Ind Vs Aus Test : शुभमन गिल, मोहम्मद सिराजचं कसोटी पदार्पण, भारताने ऑस्ट्रेलियाला 195 वर रोखलं

शुभमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरू आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा आज पहिला दिवस आहे.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

या सामन्यात भारताकडून सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी पदार्पण केलं.

मोहम्मद सिराजविषयी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता. - मोहम्मद सिराज: वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा धैर्यवान मुलगा

कोण आहे शुभमन गिल?

प्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाच्या चाहत्यांसमोर आहे. बॉक्सिंग डे दिवशी शुभमन भारतीय कसोटी संघात पदार्पण करतो आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत शुभमनने प्रयत्नपूर्वक ही संधी मिळवली आहे.

शुभमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

2018 मध्ये U19 वर्ल्डकप स्पर्धेत शुभमनने सर्वाधिक रन्स करत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता. सरळ बॅट, डोकं स्थिर स्थितीत, हाय बॅकलिफ्टसह उंचावर जाणारा कोपरा, उसळत्या चेंडूवर पकड मिळवण्याची खुबी यामुळे शुभमन ज्या संघाकडून खेळतो तिथले प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांचं लक्ष वेधून घेतो.

2018-19 रणजी हंगामात शुभमनने 9 डावात 104च्या सरासरीने 728 धावांची लूट केली. चांगल्या संघांविरुद्धची ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघात समाविष्ट करुन घेतलं.

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने शुभमनच्या खेळाचं कौतुक केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर या मुलाला भारतीय संघात घ्यायला हवं असंही युवराज म्हणाला होता.

वर्षभरात शुभमनचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. न्यूझीलंड दौऱ्यात शुभमनने वनडे पदार्पण केलं. त्याच वर्षी शुभमनने भारतीय अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडली आणि मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. या दौऱ्यात त्याने 204 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.

लहानपणीचा शुभमन गिल
फोटो कॅप्शन, लहानपणीचा शुभमन गिल

मायदेशी परतल्यानंतर भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य बॅट्समन आणि कर्णधारपद अशा दोन्ही भूमिका शुभमन गिल याने समर्थपणे सांभाळल्या होत्या.

2018 मध्ये आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1.8 कोटी रुपये खर्चून शुभमनला संघात समाविष्ट केलं. ओपनर आणि भविष्यातील कॅप्टन म्हणून केकेआर संघ शुभमनकडे पाहतो आहे. शुभमननेही सातत्याने चांगल्या खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

2019 हंगामात शुभमनची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड झाली. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात शुभमनने 440 रन्स केल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)