शरद पवार UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का?

शरद पवार, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

यूपीएचं नेतृत्व काँग्रेस बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांचीही तशी भूमिका असू शकते असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसते. त्यांनी अनेक वर्ष यूपीएचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळलं. पण आता देशात अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षात नाराजी नाही. आज यूपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे."

संजय राऊत असं पहिल्यांदाच म्हणाले नाहीत. याआधी 12 डिसेंबर 2020 रोजीही त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, "शरद पवार UPA चे अध्यक्ष झाल्यास आनंदच होईल. मात्र, पवारांनी स्वत: हे फेटाळलं आहे. शरद पवार जर यूपीएचे अध्यक्ष झाले, तर आम्ही त्यांचं समर्थन करू. काँग्रेस आता कमकुवत झालीय. विरोधकांनी एकत्र येऊन UPA ला ताकद देणं गरजेचं आहे."

त्यावेळी, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या चर्चांना बळ देणारं विधान केलं होतं.

"राजकारणात प्रणब मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी हे वरिष्ठ नेते होते. त्यांच्यानंतर शरद पवार साहेब हे एकमेव अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे युपीएचं पद येऊ शकतं. मात्र, हा निर्णय दिल्लीमध्ये सर्वानुमते आणि कोणाचा विरोध न होता होणं अपेक्षित आहे. पवार साहेबांनी मात्र या सगळ्याचाच इन्कार केला आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

त्यावेळी शरद पवार यांनी मात्र यूपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चा फेटाळल्या होत्या.

शरद पवार, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, तरीही शरद पवार UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का, याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरूच आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं घेतला होता.

तत्पूर्वी, आपण यूपीए म्हणजे काय, ती कधी स्थापन झाली हे पाहूया.

UPA म्हणजे काय?

संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) ही एक राजकीय पक्षांची आघाडी आहे. 2004 लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली विविध राजकीय पक्षांची मोट बांधली होती. या आघाडीचं नेतृत्व स्वत: सोनिया गांधी यांनीच केलं.

2004 ला काँग्रेसने सत्तेसाठी विविध पक्षांना सोबत घेऊन बनवलेल्या आघाडीने दोनवेळा सलग केंद्रात सत्ता मिळवली. यातील 2004 च्या पहिल्या सरकारला UPA-1, तर 2009 च्या म्हणजे दुसऱ्या सरकारला UPA-2 चं सरकार असं संबोधण्यात येतं.

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

UPA ची स्थापना झाल्यापासून याचं नेतृत्व काँग्रेसकडेच आहे. आजतागायत सोनिया गांधी याच UPA च्या अध्यक्ष आहेत.

आता सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असल्या तरी त्या वयोमानामुळे आणि तब्येतीमुळे राजकारणात पूर्वीइतक्या सक्रीय राहत नाहीत. काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपदही त्यांनी पर्यायानं स्वीकारल्याचं बोललं जातं. त्यामुळे UPA चं अध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता आहे.

मात्र, आता विरोधी पक्षांमध्ये आणि विशेषत: UPA-1 आणि UPA-2 मधील सहभागी पक्षांमध्ये राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव पाहता तुलनेनं वजनदार नेता म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. पण आता प्रश्न उपस्थित होतो की, काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आणि सुरुवातीपासूनच काँग्रेसचा वरचष्मा राहिलेल्या UPA ची धुरा शरद पवारांकडे दिली जाऊ शकतात का? हा प्रश्न उरतोच.

'स्वीकाहार्यता आणि ज्येष्ठत्व'

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शरद पवार यांचं राजकारणातील ज्येष्ठत्व, भाजपविरोधी किंवा विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सर्व पक्षांमध्ये पवारांबाबत असलेली स्वीकाहार्यता हे गुण पवारांना UPA चं अध्यक्षपद किंवा निमंत्रक म्हणून निवडीसाठी महत्त्वाचे आहेत."

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

याच मुद्द्याला महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे आणखी दोन मुद्दे जोडतात.

विजय चोरमारे म्हणतात, "भाजपविरोधात मजबूत आघाडी बांधायची असल्यास UPA ची पुनर्बांधणी आवश्यक आहे आणि त्यासाठी पवारांसारखा विविध पक्षांशी समन्वय साधणाराच नेता लागेल. तसंच, राष्ट्रीय राजकारणातला अनुभवही इथे कामी येऊ शकतो."

'पवारांमध्ये विरोधकांना एकत्र करण्यासाठीचं कसब'

शरद पवार यांना नेतृत्व देण्यात आल्यास त्याचा सर्वच विरोधी पक्षांना लाभ होऊ शकतो, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील चावके यांचंही मत आहे.

चावके सांगतात, "शरद पवारांमध्ये विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी लागणारं कसब आहे. ते त्यांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. सद्या काँग्रेस पक्ष मरगळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाचा लाभ काँग्रेससह इतर पक्षांना होऊ शकतो."

शरद पवार, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनीही झी 24 तासवर केलेल्या विश्लेषणात म्हटलं, "सध्याच्या घडीला भाजपविरोधात संघर्ष करायचा असेल, तर सर्व घटक पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात त्यांनी ते विधानसभेला दाखवून दिलं. UPA चा विस्तार वाढवणं गरजेचं आहे. शरद पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 1991 पासून देशाच्या राजकारणात आहेत. सर्वच पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यामुळे सर्वांना एकत्रितपणे उभे करण्यात शरद पवारांचा अनुभव कामी येऊ शकतो. पवार UPA अध्यक्ष झाल्यास महाराष्ट्र पॅटर्न देशात दिसू शकतो."

काँग्रेस UPA मधील वर्चस्व सोडेल का?

विजय चोरमारे म्हणतात, "आतापर्यंत नैसर्गिकरित्या काँग्रेसचा अध्यक्ष हा UPA चा अध्यक्ष राहिला आहे. कारण काँग्रेस या आघाडीतील मोठा पक्ष आहे. मात्र, आता सोनिया गांधी या प्रकृतीमुळे काँग्रेसलाच पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. राहुल गांधी पुढे-मागे काँग्रेसचे अध्यक्ष होतील, मग त्यांना त्यांच्याच पक्षाला वेळ देणं आताची गरज आहे. त्यामुळे ते UPA ला वेळ दऊ शकत नाही. त्यामुळे UPA चं नेतृत्त्व दुसऱ्याकडे देणं ही गरज बनलीय."

तसंच, "शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे दोन्ही पक्ष पहिल्यापासून काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेत. त्यामुळे पवारांकडे UPA चं अध्यक्षपद गेल्यास काही अडचण असण्याचं कारण नाही," असंही चोरमारे म्हणतात.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

इथं अभय देशपांडे महत्त्वाचा मुद्दा मांडतात. देशपांडे म्हणतात, "UPA अध्यक्षपद देण्याऐवजी 'निमंत्रक' म्हणूनही पवारांकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते आणि अशावेळी काँग्रेसलाही अडचण असण्याचं कारण राहणार नाही."

यासाठी अभय देशपांडे भाजपप्रणित NDA चं उदाहरण देतात. ते सांगतात, "अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडे NDA चं निमंत्रकपद देण्यात आलं होतं. कारण फर्नांडीस यांचं सर्व पक्षांशी संबंध चांगले होते. ते NDA ला फायद्याचं ठरलं. आता पवारांचं UPA बाबत तसंच आहे."

मात्र, अभय देशपांडे पुढे म्हणतात, शरद पवार हे आपले मित्र आहेत की शत्रू आहेत, हे काँग्रेसला अजूनही कळलं नाहीय. पवारांचे भाजपसोबतचे संबंध कायमच काँग्रेसला संभ्रमात टाकतात. अशावेळी काँग्रेस UPA अध्यक्षपदाबाबत विचार करण्याची शक्यता आहे. मात्र, पवारांना निमंत्रकपद देण्याबाबत आक्षेप नसेल."

आता सर्वांत महत्त्वाच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर यदाकदाचित शरद पवार UPA चे अध्यक्ष झाले, तर राहुल गांधी त्यांच्या नेतृत्त्वात काम करतील का?

राहुल गांधी हे पवारांच्या नेतृत्त्वात काम करू शकतील का?

राहुल गांधी आणि शरद पवार यांनी सोबत काम करण्यास काहीच अडचण येणार नसल्याचं विजय चोरमारे म्हणतात.

चोरमारे पुढे सांगतात, "UPA म्हणजे केवळ केंद्रातील सत्तेतील पक्षाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचं काम आहे. केवळ धोरणात्मक पातळीवर एक व्हायचं आहे. इतरवेळी ज्याने-त्याने आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र येण्यात काहीच अडचण दिसत नाही."

भाजपविरोधात किंवा केंद्र सरकारविरोधात व्यापक जनभावना निर्माण करण्यासाठी आणि एकत्र राहण्यासाठी UPA असल्यानं कुणाच्या नेतृत्त्वाची अडचण होण्याची शक्यता दिसत नसल्याचंही विजय चोरमारे सांगतात.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

अभय देशपांडे म्हणतात, "प्रदेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी UPA ला शरद पवार यांसारखाच नेता लागणार आहे. प्रादेशिक पक्षांना काँग्रेस तितका प्रभावी वाटत नाहीय. UPA मध्ये पक्ष एकत्रित करणं हा उद्देश गृहित धरल्यास कुणाच्या नेतृत्त्वात काम करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही."

मात्र, शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील नेते असले, तरी आजच्या घडीला त्यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे केवळ 5 खासदार आहेत. मग या 5 खासदारांच्या बळावर ते UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का आणि हे इतर प्रादेशिक पक्षांना मान्य होऊ शकेल का?

5 खासदारांच्या नेत्याचं नेतृत्व इतर पक्षांना मान्य होईल का?

सध्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे 52 तर तामीळनाडूतील प्रादेशिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघमचे 24 खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे फक्त 5 खासदारांचा पक्ष UPA चं नेतृत्व करू शकेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो.

पण, काँग्रेसची असं करण्याची खरंच तयारी आहे का, अध्यक्षपद इतर पक्षांच्या नेत्याकडे जाणं काँग्रेसला मान्य आहे का, यावर सगळं अवलंबून आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

शरद पवार, सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

याचं उत्तर देताना सुनील चावके यांनी 1996 च्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण दिलं.

ते सांगतात, "त्यावेळी 46 खासदारांच्या बळावर जनता दलाच्या एच. डी. दैवीगौडा यांनी पंतप्रधानपद भूषवलं होतं. ही तर फक्त एक राजकीय पक्षांची आघाडी आहे, तीही विरोधातील. नेतृत्व ठरवताना त्याच्याकडे किती खासदार आहेत, हे पाहिलं जात नाही. तर नेत्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे किंवा नाही. तो पक्षाला उभारी देऊ शकतो का, या गोष्टी विचारात घेतल्या जातात."

ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे यांचं मतही वरीलप्रमाणेच आहे.

"सध्या काँग्रेसकडे मोठे चेहरे नाहीत, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील संबंधही चांगले आहेत. त्यामुळे UPAच्या अध्यक्षपदी पवार यांची निवड होणार असेल तर इतर नेते ते मान्य करू शकतात," असं गाताडे यांना वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)