मराठा आरक्षण : केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्चा घेतलेला आढावा.

1. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही-चंद्रकांत पाटील

"महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. पाटील राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाला संवैधानिक संरक्षण देण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत असं चव्हाण म्हणाले होते.

एसईबीसी, तामिळनाडू, ईडब्ल्यूएस आरक्षण यासंदर्भात न्यायालयात तीन याचिका प्रलंबित आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

2.भंडाऱ्यात शिशू केअर युनिटला आग, 10 बालकांचा मृत्यू

भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

शनिवारी रात्री आऊटबॉर्न युनिटमधून धूर येत असल्याचं दिसलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं. शिशू केअर युनिटमधील सात बालकांना वाचवण्यात आलं. मात्र आऊटबॉर्न युनिटमधल्या 10 बालकांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल रुग्णालयात दाखल झाले आहेत.

3. औरंगजेब हा काय सेक्युलर होता? - मुख्यमंत्री

"औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यावरुन काँग्रेसने आक्षेप घेतला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याचं समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटला संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, "छत्रपती संभाजी महाराज आमचंही आराध्यदैवत असून श्रद्धास्थान आहे. नामांतरामुळे जे राजकारण होतं आणि माणसं दुरावतात ते होऊ नये यासाठी काँग्रेस विरोध करत असतं. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ. आम्ही एकत्र बसून चर्चा करु. आमची भूमिका कायम आहे. नामांतराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे. कुठे मतभेद झाले तर चर्चा करु",

4. लोकलचा निर्णय मंगळवारपर्यंत, राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही

गेल्या मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरी (लोकल) रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवापर्यंत घेण्यात येईल, असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या उपनगरांतील लाखो प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली असल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना विशिष्ट वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र सर्वासाठी उपनगरीय रेल्वेसेवा कधी सुरु होणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये कुतूहल आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कोरोना नियंत्रण आघाडीवरील कर्मचारी, महिला तसंच वकिलांना प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे.

5. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा निर्णय 25 फेब्रुवारी

नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात निर्णय 25 फेब्रुवारीला होणार आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. हिरे व्यापारी मोदी पॉन्झी स्कीमसाठी कारणीभूत आहेत. यामुळे पंजाब नॅशनल बँकेत गडबड झाली असं न्यायालयात सांगण्यात आलं. 'न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

व्हीडिओ लिंकद्वारे झालेल्या सुनावणीला नीरव मोदी हजर होते. दाढी वाढलेल्या स्थितीत नीरव दिसले. भारत सरकारतर्फे ब्रिटनच्या क्राऊन अभियोजन सेवा युक्तिवाद करत आहे.

आर्थिक घोटाळा, साक्षीदारांना धमकावणे हे मुद्दे भारत सरकारतर्फे मांडण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)