You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातही 'बर्ड फ्लू', परभणीत कोंबड्या, तर मुंबईत बगळ्यांमध्ये आढळला संसर्ग
महाराष्ट्रातही 'बर्ड फ्लू' चा शिरकाव झाला आहे. परभणीतील एका फार्ममध्ये मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रविवारी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने महाराष्ट्रातील मृत पक्षांचे नमुने 'बर्ड फ्लू' साठी पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला.
हरियाणा, केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये याआधी 'बर्ड फ्लू' चा संसर्ग पसरल्याचं स्पष्ट झालं होतं.
महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'
महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाला आत्तापर्यंत 1600 च्या वर पक्षी मृत झाल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात परभणी, मुंबई, ठाणे आणि दापोलीमध्ये पक्षांमध्ये 'बर्ड फ्लू' चा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालंय.
राज्यातील 'बर्ड फ्लू' च्या परिस्थितीबाबत बोलताना पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे म्हणाले, 'महाराष्ट्रात परभणी, मुंबई आणि ठाण्यात मृत पक्षांमध्ये 'बर्ड फ्लू' चा संसर्ग असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.'
ते पुढे म्हणाले, 'परभणीत फार्ममध्ये कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. तर, मुंबई, ठाण्यात बगळे आणि कावळे मृतावस्थेत आढळून आले. यांना H5N1 एवियन इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झाला आहे.'
कोकणातील दापोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्षांनाही बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालंय.
राज्य सरकारची उपाययोजना
राज्यात 'बर्ड फ्लू' चा संसर्ग पसरू नये. यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्यात. त्या परिसरातील कोंबड्यांना मारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबत बोलताना पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे सांगतात, 'परभणीत ज्या फार्ममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू' ची लागण झाली. त्याच्या 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारल्या जातील. मुंबई, ठाण्यात ज्या ठिकाणी बगळे आणि कावळे मृतावस्थेत आढळून आले त्याठिकाणी सर्वेक्षण केलं जाईल.'
राज्य सरकारच्या माहितीनुसार, परभणीत जवळपास 8000 कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारकडून मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत.
मार्गदर्शक सूचना
- सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लू बद्दल माहिती द्यावी
- पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी
- संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
- बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी
- जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी
- पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)