कोव्हिड 19 लसीकरणासाठीचं कोविन अॅप इतक्यात का डाऊनलोड करू नये?

लस आल्याच्या बातम्या सगळीकडे झळकतायत, लसीकरणासाठीचे ड्राय रन्स केले जातायत म्हणून ही लस घेण्यासाठी अॅप डाऊनलोड करून नोंदणी करायच्या तयारीत असाल, तर ते धोकादायक ठरू शकतं.

भारत सरकारने लसीकरण मोहीमेसाठी तयार केलेल्या अॅपची सगळीकडे चर्चा सुरू असली ते हे अॅप अजून लाँच करण्यात आलेलं नाही. पण याच नावाची इतर अॅप्स मात्र आलेली आहेत

Co-WIN काय आहे?

भारतातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक प्लॅटफॉर्म विकसित केलाय. याचं नाव - Co-WIN. म्हणजेच Covid Vaccine Intelligence Work.

पण सरकारचं हे अॅप अजून लाँच झालेलं नाही.

म्हणूनच तुम्हाला जर प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोरला Cowin या नावाची काही अॅप्स दिसत असतील, तर ते भारत सरकारचं अॅप नाही. ही अॅप बनावट असू शकतात आणि इथे तुम्ही जर स्वतःची माहिती भरलीत तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं खुद्द सरकारने म्हटलंय.

भारत सरकारचा Co-WIN हा प्लॅटफॉर्म अजून सरकारी वापरापुरतीच मर्यादित आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर सध्या सरकारी अधिकाऱ्यांद्वारे अशा लोकांची नोंदणी कऱण्यात येतेय, ज्यांना सगळ्यात आधी लस देण्यात येणार आहे.

म्हणूनच सामान्यांकडे सध्यातरी अॅप डाऊनलोड करून लशीसाठी नावनोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करायचा पर्याय नाही.

या कोव्हिड वॅक्सिन इंटेलिजन्स वर्क म्हणजे को-विनचा वापर सरकार आणि आरोग्य यंत्रणेतले अधिकारी लसीकरणाची एकूण प्रक्रिया आणि लशींचे डोस यांचे रियल टाईम अपडेट्स घेण्यासाठी करणार आहेत.

देशातल्या लसीकरणातल्या पुढच्या टप्प्यांमध्ये हे को-विन अॅप सार्वजनिक वापरासाठी आणि व्यक्तिगत नोंदणीसाठी लाँच करण्यात येईल.

कसं असेल Co-WIN अॅप?

लाँच झाल्यानंतर या अॅपमध्ये 5 मॉड्यूल्स असतील. आणि त्यामध्ये 12 भाषांचा पर्याय असेल.

अॅडमिनिस्ट्रेटर, रजिस्ट्रेशन, व्हॅक्सिनेशन, अॅक्नॉलेजमेंट आणि रिपोर्ट अशी ही पाच मॉड्यूल्स असतील.

देशातला लसीकरणाचा पहिला टप्पा हा आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच आहे. आणि Co-WIN वर त्यांची नोंदणी प्रशासन करतंय. त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्ती आणि को-मॉर्बिडीटीज असणाऱ्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना लस देण्यात येईल.

त्या पुढच्या टप्प्यामध्ये लसीकरण सर्वासाठी खुलं झाल्यावर या अॅपवर इतरांनाही लस घेण्यासाठी नाव नोंदता येईल.

या अॅपवर नोंदणी केल्यानंतर ऑटोमेटेड सिस्टीम लस घेण्यासाठीचा एक स्लॉट तुमच्यासाठी राखून ठेवेल. या नोंदणीसाठी तुमचा आधार क्रमांक - Photo Identification गरजेचं असेल.

या प्लॅटफॉर्मवर नोंदणी होणाऱ्या सगळ्या डेटाची छाननी होईल आणि दुबार नोंदणी किंवा बोगस नोंदणी होणार नाही, याची खात्री केली जाईल.

पहिला डोस देण्यात आल्यानंतर तुम्हाला कधी येऊन दुसरा डोस घ्यायचाय, हे देखील अॅप सांगेल.

लशीचे दोन्ही डोस देण्यात आल्यानंतर तुम्हाला QR कोडच्या स्वरूपातलं व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि DigiLocker नावाचं अॅप वापरून तुम्ही हे सर्टिफिकेट सेव्ह करून ठेवू शकता.

शिवाय या Co-WIN अॅपची एक 24 तास सुरू असणारी हेल्पलाईनही असेल.

लस घेतल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास झालाच, तर ते देखील या अॅपवरून कळवता येईल.

कोव्हिडवरची लस आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी मोफत असेल, हे सरकारने जाहीर केलंय. पण इतरांसाठी या लशीची किंमत काय असेल हे सरकारने अजून जाहीर केलेलं नाही. या अॅपद्वारे पेमेंट करता येणार का, हे देखील अजून स्पष्ट नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)