शेतकरी आंदोलन असो वा शाहीन बाग घोषणा देणाऱ्या स्त्रियांमुळे कोणाची झोप उडाली?

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी हिंदी

आधुनिक समाजात ज्यावेळी स्त्रीने स्वतःच्या अधिकारांसाठी पहिल्यांदा उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवलं असेल त्यावेळी एकदिवस स्त्रिया मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, अशी कुणी अपेक्षाही केली नसेल.

मात्र, आज स्त्रिया केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही हक्काच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.

शाहीन बागच्या आज्या असो किंवा पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी किंवा मग केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गावखेड्यातून दिल्लीत आलेल्या महिला.

आज स्त्रिया जे घडतंय ते निमूटपणे बघत बसत नाहीत तर परिवर्तन घडवण्याच्या कार्याच्या त्या स्वतःही भाग घेत आहेत. त्या कधी शांततेच्या मार्गाने लढतात तर कधी सरकारला आव्हान देणाऱ्या, पोलिसांच्या लाठ्या-काठ्‌या झेलणाऱ्या कणखर स्त्रिया असतात.

या स्त्रीशक्तीची दखल आता मीडिया आणि सोशल मीडियाही घेतो. ती आज घराबाहेर पडली आहे. मोकळेपणाने आपलं म्हणणं मांडू लागली आहे. इतकंच नाही तर आज त्यांच्याकडे कुणी दुर्लक्षही करू शकत नाही.

नागरिकत्व कायदा आणि कृषी कायद्यांविरोधात होणाऱ्या निदर्शनांमध्ये स्त्रिया हिरीरीने सहभागी होताना दिसतात.

या मुद्द्यांवर विरोध व्हायला हवा किंवा नको, यावर वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र, या निदर्शनांना महिलांमुळे अधिक ताकद मिळाली, हे निर्विवादपणे सर्वच मान्य करतील.

मात्र, निदर्शनं वगळता या स्त्रीशक्तीचा कुठे-कुठे संचार झालाय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्रियांचा हा निर्धार आणि धैर्य समाजात होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत का आणि त्यातून किती बदल घडून येईल?

स्त्रियांची सुशिक्षित पिढी

निदर्शनांमध्ये स्त्रियांच्या वाढत्या सहभागाविषयी ज्येष्ठ पत्रकार गीता श्री म्हणतात, "स्त्रिया त्यांच्या आसपासच्या समाजाविषयी अधिक जागरूक आणि स्पष्टवक्त्या झाल्या आहेत. त्या केवळ घरापर्यंत मर्यादित नाहीत, त्यांचं परिघ वाढलं आहे. आज ती संपूर्ण समाजाबद्दल मत मांडणारी जागरूक आणि विवेकी स्त्री आहे."

आज स्त्रियांची एक संपूर्ण सुशिक्षित पिढी तयार झाल्याचं गीता श्री म्हणतात. या पिढीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या शिक्षित पिढीच्या संगतीत जुनी पिढीही बदलत असल्याचं गीता श्री यांना वाटतं.

मात्र, निदर्शनांमध्ये स्त्रिया कायमच सहभागी होत्या. मात्र, आजच्या काळात त्या अधिक संख्येने दिसू लागल्याचं अखिल भारतीय प्रगतीशील महिला असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांचं म्हणणं आहे. आज मीडिया आणि सोशल मीडिया त्यांना अधिक महत्त्व देतात आणि त्यांचं नेतृत्वही अधिक स्पष्ट दिसू लागलं आहे.

त्या म्हणतात, "स्त्रिया आज एका कठीण काळात लढा देत आहेत. त्यांना धमक्या मिळतात. अटक होण्याची भीती असते. मात्र, तरीही त्या अत्यंत धीराने पुढे येत आहेत."

निर्भया प्रकरणापासून शेतकरी आंदोलनापर्यंत

स्त्रियांमध्ये ही जागरुकता आणि धाडस याआधीही दिसलं होतं. डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरणानंतर इंडिया गेटवर महिलांनी धैर्य आणि दृढनिश्चयाने सरकारला लैंगिक छळाविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडलं.

महाराष्ट्रात मार्च 2018 मध्ये शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई मोर्चा काढला होता. यात महिला शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. चालून चालून पायांना जखमा झालेल्या स्त्रियांचे फोटो आजही इंटरनेटवर मिळतात.

यानंतर नोव्हेंबर 2018 साली कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातल्या वेगवेगळ्या भागातून महिला शेतकरी दिल्लीत पोहोचल्या होत्या.

या स्त्रीशक्तीला वयाचं बंधन नाही. तरुण, प्रौढ आणि वृद्ध, वय काहीही असो. रस्त्यावर उतरणाऱ्या महिलांचा निश्चय अढळ असतो.

सबरीमाला मंदिर असो किंवा हाजी अली दर्गा. प्रवेशासाठी महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंसक विरोधकांना धाडसाने सामोऱ्या गेल्या.

तरुणींचा सहभाग

23 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या नेहा भारती अनेक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या आहेत. अण्णा आंदोलनापासून अनेक आंदोलनांमध्ये आपल्या सहकारी मैत्रिणींसोबत भाग घेतल्याचं त्या सांगतात.

शिक्षण आणि करिअरवर फोकस करणाऱ्या तरुणींचा या आंदोलनांमधल्या सहभागाविषयी त्या म्हणतात, "शिक्षण आणि करिअर आपल्या ठिकाणी आहे. मात्र, एखाद्या मुद्द्यावरून मोठ्या संख्येने लोक प्रभावित होत असेल त्यावेळी तुम्ही गप्प बसू शकत नाही. आपणही त्यात सहभाग नोंदवायला हवा, असं आपल्याला वाटू लागतं. निदर्शनांमध्ये दिवस-रात्र बसून असणाऱ्या वृद्ध महिला आमच्या प्रेरणास्रोत आहेत."

त्या पुढे म्हणतात, "आमच्यासाठी हे सर्व सोपं नसतं. उदाहरणार्थ काही मुलींचे कुटुंबीय निदर्शनांना घाबरतात. यामुळे एका मुलीला बरेच दिवस घरातच राहवं लागलं होतं. मात्र, याहूनही मोठी अडचण म्हणजे मुलींना मिळणाऱ्या धमक्या. मला अनेकदा अपहरण आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, तरीही आम्ही थांबलो नाही."

ज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरीही म्हणतात, "निदर्शनांमध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठांमधल्या विद्यार्थिनींचा सहभाग यापूर्वी कधीही नव्हता इतका अभूतपूर्व आहे. या तरुण मुलींमध्ये भरपूर ऊर्जा आहे आणि त्याच बदल घडवून आणू शकतात. त्या महत्त्वाकांक्षी आहेत आणि आपण काहीही करू शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे."

स्वातंत्र चळवळीतही स्त्रियांनी सहभाग घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, स्वातंत्रप्राप्तीनंतर त्यांना जे राजकीय आणि सामाजिक स्थान मिळायला हवं होतं, ते मिळालं नाही. मात्र, तो त्यांच्या जडणघडणीचा काळ होता.

त्या पडद्यामागे होत्या. शिक्षण आणि इतर अधिकारांसाठी संघर्ष करत होत्या. मात्र, 80 च्या दशकात महिला आरक्षणाची मागणी आली. त्याचं पुढे काही झालं नसलं तरी आजची परिस्थिती खूप वेगळी आहे.

निदर्शनांमधील स्त्री सहभागामुळे काय बदल घडेल?

स्त्रीने रस्त्यावर उतरणं केवळ निदर्शनांपुरतं मर्यादित नसल्याचंही जाणकारांना वाटतं. याचे दूरगामी परिणाम आहेत. यामुळे त्यांच्यी आत्मिक शक्ती तर वाढलीच. शिवाय, त्या इतर स्त्रियांचंही सबलीकरण करत आहेत.

पोलीस आणि प्रशासनाला आव्हान देत त्या खंबीरपणे उभ्या ठाकतात त्यावेळी ते धाडस त्यांच्या व्यक्तित्वाचाच भाग बनतात. त्यांना टिव्हीवर बघणाऱ्या मुली आणि स्त्रियांना स्त्रीचं एक वेगळंच रूप दिसतं.

गीता श्री म्हणतात, "आज तुम्ही स्त्रियांवर सहज निर्बंध लादू शकत नाही. येणाऱ्या काळात प्रत्येक मुद्द्यावर स्वतःचं मत, समज आणि पसंती असणाऱ्या अधिक आक्रमक स्त्रिया तयार होत आहेत. आंदोलनांमध्ये स्त्रियांचा सहभाग आणखी वाढेल आणि त्या नेतृत्वही करतील."

त्या म्हणतात, "पूर्वी स्त्रियांविषयी समाज फार मोठी स्वप्न बघत नव्हता. मात्र, आज समाज, कुटुंब आणि स्त्रियांची स्वप्न बदलली आहेत. मुलींच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. आई-वडिलांनाही मुलींची प्रगती बघायची आहे. लोकांनी आज हे स्वीकारलं आहे. मग त्यामागे जागरुकता कारण असो किंवा आर्थिक गरज. हाच विचार यापुढे अधिक बळकट होईल."

आंदोलनांमध्ये स्त्रियांचा वाढत्या सहभागाचे सामाजिक आणि राजकीय परिणामही दिसतील, असं कविता कृष्णन यांना वाटतं.

त्या म्हणतात, "संघर्ष न करता पितृसत्ता संपवता येणार नाही. लढणाऱ्या स्त्रीला बघून ताकद मिळते. अधिक लढण्याची इच्छा होते. सोबतच महिलांसाठी नेतृत्त्वाचा मार्गही खुला होतो."

स्त्रियांचा वापर?

आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रियांना जाणीवपूर्वक आंदोलनाचा चेहरा बनवलं जात असल्याचे आरोपही होतात. कारण पोलीस सहसा महिलांवर कठोर कारवाई करत नाही आणि मीडियाही त्यांना विशेष महत्त्व देतो.

कविता कृष्णन यांना हे आरोप अजिबात मान्य नाही.

त्या म्हणतात, "यावरून ते स्त्रियांना किती कमी लेखतात, हेच दिसतं. स्त्रियांवर पोलिसी कारवाई होते. महिलांनाही अटक होते. त्यांनाही लाठ्या-काठ्या खाव्या लागतात. त्या महिलांशी बोलल्यावरच तुम्हाला कळेल की त्यांना मुद्दा कळला आहे की नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून कुणी इतके दिवस आंदोलनात ठाण मांडून बसेल का? त्या स्वयंप्रेरणेने सहभागी होतात."

तर पूर्वीही असं घडल्याचं गीता श्री म्हणतात. राजकीय पक्षांनी असं अनेकदा केलंय. मात्र, आपण इथे का आलोय, याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यांना मुद्दा मान्य नसेल तर त्या पोलिसांच्या लाठ्या का खातील? हा वापराचा मुद्दा नाही. स्त्रियांच्या सहभागाशिवाय कुठलंही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, याची पुरुषांनाही पूर्ण कल्पना आहे.

ही बाब सकारात्मक असल्याचं गीता श्री यांना वाटतं. बाहेर पडण्यासाठीचं कारण कुठलंही असलं तरी उंबरठ्याबाहेर पडल्यावर त्यांची शक्ती जगाला दिसली आहे. स्त्रियांनाही स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. त्या केवळ चुल फुंकत नाही तर सरकारची झोपही फुंकून उडवू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)