शरद पवार राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधू शकतात का?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात केंद्र सरकारच्या पश्चिम बंगालमधील हस्तक्षेपावर चर्चा झाली.

या चर्चेबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं, "राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा गंभीर आहे. गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जातील."

तसंच, ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न करतील, असंही मलिक म्हणाले.

यावरून आणखी एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते, ती म्हणजे, विरोधकांची मोट बांधण्याची जेव्हा कधी वेळ येते, तेव्हा शरद पवार हे नाव केंद्रस्थानी असतं. गेल्या दोन-तीन आठवड्यात सातत्यानं हे दिसून आलं.

त्यातला एक प्रसंग म्हणजे, पंजाब-हरियाणाच्या शेतकरी आंदोलनाचा.

या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय राजकारणातील विरोधक भारताच्या राष्ट्रपतींना भेटले. यावेळीही शरद पवार हेच नेतृत्त्वस्थानी दिसले.

दुसरा प्रसंग म्हणजे, गेल्या आठवड्यात झालेल्या यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चा.

खरंतर शरद पवार यांनी या चर्चा फेटाळल्या. मात्र, शिवसेनेसारख्या यूपीएत अद्याप नसलेल्या पक्षानेही पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राष्ट्रवादीतल्या नेत्यांनीही ते नाकारलं नाही.

नंतर पवारांनीच चर्चा फेटाळल्या आणि विषय बाजूला पडला. मात्र, या चर्चांनी पवारांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अद्याप किती ताकदीचं आहे, हेच दाखवून दिलं.

या सगळ्या प्रसंगांवरून काही प्रश्न उपस्थित होतात. ते म्हणजे, शरद पवार राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रीय होऊ पाहतायेत का, विरोधकांची मोट पवार बांधू शकतात का? आपण या प्रश्नांचा आढावा घेऊया.

पवार विरोधकांची मोट बांधू शकतात का?

वरिष्ठ पत्रकार सुनील चावके म्हणतात, "शरद पवार निश्चितपणे सर्व विरोधकांना एकत्र आणू शकतात. त्यासाठी लागणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत आणि सर्व विरोधकांशी त्यांचा संपर्कही आहे. किंबहुना, अनेक राज्यांमधील ताकदवान नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत."

किंबहुना, "आता पश्चिम बंगालमध्ये ते जात आहेत, याचा अर्थच असा की, संकटात सापडलेल्या मित्रपक्षाच्या नेत्याच्या किंवा सहकाऱ्याच्या मदतीला ते धावून जात आहेत, असाच संदेश देत आहेत," असं सुनील चावके म्हणतात.

याच प्रश्नावर बोलताना एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती म्हणतात, शरद पवार यांच्यात ते सर्व गुण दिसतात, जे एखाद्या नेत्यामध्ये असायला हवेत.

हे सांगताना ते मागच्या काही दिवसातल्या घडामोडी नमूद करतात. ते म्हणतात, "नुकतेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटायला गेलं, त्याचं नेतृत्त्वही शरद पवार यांनीच केलं होतं. त्या शिष्टमंडळात राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि इतर नेतेही होते."

"मध्यंतरी पवारांना युपीए अध्यक्ष बनवण्याच्याही चर्चा झाल्या. पवारांनी ते फेटाळलं. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर कुठली जबाबदारी दिली गेली, तर ते त्या क्षमतेचे आहेत."

ममता बॅनर्जींसोबत त्यांनी चर्चा करण्याचं प्रमुख कारणच हे आहे की, भाजपविरोधातील पक्षांच्या केंद्रस्थानी शरद पवार राहू इच्छित आहेत, असं निरीक्षण मनोरंजन भारती नोंदवतात.

काही दिवसांपूर्वी युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवेळी आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या 'स्वीकाहार्यते'बाबत मत व्यक्त केलं होतं.

'स्वीकाहार्यता आणि ज्येष्ठत्व'

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले होते, "शरद पवार यांचं राजकारणातील ज्येष्ठत्व, भाजपविरोधी किंवा विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सर्व पक्षांमध्ये पवारांबाबत असलेली स्वीकाहार्यता हे गुण पवारांना UPA चं अध्यक्षपद किंवा निमंत्रक म्हणून निवडीसाठी महत्त्वाचे आहेत."

याच मुद्द्याला महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे आणखी दोन मुद्दे जोडतात.

विजय चोरमारे म्हणतात, "भाजपविरोधात मजबूत आघाडी बांधायची असल्यास UPA ची पुनर्बांधणी आवश्यक आहे आणि त्यासाठी पवारांसारखा विविध पक्षांशी समन्वय साधणाराच नेता लागेल. तसंच, राष्ट्रीय राजकारणातला अनुभवही इथे कामी येऊ शकतो."

मग पवार अजूनही विरोधकांची मोट का बांधू शकले नाहीत?

पण प्रश्न असा उपस्थित होतो की, जर शरद पवार 'स्वीराहार्य' आहेत आणि विरोधकांची एकजूट बांधू शकतात, तर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ती का बांधली नाही? किंवा अजूनही ती एकजूट प्रत्यक्षात का येत नाहीय?

तर यावर सुनील चावके म्हणतात, "गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांना आव्हान देतील, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, तसं काही झालं नाही. त्यामुळे आता पवारांच्या नेतृत्त्वाची गरज व्यक्त केली जातेय."

मात्र, मनोरंजन भारती हे शरद पवारांच्या राजकीय भूमिकांशी हा प्रश्न जोडतात.

ते म्हणतात, "शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वात वेगवेगळ्या शेड्स मिळतात. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा भाजपशी जवळीक साधल्याच्या चर्चा झाल्या. त्यामुळे भाजपविरोधातले काही पक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत."

"आजच्या स्थितीत शरद पवार यांचं वय त्यांच्या बाजूनं नाही. हे त्यांनीच मला सांगितलं होतं की, आता वय असं नाही की नवीन जबाबदाऱ्या घ्याव्यात. मात्र, भारतीय राजकारणात शरद पवार यांचं महत्त्व अजूनही कायम आहे, हे निश्चित," असंही मनोरंजन भारती सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)