शरद पवार नेहरू सेंटरमधल्या 'त्या' बैठकीत इतके का संतापले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून वर्षभरापूर्वी सत्ता स्थापनेवेळी घडलेल्या, मात्र समोर न आलेल्या काही मोठ्या घडामोडी सर्वांसमोर आणल्या आहेत.
'रोखठोक' या सदरात त्यांनी 'तोकड्या तलवारीची लढाई!' हा लेख लिहिला आहे. यात त्यांनी 22 नोव्हेंबर 2019 ला नेहरू सेंटर येथे पार पडलेल्या तीन पक्षांच्या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापून निघून गेले होते असा खुलासा केला आहे.
सरकार तीन पक्षांचे आहे त्यात नाराजी आहे, असंही संजय राऊत यांनी कबूल केले आहे. तरीही सरकार टिकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अटल बिहारी वायपेयी यांनी 33 भिन्न विचारांच्या पक्षांचे एनडीए सरकार चालवले. यात ममता बॅनर्जी आणि जयललितांचाही समावेश होता. ते सरकार कुणालाही अनैसर्गिक वाटले नाही असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

फोटो स्रोत, SCREEN GRAB
संजय राऊत यांनी नेमका काय गौप्यस्फोट केला आहे? नेहरू सेंटरच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार का संतापले? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वर्षभरापूर्वीचा वाद संजय राऊत यांनी आता का उकरून काढत आहेत? अशा अनेक प्रश्नांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
'तोकड्या तलवारीची लढाई!' या लेखात 'नेहरू सेंटरमधील ठिणगी' या मथळ्याखाली संजय राऊत म्हणाले, "सरकार स्थापन होईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसेच शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. 17 नोव्हेंबरपर्यंत काँग्रेसचा स्पष्ट होकार आला नव्हता. मला जेव्हा पत्रकारांनी विचारले, 'तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?' तेव्हा आमचा आकडा 170 आहे असे मी सांगितले. त्या 170 आकड्याची खिल्ली उडवण्यात आली."
22 नोव्हेंबर 2019 रोजी वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार असे काही नेते त्याठिकाणी उपस्थिती होते.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "आघाडीसाठी काँग्रेसकडून अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक होते. पण मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधील 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली."
"विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे?
विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. शरद पवार आणि खरगे यांच्या तिथे शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागदं गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो,"
"त्याच बैठकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील असे शरद पवार यांनी सुरुवातीला सुचवले,"

फोटो स्रोत, Getty Images
या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरून मतभेद झाले ही बाब यापूर्वी काही अंशी समोर आली होती. पण शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात गंभीर वाद झाला आणि शरद पवार संतापून निघून गेले हा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
शरद पवार का संतापले?
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपूर्वी तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत जागावाटपांसंदर्भात चर्चा सुरू होती. विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना शरद पवार संतापले.
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचंड विरोध होता."
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार हे सुरुवातीपासून स्पष्ट होते. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असेल तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार हे सुद्धा स्पष्ट होते. तेव्हा वाद पदावरून नव्हे तर त्या पदावर काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार यावरून मतभेद होते असे दिसून येते.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "हे सरकार बनत असताना अपरिहार्येतून काँग्रेस त्यामागे फरफटत गेली. मंत्रिपदाचे वाटप सुरू असताना काँग्रेसच्या आमदारांच्या मनात हे येत होते की मातब्बर मोजक्या नेत्यांनाच संधी मिळणार आणि आपल्या हातात काहीही येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभा अध्यक्षपद हे एक निर्णायक पद आहे. सभागृह सुरू असताना अध्यक्षाकडे महत्त्वाचे अधिकार असतात.
"काँग्रेसलाही आपले महत्त्व आहे हे दाखवायचे होते किंवा मोहर उमटवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाची मागणी काँग्रेसने केली असावी. सरकारसमोर मोठं संकट उभं राहतं तेव्हा विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असते. आणि म्हणूनच त्या पदावर कोणता नेता येणार हेसुद्धा सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो." असंही संदीप प्रधान सांगतात.
चर्चा करताना थोडंफार ते होत असतं - पृथ्वीराज चव्हाण
काही दिवसांपूर्वी या बैठकीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, "नेहरू सेंटरच्या त्या बैठकीत मी होतो. त्या बैठकीत नेमकं काय घडलं हे सांगणं मला शक्य नाही. ते सांगणं उचितही होणार नाही. पवारसाहेबांनी खुल्या मुलाखतीत बरंच काही सांगितलेलं आहे. मला वाटतं तिथवरच आपण समाधान मानावं. त्यांनी आणखी काही सांगितलं तर त्यांना अवश्य विचारा, पण मी काही सांगणार नाही."

"चर्चा करताना थोडंफार ते होत असतं. सोपं असेल तर चर्चाच का करायची, आपण घासाघीस करतो, वाटाघाटी करतो, आपल्या पक्षाला जास्त फायदा कुठे होईल ते पाहतो. हे आज होतंय असं नाही. प्रत्येक आघाडीत हे होत असतं. विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी झाली होती. 1999 साली. त्यावेळी सुद्धा असं झालं होतं. 2004 लाही झालं होतं. अशा चर्चा होतात. यावेळी कुणी वेगळ्या पद्धतीने काही बोललं असेल. पण मला वाटतं हे थोडं गैरसमजातून झालं असेल, त्याविषयी जास्त बोलायचं नाही," असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.
गौप्यस्फोट करण्यामागे संजय राऊत यांचा हेतू काय?
संजय राऊत हा गौप्यस्फोट आता का करत आहेत? हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेपासून तिन्ही पक्षांत समन्वय नाही अशी टीका केली जाते. प्रत्यक्षात अशी काही उदाहरणंही समोर आली. अशा परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन होत असताना दोन पक्षात टोकाचे वाद होते ही पार्श्वभूमी सांगून संजय राऊत यांना काय साध्य करायचे आहे? अशी शंका उपस्थित होण्यास वाव आहे.

फोटो स्रोत, Twitter
"संजय राऊत यांनी हे आता सांगण्याचे कारण नव्हते. सरकार स्थापन होत असताना अशा अनेक गुप्त बाबी असतात, ठराव आणि तडजोडी असतात. त्यासंदर्भात गुप्तता पाळण्याचा एक संकेत असतो. पण या ठिकाणी संजय राऊत यांनी या घटनेचा खुलासा केल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका उत्पन्न होऊ शकते."
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न विजय चोरमारे यांनी उपस्थित केला.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "सत्तास्थापनेच्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणारी अनेक पुस्तकं लिहिली गेली. अनेक लेख समोर आले. यामधून विविध बाजू मांडल्या गेल्या. तेव्हा शिवसेनाही बरंच काही सांगू शकते. शिवसेनेची एक वेगळी बाजू आहे हा संकेत संजय राऊत यांना त्यांच्या लेखाच्या माध्यमातून द्यायचा असावा."
एका बाजूला भाजपकडून दोन ते तीन महिन्यात सरकार कोसळेल अशी भाकितं वर्तवण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला तीन पक्षांच्या या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही असे चित्र वर्षभरात निर्माण झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी खुलासा केलेल्या या घटनेमागचा नेमका हेतू काय? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.
'आताच्या घडीला अजित पवार सर्वात भरवशाचे'
23 नोव्हेंबर 2019 रोजी म्हणजेच नेहरू सेंटर येथे झालेल्या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे राजभवन येथे शपथविधी केला.
नेहरू सेंटर येथील बैठकीत अजित पवार सुद्धा उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसचा अद्याप स्पष्ट होकार नाही याची कल्पना अजित पवार यांना होती. शिवाय, बैठकीत खरगे आणि शरद पवार यांच्या मोठा वाद झाल्याने अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, ANI
संजय राऊत यांनी आपल्या लेखात लिहिल्याप्रमाणे, "बैठकीत अजित पवार बराच काळ मोबाईल फोनवर खाली मान घालून 'चॅटिंग' करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. यानंतर अजित पवार यांचा फोन स्वीच ऑफ झाला. त्यांचे दर्शन थेट दुसऱ्या दिवशी राजभवन येथील शपथविधी सोहळ्यात झाले."
पहाटेच्या शपथविधीपूर्वी अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली ही बाब सर्वस्वी चुकीची असल्याचाही दावा संजय राऊत यांनी केलाय.
ते पुढे सांगतात, "यावेळी शरद पवार यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मी भाजपसोबत सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार असल्याचे नमूद केले. यानुसार शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदी यांना भेटले आणि सत्तास्थापनेबाबत जे सांगायचे ते सांगून आले."
एवढेच नव्हे तर सध्याच्या घडीला अजित पवार हे सर्वाधिक भरवशाचे आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
"अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे हल्ली सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहे," असं राऊतांनी अजित पवार यांच्याबाबत लेखात म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








