोग्य कसं उत्तम ठेवायचं? डॉ. अक्षता भट सांगतात, की काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि समुपदेशक किंवा डॉक्टर्सची मदत घेतली तर लाँग कोव्हिडमध्ये मन:स्वास्थ्य चांगलं ठेवता येईल.

- साध्या साध्या गोष्टींनीही मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे एक शेड्यूल किंवा दिनक्रम ठरवा आणि तो नियमितपणे पाळा

- योग्य आहार अतिशय महत्त्वाचा आहे. शरीराची ताकद वाढण्यासाठी आणि मनासाठीही.

- पाणी प्यायला विसरू नका. कुठल्याही विषाणूजन्य आजारातून बरं होताना पाणी पिणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं थकवा कमी होऊ शकतो, तरतरी येते.

- थकवा जाणवत असला, तरी थोडाफार हलका व्यायाम करा. शरीराची हालचाल होत राहणं गरजेचं आहे.

- विलगीकरण संपलं असेल, तर तुम्ही बाहेरही पडू शकता. गर्दी नसेल अशा ठिकाणी चालण्यासाठी जाणं किंवा निसर्गाच्या जवळ काही काळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी एरवीही चांगलंच.

- शक्य असेल तर सकाळचं कोवळं ऊन येईल अशा जागी काही वेळ घालवा.

- ध्यान किंवा प्राणायाम केल्यानंही मदत होते.

- खोलवर श्वास घेण्याचा सराव करा. त्यामुळे चिंता किंवा ताण कमी होण्यास मदत होते.

- सकारात्मक गोष्टींवर भर द्या, म्हणजे नैराश्यावर मात करणं सोपं जाईल.

- एखादा छंद जोपासा, तुमच्या मनाला उभारी देणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा.

- तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांसाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमितपणे घ्यायला विसरू नका.

- योग्य आणि शांत झोप मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आजारातून बरं होण्यासाठी मदत करते.

- गरज भासल्यास समुपदेशकांची किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)