मुंबई : ठाणे शहरामध्ये आढळले मरून पडलेले बगळे, तपास सुरू

मुंबईजवळच्या ठाणे शहरामध्ये काही बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. देशात वेगवेगळ्या राज्यांतून बर्ड फ्लूच्या बातम्या येत असल्याने आता या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

देशभरात 'बर्ड फ्लू' च्या संकटाचा धोका वाढत आहे. केरळने 'बर्ड फ्लू' राज्य आपत्ती म्हणून घोषित केली आहे.

महाराष्ट्रात अद्याप 'बर्ड फ्लू' चा संसर्ग आढळून आलेला नाही.

मात्र, ठाणे शहरात काही बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ठाणे महानगरपालिकेने मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार गुरूवारी 'बर्ड फ्लू'च्या मुद्यावर प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत.

काय आहे प्रकरण?

बुधवारी (6 जानेवारी) दुपारी ठाण्यातील घोडबंदर परिसरातील वाघबीळ भागात 15 बगळे मृतावस्थेत आढळून आले.

प्रशासनाने तात्काळ मृत पक्षांचे नमुने गोळा करून चौकशीसाठी पाठवले. येत्या दोन दिवसात याबद्दलचा अहवाल येण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाघबीळ भागात विजयनगर तलाव आहे. या परिसरात मोठ्या संख्यने बगळे दिसून येतात. बुधवारी सकाळी स्थानिकांना बगळे मृतावस्थेत आढळून आले.

सरकारचं म्हणणं काय?

ठाण्यातील या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

बीबीसीशी बोलताना पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे म्हणाले, "ठाण्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्षांबाबत चौकशी सरू करण्यात आली आहे. राज्य सरकारचं याकडे लक्ष आहे. मृत पक्षांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची राज्यातील प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. गरज पडल्यास नमुने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येतील. त्यानंतरच पक्षांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल."

"राज्य सरकारने जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि इतर विभागांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यास तात्काळ नमुने घेऊन चौकशीच आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत राज्यात 'बर्ड फ्लू' चा धोका आढळून आलेला नाही," असं ते पुढे म्हणाले.

पक्षी प्रेमी काय म्हणतात?

पक्षी प्रेमींच्या माहितीनुसार, ठाण्यात मृतावस्थेत पाण बगळे ज्यांना पॉंड हेरॉन म्हणतात ते मृतावस्थेत आढळून आले आहेत.

याबाबत बोलताना येऊरच्या एन्व्हार्नर्मेंटल सोसायटीचे रोहित जोशी म्हणतात, "ठाणे महापालिका आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षांचे नमुने गोळा केले आहेत. या परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार घडतोय. हे पक्षी 'बर्ड फ्लू' मुळे मृत्यूमुखी पडले का हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. विविध कारणांनी पक्षी मृत होऊ शकतात."

देशात हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश आणि हरियाणा या राज्यात 'बर्ड फ्लू' चा संसर्ग आढळून आला आहे.

महाराष्ट्रात अद्याप 'बर्ड फ्लू' चा संसर्ग आढळून आलेला नाही. पण, राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)