शेतकरी ट्रॅक्टर रॅली: शेतकरी दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न का करत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज (26 जानेवारी) ट्रॅक्टर रॅली काढली. दिल्लीत सव्वा लाख ट्रॅक्टर या रॅलीसाठी आले असल्याचा अंदाज आहे. पण या रॅलीला अचानक हिंसक वळण लागले.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना ट्रॅक्टर रॅलीसाठी तीन मार्ग निश्चित करून दिले होते. पण काही शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मध्य दिल्लीकडे वळवला ज्या ठिकाणी ही रॅली काढण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट नकार दिला होता.
या परिस्थितीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण का लागले? 60 दिवसांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारा शेतकरी अचानक मध्य दिल्लीपर्यंत का पोहचला? दिल्लीच्या सीमेवर प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाचे धैर्य सुटले का? की यामागे काही वेगळी कारणं आहेत? मध्य दिल्ली हा परिसर संवेदनशील का आहे? या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
ट्रॅक्टर रॅलीबाबत पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये काय ठरले होते?
दिल्ली पोलिसांच्या परवानगीनेच शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढू शकतील अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांशी चर्चा करून ट्रॅक्टर रॅलीसाठी त्यांना तीन मार्ग निश्चित करून दिले.
पण पोलिसांनी रॅलीसाठी आखून दिलेली जागा काही शेतकरी संघटनांना मान्य नव्हती. हा परिसर हरियाणात येतो आणि आम्हाला दिल्लीत रॅली काढायची आहे असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमधील ठरलेल्या नियोजनानुसार 26 जानेवारीला राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची परेड सुरू होईल. शंभर किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर ही परेड थांबेल असे शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये ठरले.
ही परेड शांततामय पद्धतीने व्हावी यासाठी 2500 स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. त्यांना बॅच आणि ओळखपत्र देण्यात आलं.

सिंघू आणि टिकरी सीमेनजीक बॅरिकेड हटवण्यास दिल्ली पोलिसांनी होकार दिला. शांततामय पद्धतीने ट्रॅक्टर परेड आयोजित केली जाईल आणि सगळी माणसं आणि ट्रॅक्टर आंदोलनस्थळी परततील या हमीनंतर दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली.
ही एक ऐतिहासिक परेड असून यावेळी शांततेचे पूर्ण पालन केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमुळे प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही असंही शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले होते.
शेतकऱ्यांनी मध्य दिल्लीत पोहचण्याचा प्रयत्न का केला?
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात साधारण 60 दिवसांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर आजही शेतकरी संघटना ठाम आहेत.
शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात आतापर्यंत अकरा वेळ चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पण अद्याप तोडगा निघालेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
26 जानेवारीला प्रजासत्तान दिन असल्याने भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन महिनाभरापासून शेतकऱ्यांनी केले. पण ही ट्रॅक्टर रॅली मध्य दिल्लीत व्हावी यासाठी शेतकरी आग्रही का होते?
यासंदर्भात बोलताना बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी खुशहाल लाली सांगतात, "ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आपले म्हणणे सरकारपर्यंत अधिक तीव्रतेने पोहचेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण ही रॅली दिल्लीत व्हावी यासाठी काही संघटना आग्रही होत्या. किसान मजदूर संघर्ष समितीने आधीच इशारा दिला होती की ते रिंग रोड येथेच आंदोलन करतील. त्यामुळे त्यांची ट्रॅक्टर रॅली त्यादिशेने गेली. शिवाय, गाझीपूर बॉर्डरवरून काही युवा शेतकरी याठिकाणी पोहचले. थेट लाल किल्ल्यापर्यंत ही ट्रॅक्टर रॅली गेली."
दिल्ली पोलिसांची परवानगी नसताना मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि शेतकरी दिल्लीच्या दिशेने आल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले.
खुशहाल लाली पुढे सांगतात, "दोन महिन्यांपासून आपले घर, आपले शेत सोडून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अद्याप केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांचा संयम सुटला, युवा शेतकरी अधीर झाले असंही आपण प्रथमदर्शनी म्हणू शकतो. त्यामुळे कालपर्यंत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेले आंदोलन आज संघटनांच्याही नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येते."

सलग एवढ्या दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल संपूर्ण देशाने घेतली. अन्नदाता शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेत एक सहानुभूतीही दिसून आली. पण आता आंदोलन हिंसक झाल्याने ही प्रतिमा बदलणार का? आणि हे आंदोलन शमवण्याची संधी केंद्र सरकारला मिळाली आहे का?असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यासंदर्भात बोलताना खुशहाल लाली सांगतात, "आतापर्यंत शांततेत आंदोलन सुरू असल्याने केंद्र सरकारलाही कारवाई करण्याची संधी मिळत नव्हती. कायद्याच्या चौकटीत राहून शेतकरी आपले म्हणणे मांडत होते. पण आता सरकारला शेतकरी आंदोलनावर प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली. लाल किल्ल्यासारख्या राष्ट्रीय वास्तूपर्यंत ट्रॅक्टर रॅली विनापरवानगी पोहचल्याने सरकारलाही कारवाई करण्याची संधी मिळाली आहे. तसंच न्यायालयातही सरकारी बाजू अधिक बळकट झाली असेही म्हणता येईल."
पोलिसांनी मध्य दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी का नाकारली?
शेतकरी संघटनांना ही ट्रॅक्टर रॅली प्रजासत्ताक दिनी आयोजित करायची होती. प्रजासत्ताक दिनाचे नियोजन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीचे स्थान दिल्लीबाहेरचे निश्चित केल्याचे सांगितले.

किसान मजदूर संघर्ष समितीने बीबीसी पंजाबीशी बोलताना सांगितलं की ते आधी ठरलेल्या रूटवरच ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. दिल्लीभोवतीच्या रिंग रोडवर फेरी मारून परत जातील असे संघटनेकडून ठरवण्यात आले. पण शेतकरी मध्य दिल्लीतील ITO परिसरात पोहचले आणि पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न सुरू केला.
दिल्लीच्या ज्या भागात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा प्रयत्न केला तो मध्य दिल्लीत येतो. याठिकाणी इंडिया गेट, संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या वास्तू एकमेकांपासून अवघ्या एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. हा परिसर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








