संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर

वर्षा राऊत या आज (4 जानेवारी) अचानक ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली होती. वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे.

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचं ट्वीट ईडीनं (अंमलबजावणी संचलनालय) तीन दिवसांपूर्वी केलं होतं.

त्यामुळे प्रवीण राऊत कोण आहेत? त्यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात काय सहभाग आहे? त्यांचा आणि संजय राऊत यांच्या कुटुंबीयांमध्ये काय व्यवहार झाला? असे प्रश्न आता उपस्थित आहेत.

प्रवीण राऊत कोण आहेत?

वाधवान कुटुंबीयाच्या HDIL (Housing Development Infrastructure Limited) चीच एक उपकंपनी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रवीण राऊत होते. माधुरी राऊत या प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत.

प्रवीण राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून 55 लाखांचं कर्ज घेतल्याची संजय राऊत यांच्या शपथपत्रात नोंद आहे.

यावर्षीच्या सुरूवातीला फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना म्हाडासंबंधित पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता आढळल्याप्रकरणी अटक केली होती.

गुरूआशिष कंस्ट्रक्शनमध्ये प्रवीण राऊत यांच्यासोबत सारंग आणि राकेश वाधवान संचालक आहेत.

PMC बॅंक प्रकरणाशी संबंध काय?

कथित PMC बॅंक घोटाळा प्रकरणी HDIL कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. वाधवान यांनी PMC बॅंकेकडून कर्ज घेऊन परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आरोप-प्रत्यारोप

ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केली आहे.

त्यांनी ट्वीट केलं, "HDIL कंपनीनं पीएमसी बँकेचे 72 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना दिले. यापैकी लाखो रुपये संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना ट्रान्सफर करण्यात आले. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी एकत्र येत Syscon Systems Pvt Ltd Co EDची स्थापना केलीय. ईडीनं प्रवीण राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबाविरोधात कारवाई करावी, असं मी आवाहन करतो."

महाराष्ट्र सरकारसाठी जितक्या अडचणी भाजप उभं करत नाहीत तितक्या एकटे किरीट सोमय्या करत आहे, असा प्रश्न शनिवारी (2 जानेवारी) संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला.

त्यावर 'कोण किरीट सोमय्या, मला माहिती नाही,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

यापूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, "केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, मला काहीएक घाबरण्याचं कारण नाही."

दरम्यान, प्रवीण राऊत यांची बाजून ऐकण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीण राऊत यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या वृत्तात समाविष्ट करण्यात येईल.

राजकीय वापर?

ईडीसारख्या सरकारी यंत्रणेचा वापर सत्ताधारी पक्ष करतात, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व्यक्त करतात.

त्यांच्या मते, "ईडीचा राजकारणात दबावतंत्र म्हणून वापर केला जातो. राज्यातील अनेकांना गेल्या वर्षात ईडीच्या नोटीसा आल्या. यात शरद पवारांचाही समावेश आहे. त्यानंतर ईडीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. वारंवार टीका झाल्यानंतर हा प्रकार थांबेल असं वाटलं होतं. पण, तो आजही तसाच सुरू आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल इथेही हेच सुरू आहे. काँग्रेस असो की भाजप, सत्तेतले पक्षात त्या त्या वेळेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर करतात आणि आपली खेळी निभावून नेतात."

सरकारी यंत्रणांनी त्याच्या कामात संतुलन साधणं आवश्यक असतं, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात.

ते सांगतात, "सत्ताधाऱ्याविरोधातल्या लोकांना टार्गेट करण्याच्या हेतूनं नोटीसा पाठवल्या जातात. पण, ईडीसारख्या संस्थांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी दर्शनी व्यवहाराच्या बाबतीत तरी किमान संतुलन राखण्याची आपण अपेक्षा करू शकतो. खरं तर या संस्थांनी कारवाया करताना संतुलन राखायला पाहिजे. पण, तसं होताना दिसत नाही. विरोधातल्या लोकांना तेवढ्या नोटिसा पाठवल्या जातात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)