You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन : 'या' शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान गमावले प्राण
- Author, अरविंद छाब्रा
- Role, बीबीसी पंजाबी
26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा जीवही गेला आहे.
पंजाब सरकारच्या महितीनुसार, आंदोलनादरम्यान आतार्यंत (2 जानेवारी) 53 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यातील 20 जणांचा मृत्यू पंजाबमध्ये, तर 33 जणांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर गेला.
भारत सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी हे शेतकरी आहेत. या कायद्यांमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती या शेतकऱ्यांना वाटतंय.
आंदोलनादरम्यान कडाक्याच्या थंडीने कुणाचा जीव गेला, तर काहींनी आत्महत्या केली. या वृत्तातून आम्ही या शेतकऱ्यांबाबत माहिती देणार आहोत.
मेवा सिंह, 48, टिकरी सीमेवर निधन
सात डिसेंबरचा दिवस होता. दिल्लीच्या टिकरी सीमेचं ठिकाण. 48 वर्षीय मेवा सिंह आंदोलनावर कविता लिहित होते. काही ओळी लिहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की, कविता उद्या पूर्ण करेन.
मेवा सिंह यांचे मित्र जसविंदर सिंह गोरा सांगतात, "आम्ही एकाच खोलीत होतो आणि त्या रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होतो. मेवा सिंह यांना भूक लागली आणि ते काही खाण्यासाठी बाहेर गेले. नंतर कुणीतरी आम्हाला सांगायला आला की, मेवा सिंह बाहेर पडला आहे. मी धावत बाहेर गेलो, तर मेवा सिंह जमिनीवर कोसळला होता."
मेवा सिंह यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की, इथे आणण्याच्या आधीच त्यांचा जीव गेलाय.
मेवा आपली कविताही पूर्ण करू शकले नाहीत. ते मोगा जिल्ह्यातील शेतकरी होते.
भाग सिंह, 76, सिंघू सीमेवर निधन
पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातून आलेल्या 76 वर्षीय भाग सिंह यांचं 11 डिसेंबर रोजी निधन झालं.
त्यांचा मुलगा रघुबीर सिंह यांनी सांगितलं, "वडील आंदोलनाच्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत होते आणि त्याचा त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यांना सोनीपतच्या हॉस्पिटलला नेलं होतं. तिथून मग रोहतकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, ते वाचू शकले नाहीत."
भाग सिंह यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या धक्क्यात आहेत. मात्र, तरीही पूर्ण कुटुंब आंदोलनात सहभागी झालंय.
त्यांची सून कुलविंदर कौर सांगतात, "जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत, तोवर हार मानणार नाही. भाग सिंह यांनी आपल्या मुलांसाठी प्राण दिलाय. आम्ही आमच्या मुलांसाठी प्राण देऊ."
बाबा राम सिंह, 65, आत्महत्या
हरियाणातील करनाल जिल्ह्यातील आध्यात्मिक नेते बाबा राम सिंह यांनी कथितरित्या स्वत:ला गोळी मारली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
असं सांगितलं गलं की, शेतकऱ्यांची अवस्था पाहून बाबा राम सिंह हे व्यथित झाले होते. 9 डिसेंबर रोजी सिंघू सीमेवर गेल्यानंतर त्यांनी डायरी लिहिली होती. ती वाचणाऱ्याने सांगितलं की, बाबा राम सिंह हे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून अस्वस्थ आणि व्यथित झाले होते.
सरकार आंदोलक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बाबा राम सिंह यांनी केला होता.
अमरिक सिंह, 75, टिकरी सीमेवर मृत्यू
गुरासपूरचे रहिवाशी अमरिक सिंह इतर सहकाऱ्यांसोबत बहादुरगढ बस स्टँडच्या जवळ राहत होते. 25 डिसेंबरच्या रात्री थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा मुलगा दलजित सिंह यांनी सांगितलं, "अमरिक सिंह हे तीन वर्षांच्या नातीसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत आंदोलन संपत नाही, तोपर्यंत आंदोलनस्थळीच राहण्याचा विचार आम्ही केला होता."
"त्या दिवशी ते उठलेच नाहीत. आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं," असं दलजित सांगतात.
मलकीत कौर, 70, रस्ते अपघातात मृत्यू
पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मलकीत कौर मजदूर मुक्ती मोर्चाच्या सदस्या होत्या. त्या घरी परतत असताना फतेहाबादजवळ रस्ते अपघतात त्यांचा मृत्यू झाला.
मजदूर मुक्ती मोर्चाचे राज्यप्रमुख भगवंत सिंह म्हणतात, "गेल्या काही दिवसांपासून मलकीत कौर आंदोलन करत होत्या. 27 डिसेंबरच्या रात्री आम्ही लंगर असणाऱ्या ठिकाणी थांबलो. त्यावेळी एक कार त्यांना धडक देऊन निघून गेली. आम्हाला वाटलं की, त्यांना केवळ जखम झालीय. मात्र, त्यात त्यांचा जीव गेला."
ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, मलकीत कौर यांचं कुटुंब कर्जात बुडालं आहे आणि त्यासाठी त्यांना सरकारी मदत देण्याचं आवाहन केलंय.
जनक राज, बरनाला, 55, कारला आग लागल्याने होरपळून मृत्यू
जनक राज भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते होते. रात्री बहादुरगड-दिल्ली सीमेजवळ ते कारमध्ये झोपले होत. या कारला आग लागली आणि त्यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
जनक राज हे पेशाने मेकॅनिक होते. त्यांचा मुलगा साहील 28 नोव्हेंबर रोजी घडलेल्या त्या घटनेची आठवण काढताना म्हणतात, "वडिलांविना सर्व हरवल्यासारखं वाटतं. ते घरी येण्याची वेळ होते, तेव्हा तर अधिकच ते जाणतं."
"आंदोलनात सहभागी झालेल्या ट्रॅक्टरसाठी कुठलेही पैसे न घेता दुरुस्ती करण्याचं काम एक मेकॅनिक करत होता. त्या मेकॅनिकच्या मदतीला जनक राज धावले होते. जनक राज सायकल दुरुस्त करण्याचं काम करत असत. मात्र, ट्रॅक्टर दुरुस्त करण्याचं कामही त्यांना येत असे," असं साहील सांगतात.
भीम सिंह, 36, सांगरुर, सिंघू सीमेवर मृत्यू
16 डिसेंबरला भीम सिंह जेव्हा सिंघू सीमेवर पोहोचले, तेव्हा घसरून ते पडले. शेतकरी नेते मनजीत सिंह यांच्या माहितीनुसार, भीम सिंह हे सासू-सासऱ्यांसोबत राहत होते.
"ते शौचालयाला गेले होते आणि तिथे घसरून पडले. सरकारने त्यांच्या कुटुंबाला मदत द्यावी, असं आम्ही आवाहन केलंय," असं मनजीत सिंह यांनी सांगितलं.
यशपाल शर्मा, 68, शिक्षक, बरनाला
यशपाल शर्मा यांचं आंदोलनादरम्यान टोलनाक्याजवळ हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. ते शेती करत असत.
शर्मांची पत्नी राजरानी सांगतात, "ते नेहमीप्रमाणे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. आम्हाला वाटलं नव्हतं, हे असं होईल आणि ते कधीच परतणार नाहीत."
"ते म्हणत असत की, मी चालता-फिरताच मरेन. अंथरूणाला खिळून बसणार नाही. ईश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. लोक त्यांच्यामुळे माझाही आदर करायचे. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांचे ऐकतील. जेणेकरून पुढे असे कुणाचे मृत्यू होणार नाहीत."
काहन सिंह, 74, बरनाला, रस्ते अपघात
काहन सिंह हे 25 नोव्हेंबर रोजी पंजाब-हरियाणाच्या सीमेवरील खनौरीला जाण्यासाठी आपली ट्रॅक्टर ट्रॉली तयार करत होते. दिल्लीच्या दिशेनं जाण्यासाठी खनौरीला शेतकरी जमणार होते.
काहन सिंह यांचे नातू हरप्रीत सिंह सांगतात, 25 वर्षांपासून ते शेतकरी आंदोलनांमध्ये सहभागी होत आलेत.
त्यांच्या माहितीनुसार, "ते गावाचे खजिनदार होते. आपल्या ट्रॅक्टरसाठी ते वॉटरप्रूफ कव्हर आणायला गेले होते. त्यावेळी दुर्घटना घडली. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र ते वाचू शकले नाहीत. सरकारने आम्हाला पाच लाख रुपयांचा मदतनिधी दिला. शिवाय, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणीही आम्ही करत आहोत."
बलजिंदर सिंह गिल, 32, लुधियाना, दुर्घटनेत मृत्यू
लुधियानातील एका गावात राहणारे बलजिंदर एक डिसेंबर रोजी ट्रॅक्ट आणण्यासाठी गेले होते. मात्र, दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
त्यांची आई चरनजीत कौर सांगतात, "माझा नातू विचारतो की, ट्रॅक्टर आणायला गेलेले त्याचे वडील अजून आले का नाहीत. त्याच्या वडिलांना जखम कशी झाली, असं तो विचारतो."
तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर बलजिंदर सिंह यांच्या कमाईवरच घर चालत असे. चरनजीत सांगतात की, आता मी आणि माझी सूनच राहिलोय. कुटुंबात कमवणारा कुणीच राहिला नाहीय.
इतक्या साऱ्यांचा बळी गेल्यानंतरही शेतकरी आपल्या आंदोलनावर, मागण्यांवर ठाम आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांसाठी ते बलिदान, शहादत असे शब्द वापरतात.
या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभागी झालेले शेतकरी नेते जोगिंदर सिंह उगराहाँ यांनी घोषणा केली की, आम्ही या बलिदानांना वाया घालवणार नाही आणि शेवटपर्यंत आमचा संघर्ष करत राहू.
संघर्ष आणखी बलिदान मागेल, पण आम्ही त्यासाठी तयार आहोत, असंही ते म्हणाले.
या मृत्यूंमुळे आंदोलक शेतकऱ्यांचं मनोबल कमी झालं?
शेतकरी नेते हरिंदर कौर बिंदू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही दिवसाला सरासरी एक शेतकरी गमावत आहोत. आम्ही दु:खी आहोत. मात्र, आमचं मनोबल अजिबात कमी झालेलं नाही. किंबहुना, प्रत्येक बलिदानागणिक आमचा निश्चय आणखी वाढत जातंय."
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे दु:खी आहे. एकीकडे शेतकरी कडाक्याच्या थंडीची झळ सोसतायेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारचं अहंकार सुद्धा. आतापर्यंत पंजाबमध्ये आमचे 20 शेतकरी मृत्युमुखी पडले आणि दिल्लीच्या सीमेवार 33 शेतकऱ्यांचा जीव गेला."
"हे खूप दुर्दैवी आहे आणि हे संपायला हवं. केंद्र सरकारला मी आवाहन करतो की, शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या. आता केवळ पंजाबच नव्हे, तर संपूर्ण देश या शेतकऱ्यांचं बलिदन सहन करू शकत नाही," असं अमरिंदर सिंह म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)