You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विस्मया : चिखलाने भरलेल्या ट्रॅकवर सराव केलेली अॅथलिट ऑलिम्पिक खेळणार
'मी अपघाताने अॅथलिट झाले आहे,' असं 23 वर्षीय विस्मया सांगते. केरळमधल्या कण्णूर इथं जन्मलेल्या विस्मयाला अभियंता व्हायचं होतं. त्यासाठी ती अभ्यासही करत होती.
एकाक्षणी खेळांमध्ये 'मध्यम स्वरुपाची कामगिरी करणारी खेळाडू' असं तिला स्वत:बद्दल वाटत होतं. तिला कल्पनाही नव्हती की तिचं नाव आशियाई सुवर्णपदक विजेती म्हणून घेतलं जाईल.
विस्मयाची बहीण अॅथलिट होती. तिनेच विस्मयाला अॅथलेटिक्सकडे वळण्यासाठी प्रेरित केलं. हळूहळू शाळेतील क्रीडा शिक्षक आणि नंतर महाविद्यालयातील प्रशिक्षकांच्या मदतीने तिने खेळातले बारकावे शिकून घेतले.
चंगनाचेरी इथलं असेंशन महाविद्यालय अव्वल दर्जाचे अॅथलिट घडवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
अॅथलिट म्हणून विस्मयाच्या कारकीर्दीची सुरुवात 2014 मध्ये केरळसाठी दोन सुवर्णपदकं जिंकून झाली. 2021 ऑलिम्पिकमध्ये ती देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे.
अभियंता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विस्मयाने अॅथलिट होण्याचा घेतलेला निर्णय सोपा नव्हता.
अवघड निर्णय
विस्मयाचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत तर आई गृहिणी आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती बेतास बेत आहे. त्यामुळे अॅथलेटिक्ससाठी इंजिनियरिंगचं शिक्षण सोडण्याचा मुलीचा निर्णय निश्चितच सोपा नव्हता.
दोन्ही मुलींनी अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवण्याचा घेतलेला निर्णय एक अत्यंत अवघड निर्णय होता, असं विस्मया सांगते. त्यांनी त्यांच्यापरीने सर्वतोपरी मदत केली.
सुरुवातीच्या काळात सिथेंटिक ट्रॅक आणि अत्याधुनिक व्यायाशाळा हे विस्मयाच्या नशिबी नव्हतं. त्यांना चांगल्या सुविधांऐवजी चिखलाने भरलेल्या ट्रॅकवर प्रशिक्षण घ्यावं लागलं. पावसाळ्याच्या दिवसात अशा ट्रॅकवर सराव करणं खूप कठीण होतं.
कोणत्याही खेळाडूला चांगली कारकीर्द घडवण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा, संसाधनं आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मात्र आपल्या देशात याचा अभाव आहे असं विस्मयाला वाटतं.
या सगळ्या कारणांमुळे अॅथलिट दुखापतग्रस्त होण्याची शक्यता असते. विस्यमाने याचा स्वत: अनुभव घेतला आहे.
विस्मयाने धावपटू म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र दुखापतींमुळे त्यांना बदल करावा लागला.
सुवर्णपदक जिंकलं आणि ओळख मिळाली
2017 मध्ये विस्मयाच्या कारकीर्दीतील एक संस्मरणीय क्षण आला. विस्मयाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महाविद्यालयीन स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावून 25 वर्ष जुना विक्रम मोडला.
त्याच अजिंक्यपद स्पर्धेत तिने 400 मीटर शर्यतीत रौप्यपदकही पटकावलं होतं. तेव्हापासून लोक तिला ओळखू लागले.
या दमदार कामगिरीमुळे विस्मयाचा राष्ट्रीय शिबिरात सुकर होऊ शकला. आधुनिक सोयीसुविधा आणि प्रशिक्षण मिळू लागलं.
यानंतर विस्मयाने 4*400 मीटर रिले प्रकारात सहभागी व्हायला सुरुवात केली. अल्पावधीत ती राष्ट्रीय संघाचा भाग झाली.
2018मध्ये जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं. विस्मया त्या संघाचा भाग होती.
2019मध्ये विस्मया दोहा इथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मिक्स्ड रिले शर्यतीत सहभागी झाली. संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.
सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि अपयशाने खचून जाणार नसाल तर तुमचे कच्चे दुवे तुमची ताकद बनू शकतात यावर विस्मयाचा विश्वास आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)