शेतकरी आंदोलन: गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर बॅरिकेडिंग कशासाठी?

    • Author, टीम बीबीसी
    • Role, दिल्ली

संयुक्त किसान मोर्चानं सहा फेब्रुवारीला सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर तीन तासांसाठी 'रस्ता रोको' आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सोमवारी (1 फेब्रुवारी) संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेऊन शेतकरी नेत्यांनी 6 फेब्रुवारीला 12 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर रस्ता रोको करणार असल्याचं जाहीर केलं.

सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचंही शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

"26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर अनेक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. सीमांवर रस्ते बंद करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आजूबाजूच्या परिसरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. इथलं पाणी आणि वीजही तोडण्यात आली आहे. शौचालयाची व्यवस्थाही बंद केली जात आहे," असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं.

आंदोलनाच्या समर्थनासाठी येत असलेल्या लोकांना अडवलं जात असल्याचाही आरोप या नेत्यांनी केलं.

गाझीपूर, सिंघू आणि टिकरी या दिल्लीला लागून असलेल्या तिन्ही सीमांवर सोमवारी (1 फेब्रुवारी) सकाळी पोलिस प्रशासनाने रस्ता बंद केला होता. त्यामुळे या तिन्ही मार्गांवर ट्रॅफिक जामची परिस्थिती पहायला मिळाली.

या सीमांवर पोलिसांनी बॅरिकेडिंगही केलं होतं. तिन्ही सीमांवर बॅरिकेडिंगची काय परिस्थिती आहे आणि त्यासंबंधी शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? गाझीपूर सीमेवरून बीबीसी हिंदीसाठी समीरात्मज मिश्र यांनी घेतलेला आढावा-

गाझीपूर बॉर्डरवर जिथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथे रविवार (31 जानेवारी) संध्याकाळपासूनच सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशकडून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे उभे करण्यात आले आहेत. पायी जाण्यासाठीचे अनेक रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेलं आंदोलन कव्हर करत असलेले पत्रकार प्रभाकर मिश्र सांगत होते, "मी आज सकाळी दोन तासांपासून रस्ता शोधत होतो.

"या भागातील डीसीपींकडेही मी मदत मागितली. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्नही केला, पण मी ट्रॅफिक जाममध्ये अडकलो आणि इतर लोकांप्रमाणेच इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रस्ता सापडतोय का हे शोधायला लागलो," मिश्र सांगतात.

दिल्लीहून युपीकडे येणारा केवळ एकच रस्ता खुला करण्यात आला आहे, जो आनंद विहारवरून गाझियाबादकडे येतो. इकडेही केवळ एकच रस्ता खुला असून त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा आहेत.

पोलिसांनी अशा प्रकारचा कडेकोट बंदोबस्त का केला आहे, याचं उत्तर दिल्ली पोलिसांचे अधिकारी देत नाहीयेत. आम्हाला 'वरून आदेश आले आहेत' हे उत्तर तिथे असलेले पोलिस अधिकारी देतात. तिथे उपस्थित असलेल्या तरुणांनी सांगितलं की, इथून पुढे कोणी जाऊ शकत नसल्याचं आम्हाला सांगण्यात आलंय. आम्हाला इथं लक्ष ठेवण्यासाठी नेमलं आहे.

गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी पुन्हा जमायला लागल्यापासून इथं गर्दी वाढत चालली आहे. आता तंबू वाढवू नयेत म्हणून पोलिसांनी कडेकोट सुरक्षा वाढविली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

या भागातले बरेचसे लोक दिल्लीमध्ये काम करतात आणि वसुंधरा, वैशाली, इंदिरापुरम, कौशांबी या भागांमध्ये राहतात. रस्ते बंद असल्यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

नोएडा सेक्टर 62 इथून रेल्वेची परीक्षा देऊन येत असलेल्या मनीष यादव यांनी बीबीसीला सांगितलं, "मी तर इथेच राहतो. मला चालत जाण्यासाठी रस्ते माहीत आहेत. मात्र अनेक लोक खूप वेळ झाला भटकत आहेत."

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आग्रही

सिंघु बॉर्डरवरून बीबीसीचे प्रतिनिधी खुशहाल लाली यांनी मांडलेली परिस्थिती.

सिंघू बॉर्डरवरही पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. दिल्लीहून सिंघू बॉर्डरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अलीकडेच बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. काही ठराविक गाड्यांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र माध्यमांच्या गाड्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये.

सिंघू बॉर्डरजवळ रस्ता खोदण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या स्टेजच्या आधी किसान संघर्ष समितीचं स्टेज आहे. याच स्टेजवर दोन दिवसांपूर्वी दगडफेक करण्यात आली होती. इथेच सीमेंट आणि सळ्या टाकून बॅरिकेडिंग केलं गेलंय.

सिंघू बॉर्डरकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. नरेलाकडून आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असलेल्या 46 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

सिंघू बॉर्डरवर उपस्थित असलेले शेतकरी नेते सुरजित सिंह ढेर यांनी सांगितलं की, "अमेरिका आणि मॅक्सिकोदरम्यान जशी भिंत उभी करण्याची घोषणा ट्रंप यांनी केली होती, तशीच भिंत दिल्ली आणि हरियाणा सीमेवर उभी करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहे.

जम्हूरी किसान सभेचे अध्यक्ष सतनाम सिंह पन्नू यांनी म्हटलं, "सरकारनं इंटरनेट बंद करून आणि बॅरिकेड्स उभारून शेतकरी आंदोलनाच्या बातम्या बाहेर येऊ नयेत याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार आपल्या हातातील प्रचार यंत्रणांचा वापर करून शेतकरी आंदोलनाचा जोर ओसरत असल्याचंही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण असं नाहीये. हरियाणा आणि पंजाबहून शेतकरी सातत्यानं येत आहेत."

"सरकार माणुसकीला सोडून पावलं उचलत आहे. वीजेचं कनेक्शन तसंच पाणी तोडणं, इंटरनेट बंद करणं अशा गोष्टी केल्या जात आहेत. आता सरकार बॅरिकेडिंग करत आहे. सरकारला हे बंद करायला हवं. जर सरकारला चर्चा करायची असेल तर आधी त्यांनी तसं वातावरण तयार करायलं पाहिजे," असं संयुक्त किसान मोर्चाचे नेते सतनाम सिंह अजनारांनी सांगितलं.

सतनाम सिंह पन्नू यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "अशाच तऱ्हेचं बॅरिकेडिंग टिकरी, सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर करण्यात येत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र आम्ही खूप उत्साही आहोत. तिन्ही कृषी कायदे रद्द करून आणि एमएसपीचा कायदा मान्य करून घेतल्यावरच आम्ही परत जाऊ."

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे स्थानिक लोकांना कोणताही त्रास होत नाहीये. मात्र 26 जानेवारीनंतर सरकारकडून बॅरिकेडिंग वाढवण्यात आलं आहे, असं सिंघू बॉर्डरवरील एक स्थानिक युवक सागरनं सांगितलं.

सिंघू बॉर्डरवर सोनिपतहून शंभर महिलांचा एक जत्था ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून आला आहे. या महिलांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "मोदी सरकार आमचा विश्वास डळमळीत करू शकत नाही. आम्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय जाणार नाही."

टिकरी बॉर्डरवर काय आहे परिस्थिती?

टिकरी बॉर्डरहून बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी घेतलेला आढावा.

टिकरी बॉर्डरवर पोलिसांनी काँक्रिटचे स्लॅब लावले आहेत. रस्त्यावर टोकदार सळ्याही रोवल्या आहेत, जेणेकरून वाहनं पुढे जाऊ शकणार नाहीत. त्याचसोबत इथलं इंटरनेट दोन फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यासाठीही सरकारनं परवानगी दिली आहे.

बॉर्डरवर असलेले शेतकरी हे षड्यंत्र असल्याचं समजत आहेत. किसान सोशल आर्मीशी संबंधित असलेले अनुप चनौत सांगतात, "जे सरकार आम्ही केवळ एका फोन कॉलवर उपलब्ध असल्याचं सांगत आहे, तेच सरकार असे बॅरिकेड्स लावत आहे."

चनौत सांगतात, "आम्ही शांततेनं आंदोलन करत आहोत आणि इथेच बसून राहू. पण जर आम्हाला संसदेला घेराव घालण्यासाठी पुढे जायचं असेल तर हे बॅरिकेड्स आम्हाला अडवू शकणार नाहीत. सरकार षड्यंत्र रचत आहे."

ते सांगतात, "इंटरनेट बंद केलं गेलंय. आम्ही महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीये. आता तर ट्वीटरवरूनही शेतकरी आंदोलनाचे अकांऊट्स बंद केले गेले आहेत. लोकशाहीमध्ये आमचा आवाज दाबण्यात येत आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या आहे. पण तरीही आम्ही इथेच राहून आंदोलन करू."

दिल्ली पोलिसांचे जॉइंट कमिशनर (नॉर्दन रेंज) एसएस यादव यांनी बीबीसीशी बोलताना सिंघू बॉर्डरवर अतिशय कडेकोट बंदोबस्त केल्याचं मान्य केलं आहे. मात्र नेमके किती पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, याचा आकडा त्यांनी सांगितला नाही. ही संवेदनशील माहिती असल्याचं सांगत त्यांनी संख्या सांगायला नकार दिला. सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचंही यादव यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)