You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन: 35 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी धावून आलेलं गाव करतंय इतिहासाची पुनरावृत्ती
- Author, सत सिंह
- Role, बीबीसी हिंदीसाठी
गेल्या महिन्याभरापासून पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. आज सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. ही चर्चा फलदायी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनासाठी येणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांची सोय खरावड येथील गावकरी करत असल्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. 35 वर्षांपूर्वी देखील त्यांनी शेतकऱ्यांची अशीच मदत केली होती. या आंदोलनामुळे 35 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
साल - 1985. इंदिरा गांधी यांची हत्या होऊन एक वर्ष लोटलं होतं. हत्येनंतर उसळलेल्या दंगली आणि शिखांविरोधातल्या हिंसेच्या जखमा ताज्याच होत्या.
हरियाणातील रोहतक जिल्ह्यातल्या खरावड गावातल्या रेल्वे स्टेशनवर एका सकाळी पंजाब मेल पॅसेंजर ट्रेन बिघाड झाल्याने थांबली होती.
ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने सरदार, महिला आणि लहान मुलं होती.
शिखांविरोधात वातावरण तापलं होतं. अशावेळी एका हिंदूबहुल भागात इतका वेळ थांबणं योग्य ठरेल का, याची चिंता प्रवाशांना लागून होती.
आणि आज शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाब-हरियाणातून दिल्लीला जाणारे अनेक शीख बांधव थोडी विश्रांती घेण्यासाठी याच गावात थांबतात.
इथलेच रहिवासी निवृत्त कॅप्टन जयवीर सिंह मलीक विश्रांतीसाठी थांबणाऱ्या या शेतकऱ्यांच्या चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करतात.
पंजााबमधून आलेल्या या शीख शेतकऱ्यांना चहा-पाण्यासोबतच 35 वर्षांपूर्वी याच गावात बिघाड झाल्याने थांबलेल्या त्या ट्रेनचा प्रसंगही ते सांगतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "पंजाबचे शेतकरी आभार मानतात तेव्हा आम्ही त्यांना 35 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग सांगतो. पंजाबी आमचा संबंध 35 वर्षं जुना आहे."
"त्यावेळी मी लष्करातून रजा घेऊन गावी आलो होतो. एक दिवस आम्हाला कळलं की पंजाब मेल ज्यात बरेच शीख सरदार, महिला आणि लहान मुलं आहेत, ती बराच वेळपासून रेल्वे स्टेशनवर उभी आहे. ट्रेन कधी सुटेल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. आम्ही सगळे गावकरी एकत्र जमलो आणि ट्रेनमधल्या प्रवाशांना आमच्या हाताने चहा, नाश्ता, भाजी-पोळी बनवून खावू घातली."
गावकऱ्यांना बघून धास्तावलेले चेहेरे
त्याच गावात राहणारे सतबीर सिंह सांगतात जेव्हा मी ट्रेनजवळ गेलो तेव्हा इतके सगळे गावकरी एकत्र बघून ट्रेनमधले प्रवासी घाबरले होते.
ते सांगतात, "मग आम्ही काही सरदारांशी बोललो आणि त्यांना सांगितलं आम्ही इथे सेवा-भावाने आलेलो आहोत. जोवर ट्रेन रवाना होत नाही तोवर प्रवाशांना सुरक्षित वाटावं आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय व्हावी, या हेतूने आलोय."
"त्याच ट्रेनमध्ये अकाली दलाचे तत्कालीन खासदार बलवंत सिंह रामूवालियासुद्धा होते. त्यांनी संसदेत आमच्या गावाचं नाव अभिमानाने सांगितलं आणि एक चिठ्ठीही लिहिली."
तो दिवस आपण कधीही विसरू शकत नसल्याचं माजी खासदार बलवंत सिंह रामूवालिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे शिखांविरोधात द्वेषपूर्ण वातावरण होतं. अशात खरावडमध्ये ट्रेन थांबल्याने सर्वच प्रवासी घाबरले. सकाळची वेळ होती. गावातले लोक लवकर उठतात. त्यांना कळलं की एक ट्रेन स्टेशनवर उभी आहे. त्यात बरेच सरदार, महिला आणि मुलं आहेत आणि या गावात ट्रेन थांबल्यामुळे ते धास्तावलेले आहेत."
"गावतल्या लोकांना आपापल्या घरातून बादली भरून-भरून दूध, चहाच्या केटली, बिस्किटं, गुळ-पोळी, लोणचं सगळं आणलं आणि आम्हा सर्वांना पोटभर खाऊ घातलं. इतकंच नाही तर आमच्या सुरक्षेची जबाबदारीही घेतली."
ट्रेन सुटली तेव्हा आपलं कुटुंबच सोडून जात असल्याची भावना झाल्याचं रामूवालिया सांगतात, "त्यांच्या रुपाने देवच आमच्यासाठी धावून आला होता. तशा परिस्थितीत धर्मनिरपेक्षतेसह मानवतेसाठी ते उभे राहिले, आमची सेवा केली. आमच्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता."
तिथून परतल्यावर हरियाणाचे त्यावेळची ज्येष्ठ नेते चौधरी देवी लाल यांना गावतल्या लोकांच्या चांगुलपणाविषयी चिठ्ठी लिहिल्याचं आणि संसदेतही गावकऱ्यांवर स्तुतीसुमनं उधळल्याचं त्यांनी साांगितलं.
"तेच गाव आज 35 वर्षांनंतरसुद्धा शेतकरी आंदोलनात त्याच सेवाभावनेने शेतकऱ्यांची सेवा करतंय. मी त्यांना नमन करतो."
शेतकऱ्यांच्या सेवेत
दिल्लीपासून जवळपास 60 किमी. अंतरावर रोहतक-दिल्ली हायवेवर वसलेलं हे जाटबहुल गाव आहे.
पंजाबहून सिरसा, फतेहाबाद किंवा जिंद-कैथलमार्गे दिल्लीला जाणारे शेतकरी मोठ्या संख्येने या गावात थांबतात.
गावातल्या ऋषी चमन मंदिरात त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
खरावड गावातल्या लंगरमध्ये जेवणार मानसाचे शेतकरी लाभ सिंह म्हणाले, "सकाळी 11 वाजता गावाहून निघालो. संध्याकाळ झाली. त्यामुळे इथे खरावडमधल्या लंगरमध्ये जेवायला आलो."
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "इथले लोक रस्त्यावर उभे राहून शेतकऱ्यांना थांबवून-थांबवून जेवायला बोलवतात, गरजेचं सामान देतात. पुरी-भाजी, चहा, पाणी, गूळ, लोणचं, शिरा, औषधं, गरम पाणी देतात. शेकोटीसुद्धा पेटवून ठेवतात. इथे धर्म, जात, लिंग असा कुठलाच भेदभाव नाही. केवळ मानवतेच्या नात्याने हे काम सुरू आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)