You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: विरोधी स्वदेशी लशीसाठी एवढी घाई का?
- Author, सौतिक बिस्वास आणि मयांक भागवत
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोव्हिड-19 विरोधातील स्वदेशी लशीला मंजूरी देण्यासाठी एवढी घाई का? लशीची 'क्लिनिकल ट्रायल' सुरू असताना वापरासाठी आपात्कालीन परवानगी का देण्यात आली?
हा प्रश्न देशभरातील लस निर्मिती संबंधात संशोधन करणारे तज्ज्ञ विचारत आहेत.
केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी भारतात निर्माण करण्यात येणाऱ्या भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सीन' लशीला मंजूरी दिली. पण, ही लस प्रभावी, कार्यक्षम आणि वापरासाठी सुरक्षित आहे का? याबाबतचा डेटा उपलब्ध नसल्याने देशी लशीसाठी घाई का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारतातील लस निर्मितीमधील तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग सांगतात, 'एकतर तुम्ही क्लिनिकल ट्रायल करता किंवा नाही.'
लस निर्मितीचे तीन टप्पे असतात. लस शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते का? लशीचे काही साइड इफेक्ट आहेत का? हे तपासून पाहिलं जातं.
रविवारी ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही, 'कोव्हॅक्सीन' ला मंजुरी दिली. ही लस इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण केली जात आहे.
'कोव्हॅक्सीन'ला मंजुरी देताना ड्रग्ज कंट्रोलर जनरल म्हणाले, 'जनहित लक्षात घेता, लशीला क्लिनिकल ट्रायलमध्येच आपात्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराची परवानगी देण्यात आलीये.'
तीन दिवसात काय झालं?
'कोव्हॅक्सीन'ला मंजुरी देण्याआधी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (Subject Expert Committee) यावर चर्चा केली. समितीने मंजुरी देण्याची शिफारस कशी केली हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यासाठी आम्ही Subject Expert Committee च्या मिटींगचे मिनिट्स तपासले.
- 30 डिसेंबर 2020- तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकला इम्युनिजेनिसिटी, सुरक्षा आणि लस प्रभावी असल्याची माहिती देण्याची शिफारस केली
- 1 जानेवारी 2021 - ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचं समितीने नमुद केलं. पण, लशीची कार्यक्षमता अजूनही सिद्ध होणं बाकी असल्याचं ही म्हटलं. कंपनीने लशीच्या कार्यक्षमतेबाबत अभ्यास करावा अशी शिफारस करण्यात आली.
- 2 जानेवारी 2021 - कंपनीने प्राण्यांवरील संशोधनाची माहिती प्रस्तुत केली. ही लस सुरक्षित आणि कार्यक्षम आढळून आली असं समितीने नमुद केलं.
वरील गोष्टींचा विचार करता 'व्यापक जनहित लक्षात घेता, लशीला क्लिनिकल ट्रायलमध्ये आपात्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराची परवानगी देण्यात यावी,' अशी शिफारस समितीने केली.
कोरोना व्हायरस म्युटेट झाला किंवा बदलला तर पर्याय असावेत यासाठी परवानगी देण्यात यावी असं नमुद करण्यात आलं.
क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात 25800 लोकांना या लशीचा डोस देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी 'कोव्हॅक्सीन' सुरक्षित आहे असं म्हटलं असलं. तरी, तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
'चाचणी सुरू असताना लशीला मंजुरी देण्यामागे शास्त्रीय तर्क काय?' असा सवाल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कने उपस्थित केला आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. अनंत भान सांगतात, 'लस किती कार्यक्षम आहे याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. लोकांमध्ये लशीबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची आहे. लशीचा अभ्यास किती लोकांवर करण्यात आला. त्याचे परिणाम काय आले. याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.'
'लशीला मंजुरी कोणत्या आधारावर देण्यात आली. याबाबत ही नियामक एजन्सीने माहिती दिली नाही.' असं ते पुढे म्हणाले.
भारत बायोटेकची भूमिका
कोव्हॅक्सीनच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईला म्हणतात, 'भारतात क्लिनिकल ट्रायल कायद्याप्रमाणे आजार जीवघेणा असल्यास दुसऱ्या टप्प्यात आपात्कालीन मंजुरी दिली जाऊ शकते.'
'माकडांवर करण्यात आलेल्या चाचणीत कोव्हॅक्सीन लस विषाणू विरोधात संरक्षण देऊ शकते असं सिद्ध झालं आहे,' असं डॉ. ईला पुढे म्हणाले.
लशीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या 26000 स्वयंसेवकांपैकी 24000 स्वयंसेवक तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
तज्ज्ञ अजूनही संभ्रमात
डॉ. शाहीद जमील सांगतात, 'तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लस प्रभावी आणि कार्यक्षम आहे का नाही याबद्दल माहिती नाही. दोन टप्प्यातील चाचणीत ही लस सुरक्षित आहे. ही लस आपण सर्वसामान्यांनी दिली. त्यानंतर फक्त 50 टक्के कार्यक्षम असल्याचं समोर आलं तर?'
तज्ज्ञांच्या मते, क्लिनिकल ट्रायल मोड म्हणजे नक्की काय? यावर अजूनही स्पष्टता नाही.
त्यातच कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या वरिष्ठ सदस्याने कोव्हॅक्सीन, कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढली तर 'बॅकअप' असल्याचं वक्तव्य केल्याने गोंधळ उडाला.
'कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ झाली. तर, काही लोकांना कार्यक्षमता सिद्ध न झालेली लस देणार का?' असा सवाल संसर्गजन्य आजारतज्ज्ञांनी बोलताना उपस्थित केला.
यावर बोलताना क्वीन्सलॅंड विद्यापीठाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. पॉल ग्रिफीन म्हणतात, 'क्लिनिकल ट्रायलमध्ये लशीचा वापर आपात्कालीन परिस्थितीत करता येतो. चाचणीतून समोर आलेली माहिती उपयुक्त असेल. लस सुरक्षित आणि प्रभावी असेल तर याचा वापर करता येतो.'
लसीकरणाचं लक्ष
केंद्र सरकारने जानेवारी ते जुलै महिन्यात 30 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं टार्गट ठेवलं आहे. भारतात सद्यस्थितीत 1 कोटीपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
लसीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात खाका तयार करण्यासाठी 7 जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यांची बैठक होणार आहे.
स्वदेशी लशीची घाई का?
स्वदेशी लशीसाठी घाई न करता. क्लिनिकल ट्रायल पूर्ण होईपर्यंत थांबता आलं असतं का?
कॉँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या घाईसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आरोप केलाय. 'स्वत:ची छाती बडवण्यासाठी आणि व्हॅक्सीन नॅशनलिझमसाठी शास्त्रीय प्रोटोकॉल धाब्यावर बसवले जात आहेत.' असं शशी थरूर म्हणाले.
भारत लसनिर्मितीच जागतिक केंद्र आहे. जगभरातील 60 टक्के लशी भारतात निर्माण केल्या जातात. भारतात जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जाते.
पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के श्रीनाथ रेड्डी म्हणतात, 'कोणत्याही लशीला सुरक्षा आणि कार्यक्षमता याच्या माहितीवरून मंजुरी मिळाली पाहिजे. चाचण्या, किती डोस दिले जाणार याची माहिती देखील महत्त्वाची आहे.'
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)