You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात एका हातानं सफाईचं काम सुरू ठेवणाऱ्या लढवय्यासमोर पुन्हा संकट
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाच्या काळातही एका हाताने सफाईचं काम सुरू ठेवणारे कोल्हापूर महापालिकेतले सफाई कर्मचारी बाजीराव साठे यांना पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय.
दोन वर्षांपूर्वी सफाई काम करत असताना बाजीराव यांच्या बोटाला जखम झाली होती. त्यात गँगरीन झाल्याने त्यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही ते केवळ एका हाताने कोल्हापूरच्या रस्त्यांवर सफाई काम करत होते. लॉकडाऊनमध्ये देखील त्यांनी आपलं काम थांबवलं नव्हतं. बीबीसी मराठीने त्यांच्या या कामाची बातमी दाखवली होती.
पण लढवय्या असलेल्या बाजीराव यांच्यावर पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलं आहे.
काही दिवसांपूर्वी काम करत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली त्यानंतर पाय सुजले आणि ताप आला. डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर सेल्युलायटिस नावाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सध्या त्यांच्यावर कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतीच त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाला झालेली जखम साफ करून त्यांच्यावर आता औषध उपचार करण्यात येत आहेत.
बाजीराव यांनी आधीच एक हात गमावलेला आहे आता दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना आणखी काही काळ घरीच रहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर घर चालवण्याचं मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय.
बाजीराव यांची पत्नी अंध असल्याने संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते एकटेच झटत होते. त्यात आता शारीरिक संकट आल्याने बाजीराव यांना जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
ऑक्टोबरमध्ये बीबीसी मराठीने बाजीराव यांचा लढवय्येपणा बातमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला होता. त्यावेळी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी याबाबत योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.
आज पुन्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर महापालिकेने बाजीराव साठे यांना दिव्यांग भत्ता म्हणून 2200 रुपये तात्काळ सुरू केले असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. तसंच 2018 मध्ये हात गमावल्यानंतर दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तेव्हापासूनची थकीत रक्कमही त्यांना देण्यात येणार आहे.
सध्या बाजीराव साठे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, सरकारी निर्णयानुसार 27 हजार इतक्या आजारांना सरकारकडून वैद्यकीय मदत मिळण्याची तरतूद आहे. शासन आदेशानुसार रुग्णाला 3 लाख रुपयांची मदत मिळू शकते.
बाजीराव साठे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या आजाराबाबतची कागदपत्रे महापालिकेत सादर करावी लागतील. त्यानंतर सरकारकडून त्यांना त्यांच्या उपचाराचा खर्च देण्यात येण्यात येणार आहे, असं कामगार अधिकारी चल्लावाड यांनी सांगितलं.
बाजीराव यांना आता पुन्हा काम करता येईल की नाही याबाबत देखील शंका आहे. यावरून जर बाजीराव साठे यांची इच्छा असेल तर त्यांच्या वारसाला ही नोकरी देण्यात येईल, असंही चल्लावाड यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)