You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरे कॉलनीमधील आदिवासींनी झाडांसाठी वर्ष श्राद्ध का घातलं?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वर्षभरापूर्वी तोडण्यात आलेल्या झाडांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आरे कॉलनीत का झाला?
"आपल्या जवळचं कुणी हे जग सोडून जातं, तेव्हा आपल्याला वाईट वाटतंच ना? मग झाडं आमच्यासाठी तेवढीच जवळची आहेत."
मुंबईच्या आरे कॉलनीतल्या केलटीपाड्यात राहणारे प्रकाश भोईर झाडांविषयी अगदी जिव्हाळ्यानं बोलतात. प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्यासारख्या आरे कॉलनीत राहणाऱ्या आदिवासींनी रविवारी (4 ऑक्टोबर 2020) झाडांचं वर्षश्राद्ध घातलं.
गेल्या वर्षी याच दिवशी मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरेमधल्या शेकडो झाडांची एका रात्रीत कत्तल झाली होती. त्याविरोधात आरेमधले आदिवासी आणि मुंबईतल्या पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या लढ्याला यश आलं आहे.
मेट्रो कारशेड आरेमधून हटवण्याचा निर्णयही झाला आहे आणि आरेतल्या आठशे एकर जागेला वनक्षेत्राचा दर्जाही मिळणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
पण त्यादिवशी झालेली झाडांची कत्तल मुंबईनं आणि महाराष्ट्रानं कधीही विसरू नये, असं प्रकाश भोईर यांना वाटतं.
"झाडं आमच्या घरातले सदस्य आहेत. आमचे सगे-सोयरे आहेत. आपल्या जवळच्या गेलेल्या माणसाचं आपण वर्षश्राद्ध घालतो, त्याची आठवण काढतोय तशीच आम्ही झाडांना श्रद्धांजली देतो आहोत.
"झाडांनी बलिदान दिलं, ते व्यर्थ गेलं नाही, लोक त्या रात्री जेलमध्ये गेले त्याचं चीज झालं. पण त्यांच्या हक्कांचा लढा अजून संपलेला नाही, हे विसरता येणार नाही," भोईर सांगतात.
काळरात्रीच्या आठवणी
एरवी मुंबईच्या मधोमध पण शहरापासून दूरच वाटणारं आदिवासींचं हे जग झाडांभोवती फिरतं. प्रजापूर पाड्यावर राहणाऱ्या आशा भोयेंना वर्षभरापूर्वीच्या त्या रात्री झाडं तोडली जात असल्याचं कळलं, तेव्हा काही क्षण सुन्न झाल्यासारखं वाटलं होतं.
"असं वाटत होतं की झाडं नाही कापलेली त्यांनी, तर आमच्या घरातल्याच कुणाचा तरी खून केला आहे. आम्ही लहानपणापासून झाडं लावतो, त्यांची लहान मुलांसारखी निगा राखतो, त्यांना मोठं करतो. मेट्रोवाले आले आणि झपाट्यात झाडं कापली."
मेट्रो- 3 प्रकल्पाचा मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झपासून आरेपर्यंत जमिनीखालून जाणार आहे. आरेमध्ये पोहोचल्यावर मेट्रो जमिनीवर येऊन कारशेडमध्ये जाईल असा प्रस्ताव होता. या प्रकल्पात आशा भोये यांच्या पाड्याची जमीन बाधित होती.
झाडं पडताना पाहणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता, ज्यातून सावरायला सगळ्यांना वेळ लागला असं आशा भोये सांगतात.
कलेतून झाडांना आदरांजली
आता वर्षभरानंतर आरेमधल्या आदिवासींना झाडांचा स्मृतीदिन का पाळावासा वाटतो, हे जाणून घेण्यासाठी मी गावदेवी पाड्यावर गेले होते. तेव्हा तिथेच आशा भोये आणि खांबाच्या पाड्यावर राहणाऱ्या वनिता ठाकरे यांची भेट झाली.
जंगलाविषयी बोलताना दोघी अगदी हळव्या होऊन जातात. "आदिवासी आणि जंगल हे समीकरण आहे. आदिवासी जंगलाशिवाय राहू शकत नाही आणि जंगल आदिवासींशिवाय राहू शकत नाही. जंगलात आमचं पोट आहे पूर्ण त्याच्यावरती."
झाडांविषयीचं हे प्रेम त्यांच्या चित्रांतून, गाण्यांतून आणि ढोलाच्या ठेक्यातूनही व्यक्त होतं. गावदेवी पाड्यात शिरताना तिथल्या मंदिरापासून चढून जावं लागतं. तिथेच एक भिंत लक्ष वेधून घेते.
झाडं तोडली त्या रात्रीचा प्रसंग आदिवासींनी वारली चित्रांतून त्या भिंतीवर उभा केला आहे. त्या रात्री मुंबईचे नागरीक आदिवासींच्या साथीनं उभे राहिले, याची आठवणही त्या चित्रातून होते.
वर्षभरात आरेमध्ये काय बदललं?
वर्षभरानंतर आरेमध्ये बरंच काही बदललं आहे. आरे कॉलनीतून मेट्रो कारशेड हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही आठवड्यांपूर्वी जाहीर केला होता. तसंच आरेमधल्या सहाशे एकर जागेला वनक्षेत्र घोषित करण्याचा निर्णयही घेण्य़ात आला.
यात आणखी दोनशे एकरची भर घालून आरेमधलं हे वनक्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडण्याचा प्रस्ताव आहे. आरेमधलं जंगल वाचलं याचा आदिवासींना आनंद वाटतो आहे, पण त्याविषयी अजून कुठलीच स्पष्टता नाही.
आरेमधल्या आदिवासींना वनहक्क संरक्षण मिळेल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पण नेमके कोणते हक्क, हे अजून सांगण्यात आलेलं नाही, असं प्रकाश भोईर सांगतात.
असं प्रकाश भोईर सांगतात. "एकतर सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे कुठला पाडा जाणार आहे, कुठला विभाग जाणार आहे. अठराशेपैकी आठशे एकर म्हणजे कोणती जमीन जाणार आहे.
"दुसरं म्हणजे आदिवासींचे अधिकार अबाधित राखू असं त्यांनी म्हटलंय, पण आदिवासींचे अधिकार म्हणजे त्यांच्या नजरेतून काय आहेत? ते आम्हाला मान्य होतील का?"
आदिवासींची भूमिका काय आहे?
सरकारनं घोषणा केली असली, तरी अजून लिखित स्वरुपात आदिवासींपर्यंत काही आलेलं नाही.
आरेमध्ये वनक्षेत्रात विखुरलेले पाडे एकत्र करण्याचा सरकारचा विचार असेल, तर त्याला आदिवासींचा स्पष्ट विरोध आहे. खांबाच्या पाड्यावर राहणाऱ्या वनिता ठाकरे सांगतात, "आम्हाला आमच्या जागेतून हालायचे नाही, जसं राहतो आहोत तसंच राहायचं आहे."
गावदेवी पाड्यावर राहणारे लक्ष्मण दळवीही त्याला दुजोरा देतात, "आम्ही पिढ्यानपिढ्या इथली जमीन कसतो आहोत, भात लावतो आहोत, ती जमीन आमच्यापासून कुणी हिरावून घेऊ नयेत."
आरेमधल्या आदिवासींना वीज, पाणी अशा सुविधाही मिळतात. त्या सुविधा राष्ट्रीय उद्यानाचा भाग झाल्यावर कायम राहतील का अशी शंका आदिवासींची मनात आहे. तसंच, राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आधीपासूनच राहणाऱ्या आदिवासींच्या हक्कांचा प्रश्नही उभा राहील असं प्रकाश भोईर यांना वाटतं.
भविष्यात कुठलाही प्रकल्प आणताना लोकांचा, झाडांचा विचार केला जावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
"वारंवार एखादा प्रकल्प येतो आणि आम्हाला संघर्ष करावा लागतो. किती दिवस आजून संघर्ष करावा आम्ही?" भोईर विचारतात.
आरेवरून राजकारण सुरूच
आरेमधली झाडं हा मुंबईत निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दाही बनला होता. मेट्रो-3 प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या MMRCL या सरकारी कंपनीनं कारशेडसाठी झाडं तोडण्याचं काम सुरू केलं, तेव्हा राज्यात भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत होतं.
पण त्यानंतर निवडणुकीत भाजपकडून सत्ता गेली आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाआघाडीचं सरकार आलं. शिवसेनेनं आरेमध्ये कारशेडच्या उभारणीला स्पष्ट विरोध केला होता.
त्यामुळंच शिवसेना सत्तेत आल्यावर आरेविषयीचं सरकारचं धोरणंही बदललं.
झाडं तोडली जात असताना विरोध प्रदर्शनं करणाऱ्यांवर तेव्हा दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा लगेचच दिलं होतं. घोषणा झाली असली, तरी अधिकृतरित्या अजून गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.
कारशेड आरेमधून बाहेर नेल्यानं मेट्रो-3चं मोठं नुकसान झालं आहे, असा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे, जो पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मान्य नाही.
आरेमधून कारशेड हटवून गोरेगाव पहाडी भागात नेण्याचा निर्णयही अनेकांना पटलेला नाही. त्यावरूनही चर्चा सुरू आहे.
'कोरोनानं झाडांचं महत्त्व पटवून दिलं'
दरम्यान, कोव्हिडचा़ संसर्ग टाळण्यासाठी आरेमध्ये रविवारी झाडांचा स्मृतीदिन साधेपणानं आणि थोडक्यात पाळण्यात आला.
या आजारानं झाडांचं, जंगलाचं महत्व आणखी अधोरेखित केलं आहे, असं जगभरातील तज्ज्ञ सांगतात. आशा भोयेही त्याचीच आठवण करून देतात.
"कोरोनानं दाखवलं आहे की जगण्यासाठी ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे. मग झाडं तर नैसर्गिक ऑक्सिजन देतात, त्यांना वाचवायला नको का? जे आरेमधल्या झाडांनी सोसलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)