You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय शुभेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा
- Author, प्रभाकर मणी तिवारी
- Role, कोलकात्याहून, बीबीसी हिंदीसाठी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू हे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे मातब्बर नेते मानले जातात.
ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतरच अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
अधिकारी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केले जात होते. पण अधिकारी यांनी आपला निर्णय बदलला नाही. आता शुभेंदू अधिकारी पक्ष-सदस्यत्वाचा राजीनामा कधी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शुभेंदू अधिकारी बुधवारी (16 डिसेंबर) विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी पोहोचले, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकारी यांनी विधानसभा सचिवांकडे आपला राजीनामा दिला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना ई-मेल करून आपल्या राजीनाम्याची प्रत पाठवून दिली आहे.
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी अधिकारी यांचा राजीनामा आपण अद्याप स्वीकारला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
"नियमांनुसार, अधिकारी यांनी स्वतः अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागेल, सचिवांना राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नाही. कायदेशीर बाबी तपासूनच या विषयी निर्णय घेण्यात येईल," असं विमान बॅनर्जी म्हणाले.
अधिकारी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गुरुवारी (17 डिसेंबर) दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत शुभेंदू अधिकारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. त्यानंतर शनिवारी ते कोलकात्यात परततील.
तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी किंवा इतर कोणत्याही नेत्याने शुभेंदू यांच्या राजीनाम्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
ममता आणि शुभेंदू यांच्या दरम्यानचे संबंध कसे बिघडले?
मंगळवारी शुभेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी एकमेकांचं नाव न घेता एकमेकांवर टीका केली. त्यानंतरच अधिकारी यांचा भाजप प्रवेश नक्की झाल्याचं मानलं जातं.
यासोबतच या आठवड्यात अमित शाह हे मेदिनीपूरच्या दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या दौऱ्यात अमित शाह यांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
शाह यांच्या मेदिनीपूर येथील कार्यक्रमातील बदलामुळे याचे संकेत मिळत आहेत. शिवाय, शुभेंदू यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
शुभेंदू अधिकारी कोण आहेत, बंगालच्या राजकारणात त्यांचं महत्त्व किती?
तृणमूल काँग्रेसच्या वरीष्ठ नेतृत्वाने अधिकारी यांना जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भाजपची नजरही या नेत्यावर का आहे? शुभेंदू अधिकारी बंगालच्या राजकारणात इतके महत्त्वाचे का आहेत? हे प्रश्न आता उपस्थित होतात.
शुभेंदू यांनी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा 2006 मध्ये जिंकली होती. कांथी दक्षिण मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला होता.
त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी तमलुक मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 सालीही त्यांनी इथूनच विजय मिळवून आपली जागा राखली.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
अधिकारी कुटुंबीयांची राजकीय ताकद
शुभेंदू अधिकारी यांना सरकारमध्ये क्रमांक दोनचे नेते मानलं जात होतं. मेदिनीपूर परिसरात अधिकारी कुटुंबीयांचं वर्चस्व आहे.
शुभेंदू यांचे वडील शिशीर अधिकारी 1982 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
पुढे ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. शिशीर अधिकारी हे सध्या कांथी लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत.
शिशीर अधिकारी दुसऱ्या UPA सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्रीही राहिलेले आहेत. शुभेंदू यांचे भाऊ दिब्येंदू तमलुक लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. शुभेंदू यांचे आणखी एक भाऊ सौम्येंदू कांथी नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत.
नंदीग्राम आंदोलनाचे नियोजक
पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 16 जागांशिवाय पश्चिम मेदिनीपूर (18), बांकुडा (12) पुरूलिया (9), मुर्शिदाबाद (22) आणि मालदा (12) जिल्ह्यातील बहुतांश जागांवर अधिकारी कुटुंबीयांचा प्रभाव आहे.
मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यात पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना शुभेंदू यांनी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना तृणमूलमध्ये आणलं होतं. त्यांच्या मदतीने अनेक नगरपालिकांमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला.
यामुळे भाजप त्यांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे.
तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळण्यामध्ये नंदीग्राम आंदोलनाची महत्त्वाची भूमिका होती. या आंदोलनाचं नियोजन शुभेंदू अधिकारी यांनीच केलं होतं.
2007 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी कम्युनिस्ट पक्षांच्या सरकारविरुद्ध स्थानिकांना एकत्रित केलं होतं.
ममता बॅनर्जी यांच्यावरची नाराजी कशामुळे?
ममता बॅनर्जी यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभेंदू यांच्यासोबत असं काय झालं, ज्यामुळे ते दीदींच्या विरोधात गेले?
याचं उत्तर मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यांच्या घटनाक्रमावर नजर मारावी लागेल.
तृणमूल काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते सांगतात, "गेल्या काही काळापासून पक्षात उपेक्षा होत असल्याने शुभेंदू नाराज होते. पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत आहे. विशेषतः मेदिनीपूर जिल्ह्यातील विषयांसंबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली नाही. तसंच ममता बॅनर्जी या पक्षात त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणत आहेत. अभिषेक यांनाच पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून समोर आणलं जात आहे. याविषयी अधिकारी बंधुंमध्ये नाराजी आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)