कोरोना लस: महाराष्ट्रात उद्यापासून आठवड्यातील 4 दिवस लसीकरण

महाराष्ट्रात उद्यापासून (19 जानेवारी) आठवड्यातील चार दिवस लसीकरण मोहीम राबवली जाईल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी अशा चार दिवशी लसीकरण केले जाईल.

कोरोना लसीकरणाचा आढावा आज (18 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

मुंबईतील वर्षा या निवासस्थानातील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

"आठवड्यातील चार दिवस राज्यातील 285 केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

"लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. ह्या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील," असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

"कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायू दुखी यासारखे प्रतिकुल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या," अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

"जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोविन अॅपची गती कमी - टोपे

कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस मुंबईसह राज्यात लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली होती.

मंगळवारपासून लसीकरण सुरू होणार का? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. "कोविन अॅप थोडं स्लो झालं होतं. त्यातील सेशन्स लवकर उघडत नव्हते. त्यामुळे आम्ही लसीकरण ऑफलाइन करण्याची परवानगी मागितली होती. शनिवारी केंद्राने उशीराने मागणी मान्य केली."

शनिवारी (16 जानेवारी) कोविन अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत मेसेज पोहोचले नव्हते. केंद्राने लसीकरण ऑफलाइन करू नये अशी सूचना जारी केली होती.

50 वर्ष आणि त्यावरील इतर आजार असलेल्या लोकांची नोंदणी कधीपासून करायची याबाबत अजूनही स्पष्टता नाही असं टोपे म्हणाले.

केंद्राच्या आदेशानंतर थांबवली लसीकरण मोहीम

केंद्र सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील लसीकरण मोहीम रद्द करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

कोव्हिड-19 लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या कोविन अॅपमध्ये गोंधळ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "रविवारी (17 जानेवारी) आणि सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होणार नाही. कोविन अॅपमध्ये झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ऑफलाइन लसीकरणी करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत."

शनिवारी कोविन अॅपमध्ये गडबडीमुळे लसीकरणासाठी डॉक्टरांना उशीरा मेसेज गेल्याचं राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी मान्य केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)