शेतीः एक मिलीमीटर आकाराच्या किड्यानं देशाची अर्थव्यवस्था कशी वाचवली?

    • Author, विल्यम पार्क
    • Role, बीबीसी फ्युचर

रासायनिक खतांचा शोध लागण्यापूर्वी शेतकरी किडीपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी कीड खाणाऱ्या छोट्या-छोट्या प्राण्यांवर अवलंबून असायचे. तीच पद्धत आता एका नव्या स्वरुपात समोर येत आहे.

दक्षिण-पूर्व आशियातील जैवविविधतेने नटलेल्या जंगलांमध्ये लाखो शेतकरी कसावा नावाच्या कंदाची शेती करतात. या कंदापासून साबुदाणा तयार केला जातो. एक-दोन एकर अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून ते हजारो एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सगळेच कसावाची शेती करतात.

कसावाच्या स्टार्चपासून प्लॅस्टिक आणि डिंक बनवतात. कसावा हे मूळचं दक्षिण अमेरिकेतील पीक. तिथून हे पीक आशियात आणण्यात आलं. पूर्वी कुठल्याही किटकनाशकांचा वापर न करता कसावाची शेती व्हायची.

2008 साली या पिकावर मिलिबग किडीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जंगलातल्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथे या पिकाची लागवड केली. अशा प्रकारे स्वतःच्या मालकीची नसलेल्या जमिनीवर लागवड करून ते जास्त उत्पन्न घेऊ लागले.

बिजींगमधल्या वृक्ष संवर्धन संस्थेत जैव नियंत्रण तज्ज्ञ असणारे क्रिस व्हाईसहायक सांगतात, 'काही जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू झाली.' कंबोडियामधल्या जंगलतोडीचा दर सर्वाधिक आहे.

मिलीबग किडीने कसावा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासोबतच या भागातील देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम केला. बटाटा, मका यासारख्या स्टार्चच्या पर्यायी स्रोतांचे दर वाढले. थायलँड जगात कसावा स्टार्च निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे याचे दर तिप्पट वाढले.

व्हाइसहाइस म्हणतात, "एखाद्या किडीमुळे 60 ते 70% लागवड नष्ट होत असेल तर त्याचा मोठा फटका बसतो."

या मिलीबग किडीचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण अमेरिकेत आढळणारा या किडीचा नैसर्गिक शत्रू एक मिलीमीटर लांबीचा गांधीलमाशीच्या प्रजातीतील एका परजीवी किटकाचा (एनागायरस लोपेजी) शोध घ्यायचा होता.

हा छोटा किटक कसावावरच अंडी घालतो. 2009 सालच्या अखेरीस हा किटक थायलँडमधल्या कसावाच्या शेतात सोडण्यात आला आणि त्याने तात्काळ काम सुरूही केलं.

हा किटक किती कालावधीत मिलिबग नष्ट करतो, यासंबंधीची शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. 2010 साली संपूर्ण थायलँडमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने हे किटक टाकण्यात आले आणि याचा परिणामही दिसून आला.

एक मिलीमीटरचा शिकारी किटक

1980 च्या दशकात हेच किटक पश्चिम आफ्रिकेत सोडण्यात आले होते. त्यांनीही अत्यंत कमी कालावधीत 80 ते 90 टक्के मिलिबग नष्ट केले होते.

3 वर्षांहूनही कमी कालावधीत हे किटक दक्षिण-पश्चिम नायजेरियातील 2 लाख चौरस किमी परिसरात पसरले. तिथल्या कसावाच्या शेतीत हे किटक सहज दिसतात.

अशाप्रकारच्या हस्तक्षेपाला जैव नियंत्रण म्हणतात. यात एका नैसर्गिक शिकाऱ्याला शोधून त्याला किडीचा नाश करण्यासाठी शेतात सोडलं जातं.

या पद्धतीमुळे एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील 28 देशांमधल्या शेतकऱ्यांना वार्षिक 14.6 अब्ज डॉलर्स ते 19.5 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला. व्हाईकहाइस म्हणतात, "एका मिलीमीटरच्या या किटकाने जागतिक स्टार्च बाजाराची मोठी समस्या दूर केली."

योग्य किटकाचे फायदे शेतकऱ्यांना अगदी पिढीजात अवगत असतात. जैव नियंत्रण हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि म्हणूनच ही काहीतरी नवी पद्धत आहे, असं माननं चुकीचं असल्याचं कॅनडातल्या ओंटारियोमध्ये वाईनलँड रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटरच्या शास्त्रज्ञ रोझ ब्युटेन्हस सांगतात.

मात्र, इथे प्रश्न असा उपस्थित होतो की जैव नियंत्रणाद्वारे किडींचा प्रादुर्भाव परिणामकारकरित्या दूर करता येत असेल तर संपूर्ण पिक नष्ट करणाऱ्या या किडींच्या बंदोबस्तासाठी त्यांचा वापर का होत नाही?

तोडगा की समस्या?

पूर्व-कोलंबियाचे मेसो-अमेरिकन लोक 'केन टोडला' (एकप्रकारचा मोठा बेडूक) जीवन आणि मृत्यूच्या मधलं मानायचे. हे बेडून एक विष तयार करायचे ज्यामुळे भ्रम व्हायचे.

मेसो-अमेरिकन पुजारी या विषाचा वापर पूर्वजांच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी करायचे. माया सभ्यतेचे लोक साप आणि चिमण्यांची पूजा करायचे आणि हे मेसो-अमेरिकन कलेतही दिसून येतं.

माया आणि इतर काही समुदायांनी या मोठ्या बेडकालाही आपल्या शिल्पात स्थान दिलं आहे. पाणी आणि जमीन दोघांवर राहणारी (उभयचर) आणि पावसात डराव-डराव असा मोठ-मोठ्याने आवाज करणारी ही बेडकं पिकांसाठी खूप गरजेची होती.

केन टोड बेडकं पिकांचं किडीपासून रक्षण करायचे. मक्याच्या शेतातले आणि धान्याच्या कोठारातले किडे-किटक ते फस्त करायचे. या केन टोडचं विष इतर प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करायचे. हे विष इतकं विषारी असतं की यामुळे माणसाचाही मृत्यू ओढावू शकतो.

मेसो-अमेरिकेतेल्या लोकांना निसर्गाची ही करणी कळली होती. निसर्गाशी छेडछाड केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हेदेखील त्यांना कळलं होतं.

मेसो-अमेरिकन लोकांना पूजनीय असलेल्या या बेडकाला ऑस्ट्रेलियात मात्र स्थान नाही. 1935 साली जैव नियंत्रणासाठीच ऑस्ट्रेलियाने अमेरिकेतून हे बेडूक मागवले होते. ऑस्ट्रेलियातल्या उत्तर-पूर्व भागातल्या ऊसाच्या मळ्यात हे बेडूक चांगलेच स्थिरावले.

त्या शेतांमध्ये या बेडकांचं आवडतं भक्ष असणारे किटक (केन बिटल आणि इतर काही किटक) मोठ्या प्रमाणात होते. शिवाय, या बेडकांची शिकार करणारे प्राणी तुलनेत खूप कमी होते. त्यामुळे त्या भागांमध्ये या बेडकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.

परिणाम भयंकर होते. देशी बेडकांची शिकार करणारे पालींसारखे प्राणी केन टोडच्या विषामुळे मरू लागले. ऑस्ट्रेलिया सरकार आणि स्थानिक दरवर्षी लाखो केन टोड मारतात.

कुठे चूक झाली?

व्हाइकहाइस म्हणतात, "त्यावेळी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत केन टोड ऑस्ट्रेलियात सोडण्यात आले आणि हे अजिबात करायला नको होतं. आधुनिक जैव नियंत्रणात, असं करणं अजिबात शक्य नाही. विविधभक्षी आणि हाडं असणाऱ्या शिकारी प्राण्यांना अशाप्रकारे सोडू शकत नाही."

हे एकमेव उदाहरण नाही. अशी कमीत कमी 10 उदाहरणं आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धात जपान आणि मित्रराष्ट्रांनी प्रशांत महासागरातील बेटांवरील आपल्या सैनिकांचा मलेरियापासून बचाव करण्यासाठी डासांचा लारव्हा खाणारे मासे सोडले होते.

हे छोटे मासे आता त्या भागातले आक्रमक जीव आहेत. हे मासे स्थानिक प्रजाती नष्ट करत आहेत. एफिड किड नियंत्रणासाठी युरोपात एशियन लेडिबग सोडण्यात आले. तिथेही हाच प्रकार आढळला.

अशा प्रकारच्या अपयशांनंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जैव नियंत्रणाऐवजी रासायनिक नियंत्रणाचा (किटकनाशक) वापर जोर धरू लागलं.

काही अपवाद वगळता जैव नियंत्रणासंबंधीचे वाद निराधार आहेत. जैव नियंत्रणाच्या यशोगाथा त्यांच्या अपयश गाथेच्या किमा 25 पट अधिक आहे.

किटकनाशक संपतील का?

1940, 50 आणि 60 च्या दशकात रासायनिक किटकनाशकांनी अनेक समस्या सोडवल्या. किटकनाशक फवारलं की किड नष्ट व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनतही वाचली.

मात्र, या प्रकारातली मोठी अडचण म्हणजे किडीची किटकनाशक प्रतिरोधी पिढी तयार होते. सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं किटकनाशक एखाद्या किडीवर परिणामकारक असेल तर त्याच किडीच्या पुढच्या पिढीवर ते किटकनाशक प्रभावी ठरेलच, असं नाही.

त्यामुळे किटकनाशक उत्पादकांना आपल्या उत्पादनात सतत सुधारणा करावी लागते. यामुळे किटकनाशक कमी होत चाललेत.

2018 साली युरोपीय महासंघाने नियो-निकोटिनॉयड नावाच्या तीन किटकनाशकांवर पूर्णपणे बंदी आणली.

निकोटीनसारखी रासायनिक संरचना असणारे हे किटकनाशक जमिनीतील बियाण्याचं किडीपासून रक्षण करतो. मात्र, रोप जसंजसं वाढतं तसं हे किटकनाशक झाडाची फुलं आणि परागकणांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे परागीकरण करणारे जीवही या किटकनाशकाच्या संपर्कात येतात.

मात्र, अशाप्रकारे बंदी आणल्यामुळे शेतकरी आता थेट झाडावर फवारणी करणारी औषधं वापरतील, असं काहींचं म्हणणं आहे. याचा परागीकरण करणाऱ्या किटकांवर पूर्वी व्हायचा तेवढाच परिणाम होईल. वर ही औषधं महागडी असल्याने शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागेल.

दुसरं म्हणजे कोस्टारिकातील पावसाळी वने आणि ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफमध्ये किटकनाशकांचे अवशेष आढळून आले आहेत. किटकनाशक चुकीच्या ठिकाणी पडले तर तिथल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम करू शकतात.

किटकनाशक शेतजमिनीजवळच्या वातावरणात मिसळून तिथल्या निसर्गसाखळीवर परिणाम करतात. जैव नियंत्रण पद्धतीत असा धोका नसतो, असं व्हाइसहाइस सारख्या काही शास्त्रज्ञांना वाटतं.

ब्रिटनमध्ये जैव नियंत्रक तयार करणारी कंपनी बायोलीन अॅग्रोसायंसेसच्या सीनिअर टेक्निकल हेड कॅरोलीन रीड यांचंही हेच मत आहे.

विशिष्ट जैव नियंत्रक रासायनिक किटकनाशकांची संख्या कमी करू शकतात. जैव नियंत्रक सुरक्षित आहेत आणि युरोपात पुन्हा एकदा त्यांचा प्रसार सुरू झाला आहे. युरोपात जैव नियंत्रक पुन्हा एकदा मुख्यधारेच्या शेतीचा भाग बनत आहेत.

जैविक नियंत्रण

ढोबळमानाने तीन प्रकारचे जैव नियंत्रक असतात - शिकारी, परजीवी भक्षक आणि पॅथोजन.

केन टोड बेडूक शिकारी जैव नियंत्रक श्रेणीत येतो. ते बिटल आणि लेडिबग किटक खातात. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियात त्यांनी पिकांसाठी हानीकारक असणाऱ्या या किटकांसोबतच हानीकारक नसणाऱ्या किटकांनाही खायला सुरुवात केली.

परजीवी भक्षकांमध्ये गांधीलमाशी प्रजातीचे काही किटक असतात जे आपली अंडी इतर किटकांच्या किंवा किडींच्या आत सोडतात. या अंड्यांचे लारव्हा तयार होताच ते किड्यांचं पोट फाडून बाहेर येतात आणि अशा प्रकारे पिकांसाठी हानीकारक किडींचा नाश होतो.

पॅथोजेन्स आपल्या यजमानालाच ठार करतो. पंगी, विषाणू किंवा जीवाणूंचा पॅथोजेन्समध्ये समावेश होतो. ते अत्यंत विशिष्ट किडींना लक्ष्य करतात आणि म्हणूनच आधुनिक जैव नियंत्रणात पॅथोजेन्स लोकप्रिय पर्याय आहेत.

हानीकारक नसलेल्या प्रजातींवर पॅथोजेन्स सहसा हल्ला करत नाहीत.

जैव नियंत्रक यशस्वी ठरण्यासाठीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रजनन दर उत्तम असायला हवा. शिवाय, कुठल्या किडी किंवा किटकांना लक्ष्य करायचं आहे, याचंही ज्ञान त्यांना हवं. तसंच त्यांच्यात शिकारीचं उत्तम कौशल्य असायला हवं.

खरं पाहता कुठलंही जैव नियंत्रक परिपूर्ण नाही आणि म्हणूनच संशोधकांना जोखिमीचं संतुलन साधावं लागतं.

जैव नियंत्रकाचा वापर कसा करावा?

कुठल्याही पिकावर जैव नियंत्रकाच्या वापराचे तीन प्रकार आहेत - पारंपरिक, संरक्षण दृष्टीकोन आणि सुधारित दृष्टीकोन.

केन टोड पारंपरिक जैव नियंत्रकाचं उदाहरण आहे. (मात्र, वाईट उदाहरण आहे.)

जैव नियंत्रणाचा पारंपरिक उपाय आक्रमक प्रजातींच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरतो.

व्हाइसहाइक म्हणतात, "आम्ही इतर जीवांसाठी हानीकारक असलेला जीव प्रस्तुत करू इच्छित नाही. आम्ही केवळ लक्ष्यावरच हल्ला करणारा प्रभावी जैव नियंत्रक शोधतो."

संरक्षणाच्या दृष्टीकोनात त्याच परिसरातल्या शिकारी जीवांचा वापर केला जातो.

फ्लावरच्या शेतीभोवती कुरण असणाऱ्या भागात फ्लावरमध्ये कीड पडण्याचं प्रमाण कमी असल्याचं एका संशोधनात आढळून आलं होतं. संशोधकांच्या मते त्या परिसरात आढळणारे गांधीलमाशीच्या प्रजातीचे किटक यामागचं मुख्य कारण आहेत.

इतर काही ठिकाणी शेतीच्या आसपास कुरण असल्याने परिसरात पिस आणि इतर किटकांचं प्रमाण वाढलं. याचाच अर्थ शेतीच्या आसपास कुरण तयार केल्याने किड्या-किटकांची संख्या कमी होईलच, असं नाही.

पारंपरिक जैव नियंत्रकांप्रमाणेच अनेक प्रकारच्या किटकांच्या प्रजाती माणसानेच आणलेल्या आहेत. एखादा देश दुसऱ्या देशाकडून बियाणं आणि पीक मागवतो तेव्हा त्यासोबत किडे आणि किटकही येतात. नवीन वातावरणात आणि नैसर्गिक शिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत हे किटक जोमाने वाढतात आणि पसरतात.

सुधारित दृष्टीकोनात एका विशिष्ट वेळी शेतात पॅथोजेन्स सोडले जातात. किटकांच्या प्रजनानाच्या काळात किंवा जेव्हा ते अंडी घालतात त्या काळात किंवा अंड्यातून किटक बाहेर येण्याआधी पॅथोजेन्स सोडले जातात. यामुळे हानीकारक किटकांची संख्या वाढण्याआधीच त्याला आळा घातला जातो.

याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही विशिष्ट किडीसाठी विशिष्ट पॅथोजेन वापरू शकता. व्हाइकहाइस म्हणतात, "सुधारित नियंत्रण युरोपातील ग्रीन हाऊस क्षेत्रात फार लोकप्रिय आहे. काही भागात किटकनाशकांचा वापर शून्य आहे."

ग्रीन हाऊसमध्ये गेल्या अनेक दशकांपासून जैव नियंत्रण सुरू आाहे. रासायनिक किटकनाशक मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे त्याकाळीसुद्‌धा ग्रीन हाऊसमध्ये जैव नियंत्रणावर भर होता. बंदिस्त परिसरात ही पद्धत जास्त सोयीस्कर आहे. शिकारी जैव नियंत्रक दूर जाऊ शकत नाहीत. ग्रीन हाऊसमधल्या उत्पादनाच्या किंमती जास्त असण्यामागे हेदेखील एक कारण आहे.

जैव नियंत्रणाचा विस्तार

गेल्या काही वर्षात फूल, द्राक्षं आणि स्ट्रॉबेरी शेतीमध्ये जैव नियंत्रणाचा वापर वाढला आहे.

ब्युटेन्हस म्हणतात, "कॅनाडामध्ये 2017/18 साली केलेल्या एका संशोधनात आढळलं की 92 टक्के फूल उत्पाादक किड नियंत्रणासाठी जैव नियंत्रकाचा वापर करतात. ही एक अद्भूत यशोगाथा आहे."

धान्य उत्पादक मोठे शेतकरी शेतात जैव नियंत्रकांचा वापर करतील त्यावेळी परिस्थिती त्यांच्या बाजूने होईल, असं ब्युटेन्हस आणि रीड म्हणतात. गहू आणि जवाच्या शेतीत जैव नियंत्रकांचा वापर महत्त्वाचा असल्याचं रीड यांना वाटतं.

तर कोलंबिया, इक्वाडोर आणि केनियासारख्या देशांना जैव नियंत्रक वापरण्यास राजी करणं मोठं यश ठरेल, असं ब्युटेन्हस यांना वाटतं.

त्या म्हणतात, "हे घडणार."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)