You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी
कोरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच जय स्तंभाजवळ कुठलीही सभा घेण्यास परवानगी नाही. आजूबाजूच्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स लावता येणार नाही.
एल्गार परिषद होणार?
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरवर्षी हजारो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे एकत्र येतात. पण यंदा अनुयायांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच मास्क लावणे बंधनकारक असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल्स आणि जाहीर सभा घेण्यावरही बंदी आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण 1 जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने अनुयायी भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तभांला भेट देतात. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिली होती.
एल्गार परिषद होणार का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे 1 जानेवारीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एल्गार परिषदेच्या आयोजकांनी मात्र 31 डिसेंबरला कार्यक्रम करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. त्यासंदर्भातील पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.
एल्गार परिषदेचे आयोजक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "एल्गार परिषद आम्ही दरवर्षी घेतो. हा कार्यक्रम सांस्कृतिक असतो. या कार्यक्रमासाठी आंबेडकरवादी, लोकशाहीवादी अशा विविध संघटना देशभरातून येतात. याठिकाणी प्रबोधनात्मक भाषणं होतात. आर्थिक आणि सामाजिक विषमतेविरोधात आम्ही आमच्या भूमिका मांडत असतो."
एल्गार परिषदेसाठी आयोजकांकडून हॉलचे बुकिंग करण्यात आले आहे. पण अद्याप पोलिसांनी परिषदेसाठी परवानगी दिलेली नाही.
"पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही कोर्टात जाणार." असंही बी.जी.कोळसे पाटील यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्य सरकारने गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. तेव्हा एल्गार परिषदची मागणी का केली जात आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना बी.जी.कोळसे-पाटील म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दी होते तेव्हा कोरोनासंदर्भातील नियम कुठे जातात?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'मोजक्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी'
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मंगळवारी (22 डिसेंबर) भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ स्थळाला भेट दिली.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी घटनास्थळी पुण्यातील अनुयायांना येण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. पुणेबाहेरील अनुयायांनी मात्र घरूनच अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून याठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही करत आहोत. पण दरवर्षी याठिकाणी काही कार्यक्रम होत असतात. यामध्ये मानवंदना देणे, भीम आणि क्रांती गीतांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. अशा मोजक्या कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे."
चैत्यभूमीप्रमाणेच येथेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ अशा विविध संघटनांनी केले आहे.
भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय?
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धाला 1 जानेवारी 2021 रोजी 203 वर्ष पूर्ण होतील.
ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्याकाळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. हे युद्ध कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)