You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याची काँग्रेसची टीका
संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे रद्द करण्यात आले असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केलं आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून याबाबत कळवलं आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच पक्षांना वाटत आहे की संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात यावे. थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली नव्हती असा खुलासा काँग्रेसने केला आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि थोड्याच दिवसात लस येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करता येऊ शकते असं जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.
मी विविध पक्षांच्या नेत्यांशी अनौपचारिकरीत्या चर्चा केली. त्यात कळलं की अनेक नेत्यांनी कोरोनाबाबतची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने हे अधिवेशन रद्द करण्यात येत आहे असं जोशी लिहितात.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की प्रल्हाद जोशींनी राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासोबत याबाबत चर्चा केली नव्हती.
"स्पर्धा परीक्षा कोरोना काळात आयोजित करण्यात आल्या. अनेक राज्यात शाळाही सुरू झाल्या आहेत. विद्यापीठांद्वारे परीक्षांचं आयोजन केलं जात आहे. बिहार आणि बंगालमध्ये रॅलीज घेतल्या जात आहेत. पण संसदेचं हिवाळी अधिवेशन घेता येत नाही. असं का? देशात लोकशाही असल्याचं हे लक्षण आहे का?", असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
"शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा करण्याऐवजी सरकारने या मुद्यापासून पळ काढला आहे. कोरोनाच्या नावाखाली संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं. मात्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढायचा नसल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे", असं आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)