ममता बॅनर्जींना सोडून पश्चिम बंगालचे मुस्लिम मतदार ओवेसींसोबत जातील?

फोटो स्रोत, ANI
पश्चिम बंगालच्या राजकारणात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (AIMIM) म्हणजेच MIM च्या एन्ट्रीने राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी (3 जानेवारी) अचानक पश्चिम बंगालचा दौरा केला. असदुद्दीन ओवेसी हुबळी जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पोहोचले. मुस्लिम धर्मियांची पवित्र जागा फुरफुरा शरीफला त्यांनी भेट दिली.
या ठिकाणी प्रार्थना (जिरायत) केल्यानंतर, ओवेसी यांनी पीरजादा अब्बास सिद्धिकी यांच्यासोबत बैठक केली. येणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत मैदानात उतरण्याचं ओवेसी यांनी स्पष्ट केलं.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर ओवेसी यांचा हा पहिला दौरा होता. मात्र, MIM ने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचं स्पष्ट केल्याने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.
पश्चिम बंगालमधील 30 टक्के अल्पसंख्याक मतदार हे तृणमूल कॉँग्रेसची व्होट बँक मानली जाते. मात्र, ओवेसी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही व्होट बॅंक तृणमूलपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ममता बॅनर्जींसमोरचं आव्हान वाढलं?
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसकडून ओवेसींच्या MIM ला फारसं महत्त्व दिलं जात नाहीय. तृणमूलच्या नेत्यांनी तर MIM ला भाजपची 'बी टीम' म्हटलं आहे.
मात्र, राजकीय वर्तुळात ओवेसींची एन्ट्री ममता बॅनर्जींसाठी धोका असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओवेसी आणि सिद्धिकी यांच्या भेटीमुळे तर राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

फोटो स्रोत, SANJAY DAS/BBC
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
ओवेसींनी पश्चिम बंगाल निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, तृणमूल कॉँग्रेसने पश्चिम बंगालमधील MIM चे प्रदेशाध्यक्ष अन्वर पाशा यांनाच पक्षात घेत ओवेसींना धक्का दिला.
MIM मतांचं ध्रुवीकरण करून ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी भाजपला मदत करत असल्याचा दावा पाशा यांनी केला होता. पाशा यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली होती.
फुरफुरा शरीफचं महत्त्व
हुबळी जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ अल्पसंख्यांक समुदायाचं पवित्र प्रार्थनास्थळ आहे. फुरफुरामध्ये 1375 साली मुकलिश खानने एक मस्जिद बनवली होती.
ही मस्जिद बंगालच्या मुसलमानांसाठी प्रमुख स्थळ बनलं आहे. उर्सच्या वेळी देश-विदेशातील मुसलमान या ठिकाणी भेट देतात.
फुरफुरा शरीफमध्ये अबू बकर सिद्धिकी आणि त्यांच्या पाच मुलांची मजार आहे. अबू बकर एक समाजसुधारक होते. धर्मावर त्यांचा मोठा विश्वास होता.

फोटो स्रोत, SANJAY DAS/BBC
त्यांनी अनेक धर्मादाय संस्थांची स्थापना केली होती. महिला शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी फुरफुरा शरीफमध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उभारल्या होत्या.
निवडणुकीदरम्यान फुरफुरा शरीफचं महत्त्व फार वाढतं. डावे पक्ष, टीएमसी, कॉँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचतात.
बंगालमधील अल्पसंख्यांक समाज
बंगालमधील अल्पसंख्यांक समाजाचे लोक दोन धार्मिक संस्थांचं अनुकरण करतात. यात देवबंदी आदर्शांवर चालणारे जमियत-ए-हिंद आणि फुरफुरा शरीफ यांचा समावेश आहे.
ममता बॅनर्जी अल्पसंख्यांक समाजाच्या पाठिंब्यावर पश्चिम बंगालमध्ये गेली 10 वर्ष राज्य करत आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये 27. 01 टक्के मुसलमान होते. सद्यस्थितीत त्यांची संख्या 30 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.
बांगलादेश सीमेलगतच्या गावांमध्ये बहुसंख्य मुसलमान रहातात. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपुरमध्ये एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुसलमान आहेत.
मुस्लिम मतदार किती महत्त्वाचे ठरतात?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. त्यापैकी 100 ते 110 जागांवर मुस्लिम मतं निर्णायक ठरू शकतात. त्यातही दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुसलमान आहेत.
2006 पर्यंत पश्चिमबंगालमधील मुस्लिम मतांवर डाव्या पक्षांची पकड होती. मात्र, त्यानंतर मुसलमान मतदार हळूहळू ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉँग्रेसकडे आकर्षित झाला. 2011 आणि 2016 च्या विधानसभा निवडणूकीत मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यावर ममता बॅनर्जी निवडणूक जिंकल्या.

फोटो स्रोत, ANI
एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यातच ओव्सींच्या एन्ट्रीमुळे ममता बॅनर्जी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
फुरफुरा शरीफमध्ये अब्बास यांच्यासोबतच्या बैठकीनंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "ममता बॅनर्जी यांनी MIM वर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करायला हवं. भाजपने गेल्या निवडणुकीत 18 जागांवर विजय कसा मिळवला, यावर विचार केला पाहिजे."
समर्थक असलेले सिद्धिकी बनले ममता बॅनर्जींचे विरोधक
MIM भाजपची 'बी टीम' आणि 'व्होटकटवा' पक्ष असल्याचे आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी फेटाळून लावले आहेत.
ओवेसी म्हणाले, "MIM एक राजकीय पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणूक लढणार. आम्ही पीरजादा अब्बास सिद्धिकी यांच्यासोबत आहोत. त्यांच्या निर्णयाचं आम्ही समर्थन करू."
पत्रकारांशी बोलताना पीरजादा अब्बास सिद्धिकी म्हणाले, "ओवेसी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आले होते. या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला पुढे ठेऊन पश्चिम बंगाल निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही युती कशी असेल, आम्ही किती जागांवर निवडणूक लढवू, याचा निर्णय येणाऱ्या काही दिवसात घेतला जाईल."
पीरजादा अब्बास सिद्धिकी याच महिन्यात आपल्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची शक्यता आहे. सिद्धिकी ममता बॅनर्जी यांचे कट्टर समर्थक होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ममता बॅनर्जींचा विरोध सुरू केला आहे.
MIM भाजपला मदत करण्यासाठी निवडणुकीत उतरलाय - तृणमूल
सिद्धिकी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. पश्चिम बंगालमधील 100 विधानसभा जागांवर फुरफुरा शरीफचा प्रभाव असल्याचं बोललं जातं.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसकडून ओवेसी यांची बंगालमध्ये झालेली एन्ट्री फार मोठं आव्हान नसल्याचं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम सांगतात, "पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेसाठी 147 जागांची गरज आहे. मात्र, औवैसी यांच्याकडे इतके उमेदवारही नाहीत. त्यांचा पक्ष भाजपला मदत करण्यासाठी निवडणुकीत उतरला आहे."
तृणमूलचे खासदार सौगत रॉय सांगतात, "ओवेसी यांच्या एन्ट्रीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. या ठिकाणी उर्दू भाषिक मुसलमानांची संख्या खूप कमी आहे. त्यांचा पक्ष भाजपसाठी इतर पक्षांची मतं फोडण्याचा प्रयत्न करतो हे लोकांना समजलं आहे."
काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांच्यासोबत अब्दुल मन्नान यांनी फुरफुरा शरीफचा दौरा केला होता. अब्दुल मन्नान सांगतात, "पश्चिम बंगालचे मुसलमान मूर्ख नाहीत. या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण झालं असतं. तर मुस्लिम लीगचं वर्चस्व संपुष्टात आलं नसतं."
पश्चिम बंगालचं राजकारण
ममता बॅनर्जींसोबत असणारे फुरफुरा शरीफचे पीरजादा त्वाहा सिद्धीकी सांगतात, "पश्चिम बंगालचे मुसलमान धर्म आणि जातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाची साथ देतील. ते कधीतरी दिसणाऱ्या नेत्यांपेक्षा वाघासोबत रहाणं पसंत करतील."
"ओवेसींचा दौरा आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. भाजपसाठी नाही," असा दावा भाजप नेते करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, "अल्पसंख्यांकांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आणि मुसलमान मतदारांना आपली मालकी समजणाऱ्या पक्षांना ओवेसींच्या एन्ट्रीमुळे भीती वाटत आहे."
"MIM आणि भाजपचा रस्ता वेगळा आहे. आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल याचे प्रमाण आहेत," असं म्हणत घोष यांनी टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
राजकीय विश्लेषक समीर कुमार सेन म्हणतात, "ओवेसी यांच्या एन्ट्रीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, एक गोष्ट नक्की की, त्यांच्या निवडणूक लढण्यामुळे टीएमसीची चिंता जरूर वाढली आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








