कोरोना काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ का झाली?

    • Author, निधी राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, मुंबई

जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या 31 वर्षीय सकीना गांधी सध्या प्रचंड व्यस्त आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एक नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला आणि शेअर मार्केटसंबंधी अभ्यासाला सुरुवात केली.

सकीना सांगतात, "लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे पुरेसा वेळ होता. या काळात मी शेअर बाजाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. यासंदर्भात पुरेशी माहिती गोळा करूनच मी निर्णय घेऊ शकणार होते."

सुरुवातीचे 15 दिवस मी शेअर बाजार समजून घेण्यासाठी वेळ दिला. काही शेअर्सची यादी बनवली आणि या शेअर्समध्ये कसे बदल होत आहेत याकडे कटाक्षाने लक्ष दिले. काही सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी ते शेअर्स खरेदी केले."

सकीना यांनी म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक केली आहे. कोरोना काळात शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. त्याच वेळेस सकीना यांची रुची शेअर बाजारात वाढली. त्यांना हा पर्याय फायदेशीर वाटला. यासाठी त्यांनी डिमॅट खाते उघडले. यामार्फत अतिरिक्त कमाई करण्याची त्यांची इच्छा होती.

सकीना सांगतात, "हे माझे पैसे आहेत. यात माझे पती किंवा इतर कुणीही दखल देत नाही. म्हणूनच मी विचार केला की थोडी जोखीम घ्यायला हरकत नाही. सकीना दररोज वर्तमानपत्र तपासत होत्या. त्यांनी शेअर बाजारातील बातम्यांसाठी गुगलअलर्टसुद्धा सुरु केले आहे."

पहिल्यांदा गुंतवणूक

शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या सकीना गांधी या एकमेव नाहीत.

कोरोना काळात उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला. यातून बाजार सावरण्यास वेळ लागणार आहे. परंतु, शेअर बाजाराला त्याची चिंता नाही. उलट, या वर्षाच्या सुरुवातीला शेअर्सच्या किंमती कमी झाल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

शेअर बाजारातील नफा-तोटा यापासून अंतर ठेवून असणाऱ्यांनी आता गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

36 वर्षीय रितिका शहा यांनीही लॉकडॉऊन दरम्यान शेअर बाजारात प्रवेश केला. यापूर्वी त्या जनसंपर्क क्षेत्रात काम करत होत्या.

बीबीसीशी बोलताना रितिका यांनी सांगितलं, "माझे कुटुंब शेअर बाजारात गुंतवणूक करते. मलाही एकदा हा अनुभव घ्यायचा होता. पण मी योग्य वेळेची वाट पाहत होते. लॉकडॉऊनमध्ये मला माझ्या अर्थसंकल्पाचे नियोजन करण्यासाठी वेळ मिळाला. यासंदर्भात मला माहिती मिळवण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेळ मिळाला.''

मार्च महिन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे असं त्यांना वाटले आणि त्यांनी त्या दिशेने एक पाऊल टाकले. रितिका सांगतात, "यामुळे तुम्हाला कर वाचवण्यासाठीही मदत मिळते. दर महिन्याला मी 50 हजार रुपये गुंतवणूक करते आणि यात मी आणखी 10 हजार रुपये वाढवण्याचे नियोजन करत आहे."

किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये वाढ

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये यंदा 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, "एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 63 लाख नवीन डिमॅट खाती तयार करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 27.4 लाख नवीन खाती बनली होती. याचा अर्थ डिमॅटच्या खात्यांमध्ये 130 टक्के वाढ झाली."

भारतातील सर्वात मोठी ट्रेडिंग अकाऊंट डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) नुसार गुंतवणूकदारांनी 2020 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 50 लाख नवीन डिमॅट खाती उघडली आहेत. ही संख्या गेल्या पाच वर्षांत उघडलेल्या डिमॅट खात्यांच्या निम्मी आहे.

जेरोधासारख्या ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहिली आहे. या गुंतवणूकदारांनी डिमॅट अकाऊंट्सच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटचा वापर सुरू केला आहे.

जेरोधाचे सहसंस्थापक आणि सीआयओ निखिल कामत सांगतात, "मार्चपासून दर महिन्याला उघडणारी सरासरी डिमॅट खाती 100 टक्क्यांनी वाढली आहेत. कोरोना काळात ही तेजी आली आहे."

जेरोधामध्ये 30 लाख सक्रिय गुंतवणूकदार आहेत आणि त्यापैकी 10 लाख गुंतवणूकदार लॉकडॉऊन लागू झाल्यापासून (म्हणजे मार्चपासून) सहभागी झाले आहेत.

लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होमची कमाल

तज्ज्ञांच्या मते लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे लोकांना शेअर बाजारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळू मिळाला. दैनंदिन कामामुळे यापूर्वी हे करणं त्यांना अशक्य वाटत होते.

शेअर बाजारात रस असलेल्या अनेकांना कार्यालयामुळे सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शेअर बाजारावर नजर ठेवता येणं शक्य नव्हतं.

निखिल कामत सांगतात, "मजबूत आणि मोठ्या भांडवल बेस कंपन्यांची प्रचंड सवलतीची किंमत, घसरते व्याजदर, गेल्या दशकभरापासून स्थीर असलेली रिअल इस्टेट, लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे मिळालेला वेळ अशा सर्व बाबींमुळे लोकांची शेअर बाजारात रुची वाढली."

म्युच्युअल फंड उद्योगात झपाट्याने झालेल्या घसरणीमुळे लोकांना थेट बाजारात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. तज्ज्ञांच्या मते अनेक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणारे तंत्रज्ञान अवलंबत आहेत.

इतर काही कारणं

स्वस्त मोबाईल फोन आणि डेटामुळे लोकांचे शेअर बाजारात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. अनेक ब्रोकिंग कंपन्या गुंतवणूकदारांकडून ब्रोकिंग फीही घेत नाहीत आणि यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होतात.

अनेक ब्रोकिंग प्लॅटफॉर्मने गुंतवणूकदारांना शेअर बाजाराबद्दल पटवून देण्यास आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे.

उदाहरणार्थ, जेरोधाने आपल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजाराची शिकवणी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांचे पेज व्ह्यूज दिवसाला 45 हजारवरून 85 हजारपर्यंत वाढले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सेबीने डिमॅट खातं उघडण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ केली आहे.

गुंतवणूकदार केवायसीच्या माध्यमातून काही मिनिटांत डिमॅट खाती उघडतात. सेबीने ई-साइन आणि डीजी-लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे प्रथमच गुंतवणूकदारांना त्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवत लवकर नोंदणी करण्यास मदत होते.

महिलांचा सहभाग

जेरोधाच्या आकडेवारीनुसार, बहुतांश महिला ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये रस दाखवत आहेत. निखिल कामत सांगतात, "नवीन महिला गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली आहे हे स्पष्ट आहे. भारतात कोरोना विषाणूच्या साथीनंतर जेरोधाचे 15 लाखांहून अधिक नवीन ग्राहक बनले. यात 2.35 लाख महिलांचा समावेश आहे."

जेरोधामध्ये एकूण 5,60,000 महिला गुंतवणूकदार असून त्यांचे सरासरी वय सुमारे ३३ वर्षे आहे.

फायर्स हे सुद्धा एक स्टॉक ब्रोकिंग ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. फायर्समध्येही कोरोना काळात पूर्वीच्या तुलनेपेक्षा महिला गुंतवणूकदारांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फायर्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस खोडे यांनी बीबीसीला सांगितले, "महिला व्यापारापेक्षा गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात. बऱ्याच काळापासून महिला आपल्या पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करत आल्या आहेत. तसेच पैसे रोखीने ठेवले जातात अथवा त्या कर बचतीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. पण यावेळी लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे महिलांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली."

तरुण गुंतवणूकदारांमध्ये वाढ

आणखी एक महत्त्वाची बाबम्हणजे ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. जेरोधा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात 20 ते 30 वयोगटातील तरुण गुंतवणूकदारांमध्ये 50-55 टक्क्यांवरून 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अपस्टॉक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांचे सरासरी वय 29 वर्षे आहे. यापूर्वी साधारण 31 वर्षांच्या गुंतवणूकदारांची संख्या अधिक होती.

फायर्समध्येही 50 टक्के गुंतवणूकदार तरुण आहेत. तेजस खोडे सांगतात, "गेल्या काही महिन्यांत तरुणांनी शेअर बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाइल ट्रेडिंग वाढले आहे. व्यापाराच्या टिप्स केवळ जाणून घेण्यापेक्षा शेअर बाजार कशा प्रकारे काम करते हे समजून घेण्यासाठी अधिक वेळ देणारी पिढी आपण पहिल्यांदाच पाहत आहोत,"

इंडिया इन्फोलाइन फायनान्सची उपकंपनी 5paisa.com यांच्या मते, 18 - 35 वर्षे वयोगटातील गुंतवणूकदार कोरोनाकाळात 81 टक्क्यांनी वाढले आहेत. यापूर्वी ही टक्केवारी 74 टक्के एवढी होती.

गुंतवणूकदारांसाठी टिप्स

शेअर बाजार कायम एक आकर्षक क्षेत्र राहिले आहे आणि यापुढेही ते आकर्षित करत राहणार. पण या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) अध्यक्ष नीलेश शहा सांगतात,

गुंतवणूकदारांनी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या बॅलन्सशीटकडे पाहिले पाहिजे. कंपनीकडे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का, याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. नीलेश शहा गेल्या 25 वर्षांपासून शेअर बाजारावर लक्ष ठेवून आहेत.

ते पुढे सांगतात, "भविष्य आव्हानात्मक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनी किती मजबूत आहे हे पाहिले पाहिजे."

बॅलन्सशीटव्यतिरिक्त गुंतवणूकदारांनीही लक्ष दिले पाहिजे की कंपनी व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी करण्याचा सतत प्रयत्न करत आहे का?

नीलेश शहा तिसरा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात. तो म्हणजे कंपनी किती डिजिटल आहे? कंपनी तंत्रज्ञानाचा लवकर अवलंब करते का आणि डिजिटली मजबूत आहे का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)