You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार हिवाळी अधिवेशनात पुन्हा जुन्या भूमिकेत का आले?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाकाळ अद्याप संपलेला नसल्यानं केवळ दोनच दिवस भरवण्यात आलेलं महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन काल संपलं. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प सादर झाला होता, पण त्यानंतर आर्थिक गणितं बदलली.
त्यामुळे अर्थसंकल्पाच्या अनेक पुरवणी मागण्यांसह 'शक्ती' विधेयकापर्यंत ते मराठा आरक्षण, अर्णब-कंगना आणि हक्कभंग प्रकरण असे अनेक मुद्दे या अधिवेशनात चर्चेला आले. राजकीय चर्चाही तापल्या. नव्या सरकारचं आणि विरोधक म्हणून भाजपाचं काम या अधिवेशनात कसं दिसलं? काही नवी समीकरणं या अधिवेशनात दिसली का?
अजित पवार 'इन एक्शन'
फडणवीस-मुनगंटीवार सरकारवर टीका करत असतांना या अधिवेशनात अजित पवारांनी या सरकारची विधानसभेतली बाजू जोरानं मांडली. साहाजिक होतं की बहुतांशी चर्चा ही अर्थसंकल्पातल्या पुरवणी मागण्यांवर होती.
पण तरीही अजित पवार परत 'इन एक्शन' आले आहेत असं बोललं गेलं. या सरकारच्या अगोदरच्या अधिवेशनामध्ये अद्यापही महाविकास आघाडीची स्थापना, अजित पवारांचं बंड हे सगळे विषय अद्याप चर्चेत होते, ताजे होते.
अजित पवारांवर विरोधक भाजपा टीका करत नाही आहे असंही निरिक्षण नोंदवलं गेलं. पण अगोदर शांत वाटलेले अजित पवार या अधिवेशनात सरकारची बाजू नेहमीच्या आवेशात सांभाळतांना दिसले. त्यांनी विरोधकांनाही 'राजकीय स्वप्नां'वरुन टोमणे मारले.
सरकारला एक वर्षं झालं आणि राजकीय समीकरणं आता स्थिर झाली, म्हणून अजित पवार पूर्वीच्या भूमिकेत आले असं म्हटलं गेलं. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवावरुन टोमणे मारले.
'नागपूरच्या सुशिक्षितांनी हरवलं ही खूप मोठी गोष्ट आहे' असं म्हणत अजित पवारांनी थेट फडवीसांनाही शाब्दिक चिमटे काढले आणि त्यानंतर 'नागपूरला पराभव झाला म्हणून भाजपातल्या काहींना आनंद झाला' असं म्हणत त्या पक्षातल्या गटबाजीवरही ते बोलले. गेल्या वर्षभरात फडणवीसांवर असं अजित पवार थेट पहिल्यांदाच बोलले असावेत.
पण या अधिवेशनातला त्यांचा आक्रमकपणा आणि मूड त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना दिलेल्या प्रत्युत्तरावरुन दिसून आला. मुनगंटीवार बोलत असतांना अजित पवार मध्येच काही बोलून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस 'माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो परत जिंकू शकत नाही' असं मुनगंटीवार म्हणाले. त्याला अजित पवारांनी लगेचच 'असं असेल तर मला पाडून दाखवाच' हे तिथंच आव्हान दिलं.
अजित पवारांची अधिवेशनात दिसलेली ही आक्रमकता आज अधिवेशन संपल्याच्या दुस-या दिवशी बाहेरही कायम राहिली. भाजपातले अनेक जण आमच्याकडे येतील असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की राजीनामा देऊन जर कुणी आमच्याकडे आलं तर महाविकास आघाडी एकच उमेदवार देईल.
त्यानंतर अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं वाग्युद्धच सुरू झालं. "अजित पवार राजकारणातला त्यांचा रिलेव्हंस टिकवण्यासाठी अशी विधानं करत आहेत. या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही," असं फडणवीस म्हणाले.
बाहेरच नव्हे तर भाजपा सभागृहातही या अधिवेशनात अर्थमंत्र्यांविरोधात आक्रमक झाली पहायला मिळाली. या अधिवेशनात तिथं कुठंही सॉप्ट कॉर्नर दिसला नाही.
"अजित पवारांचं बदललेलं रूप पहायला मिळालं हे मात्र नक्की. म्हणजे 23 नोव्हेंबरला शपथ घेतलेले हेच का ते अजित पवार असं वाटावं इतपत. पण त्यांनीच एकमेव अधिवेशनात सरकारची बाजू लढवली. कदाचित आता ही जबाबदारीच आहे, नवी समीकरणं होणार नाही असा 'स्वीकार' त्यांनी मनाशी केलेला दिसतो आहे. त्यामुळेच जबाबदार उत्तरं देत, प्रसंगी राजकीय बोलत, त्यांनी सरकारची बाजू मांडली," असं निरिक्षण अभय देशपांडे नोंदवतात.
राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मतेही अजित पवार आक्रमक झाले आहेत आणि त्यांची यामागे काही रणनीती आहे.
"शरद पवारांचा जेव्हा 80व्या वाढदिवसाचा कार्यक्रम झाला तेव्हाही ते मोकळेपणानं बोलले. त्यांनी जाहीर विधानं केली की बाहेरचे बरेच काही बोलतात पण जे झालं ते मला आणि बहिणीला सगळं माहिती आहे. घरच्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवारांचा वावर जसा होता तेही पाहिल्यावर मला असं वाटतं की कौटुंबिक पातळीवर काही गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत आणि काही ठरलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणावरही परिणाम दिसतो आहे.
"त्यांनी या सरकारला 1 वर्षं होऊ दिलं आणि ते फ्रंटफुटवर येत आहेत. दुसरीकडे पक्षानंही जे त्यांच्या वर्तुळातले आहेत त्यांनाही जवळ घेतलं. हा अजित पवारांनाही सिग्नल आहे. त्यामुळे आजही ते म्हणाले की भाजपातून काही लोक आमच्याकडे येतील. ते विस्तारवादी धोरण घेत आहेत का असाही प्रश्न आहे. त्यामुळे एक तर त्यांच्या काही गेम प्लान आहे किंवा त्यांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायचं ठरवलं आहे," नानिवडेकर पुढे सांगतात.
विरोधकांचा जोर आणि फडणवीस-मुनगुंटीवार आघाडीवर
जेव्हापासून नवीन सरकार आलं आहे तेव्हापासून अधिवेशन काळात कायम अशी चर्चा झाली आहे की मुख्यमंत्री जरी पहिल्यांदा विधिमंडळात आले असले तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे संसदीय राजकारणात मुरलेले नेते त्यांच्या बाजूला आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचा विरोधी पक्ष त्यांच्या नवा शत्रूपक्ष शिवसेनेला सभागृहात कसा अडचणीत आणणार? नव्या सरकारची काही अधिवेशनं जरी होऊन गेली तरीही हा प्रश्न अजूनही कुतुहलाचा आहे.
भाजपाचं आक्रमक रूप याही अधिवेशनात दिसलं. विशेषत: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी तर त्यांच्या उपरोधिक टोलेबाजीचा मुक्त वापर केला. पुरवणी मागण्यांवर बोलतांना तर त्यांनी अर्थमंत्रालयातला त्यांच्या अनुभव भाषणात दिसलाच, पण ते आक्रमकही झाले.
दुस-या बाजूला फडणवीसांनाही त्यांचा रोख अर्णब प्रकरण, मराठा आरक्षण, आरे कारशेड या प्रकरणांवरुन सरकारला धारेवर धरण्याकडे ठेवला. या आक्रमकतेमुळे दोनच दिवसांच्या अधिवेशनात विरोधक सरकारवर प्रभावी ठरले असं चित्र तयार झालं.
मुनगुंटीवारांच्या या अधिवेशनातल्या आक्रमकतेवर त्यांचे राजकीय विरोधक चिमटे काढायला विसरले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या भाषणात मुनगुंटीवारांचं नाव घेत फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याचा उल्लेख केला.
"एक तर वेळ कमी असल्यामुळे थेट प्रश्न विचारावे लागले. मेट्रो, कोरोना, अर्णब असे सगळे विषय एकदम आल्यामुळे ते प्रभावी वाटले. पण त्यामुळे सरकारचं काही अडलं असं दिसलं नाही. दोन दिवसात नऊ विधेयकं आणि अनेक पुरवणी मागण्या मान्य करुन घेतल्या. सरकारनंही फारशी विस्तारित उत्तरं दिली नाहीत. बहुतांश मंत्री थोडक्यातच बोलले. त्यामुळे भाजपाच्या भाषणाची चर्चा झाली, पण त्यातून काही साध्य झालं असं म्हणता येणार नाही," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
मुनगंटीवारांच्या आक्रमकपणामागे काही राजकीय सिग्नल आहे असं राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं. "एक तर त्यांना संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. भाजपात एवढा अनुभव असणारे ते आणि फडणवीस असे आहेत.
आता फडणवीसांना जर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याची शक्यता असेल तर त्यांच्यानंतर राज्यात मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हेच दोघे आहेत. ही स्थिती पाहून मुनगंटीवर आपलं पाऊल टाकताहेत आणि स्पर्धेत आपण आहोत हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे," असं नानिवडेकर म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)