You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: महाराष्ट्रात मिशन बिगन अगेनअंतर्गत 31 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत मिशन बिगिन अगेनचे नियम लागू असतील असं म्हटलं आहे.
युकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून नव्या स्वरुपाचा कोरोना विषाणू देशाच्या काही भागात पसरतो आहे. त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी 31 जानेवारीपर्यंत निर्बंध लागू असतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
30 सप्टेंबर तसंच 14 ऑक्टोबरला मिशन बिगिन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यावेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लागू राहतील असं राज्य सरकारने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) देशात 16,500 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. देशात 2,68,581 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
मात्र युकेत आढळलेला कोरोनाचा नव्या स्वरुपातील विषाणू अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूचं संक्रमण वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ब्रिटनमधून 43 जण महाराष्ट्रात आले. त्यांच्यापैकी कुणालाही नव्या स्ट्रेनच्या कोरोनाची लागण झालेली नाही असा खुलासा टोपेंनी केला आहे.
युकेतून भारतात येणाऱ्या विमानसेवेवर 31 जानेवारीपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. युकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यात येत असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
राज्यात महापालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी दिवसा कोणतीही संचारबंदी नसेल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
नववर्षाचे स्वागत घरी राहून साधेपणाने केले जावं असंही आवाहन सरकारने केलं आहे.
- 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्रकिनारे, रस्ते, बगीचे, रस्ते अशा ठिकाणी गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. मास्क परिधान करणं अनिवार्य आहे. हात धुणे आणि सॅनिटायझर याकडे लक्ष द्यावे.
- नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये.
- फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- दहा वर्षांच्या आतील मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)