महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन: सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुफान फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अनेक विषयांवर त्यांनी आपले म्हणणे मांडले.

शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत पण शहरांसाठी पैसे आहेत असंही ते म्हणाले.

"आरोग्य विभागाची नोकरभरती तातडीने होणं अपेक्षित होती. मात्र अजिबात नोकरभरती झाली नाही. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे. या संकटसमयी जहाजाचा कॅप्टन हतबल आहे," अशं सुधीर मुनगंटीवर म्हणाले.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस, डॉक्टर इत्यादींना आज 50 कोटी दिले. त्यांना आधीच द्यायला हवे होते, असंही मुनगंटीवार म्हणाले.

भाजचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्यांवर भाषण करताना जोरदार फटकेबाजी केली.

राज्याच्या आर्थिक स्थितीसह राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदीचा पाढा वाचत, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले.

"शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, पण नगरविकासमध्ये 877 कोटी आताच्या बजेटमध्ये आहेत. हे कोणतं प्रेम शेतकऱ्यांसाठी? प्रत्येक जाहीरनाम्यात सातबारा कोरा करू लिहिलंय. मग का नाही झालं? त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत," असं म्हणत मुनगंटीवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • आमदारांना खूश करण्यासाठी 1250 कोटी दिले, पण आरोग्य यंत्रणेला एक रुपया वाढून दिला नाही
  • एसटी पैसा नाहीये तुमच्याकडे, उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप केला तेव्हा 1002 कोटी एसटीसाठी मिळाले
  • एकीकडे सांगायचं की पैसा नाही पण तुमच्या संस्थेसाठी पैसा आहे, रयत शिक्षण संस्थेसाठी 10 कोटी दिले
  • जो येईल जाईल तो उठून म्हणून केंद्राने मदत करावी म्हणतो, इथे असं का रडता? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे
  • या देशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून पैसे आले नाहीत असा भास निर्माण केला नाही, महाराष्ट्रात तसा केला गेला
  • नितीन राऊत उगाच आमच्या सासुरवाडीच्या अशोक चव्हाणांना बदनाम करत होते. आम्ही अशोक चव्हाणांसोबत आहोत
  • विजेची सवलत दिली नाही हे मी समजू शकतो, पण यांनी तर एप्रिल फूल केलं, गरिबांच्या वीजेत प्रति युनिट 40 पैशांनी वाढवली
  • मुख्यमंत्री विरोधकांच्या संदर्भात घृणास्पद भावना ठेवून वागतायंत हे योग्य नाहीये

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विविध प्रश्नांवरून धारेवर धरलं.

"राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना बांधावर जाऊन दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आवाज बुलंद करू," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दिल्ली, अमेरिकेवर बोलल्याने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला.

मंत्र्यांच्या बंगल्यावर पैसे खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणीही त्यांनी केलीय. मराठा आरक्षण लागू करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्या, अशा मागण्या भाजपतर्फे करण्यात आल्या आहेत.

अपयश लपवण्यासाठी आणि चर्चा टाळण्यासाठी दोन दिवसांचेच अधिवेशन सरकार घेत आहे असा आरोप विरोधकांनी केला. दोन दिवसीय अधिवेशन पुरेसं नाही अशी नाराजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही व्यक्त केलीय.

राज्यातील विविध जातींच्या सामाजिक संतुलनासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद असलेल्या 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्यात.

तसंच मुंबई मेट्रोची कारशेड आरे इथून कांजुरमार्गला नेण्याचा मुद्दाही आज चर्चेत येण्याची शक्यता आहे.

सरकारविरोधात बोलणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचं अटकसत्र सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)