रोहित पवार म्हणतात, 'शरद पवार यांचा वारसदार कोणी व्यक्ती नाही, लोकच ठरवतील'

फोटो स्रोत, ROHIT RAJENDRA PAWAR/FACEBOOK
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचं हे सरकार कोसळेल अशी अनेक भाकितं आजही वर्तवण्यात येतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पवार कुटुंबही सतत चर्चेत राहिले.
शरद पवार यांचा वारसदार कोण? पवार कुटुंब दुभंगले आहे का? पार्थ पवार नाराज आहेत का? असे अनेक प्रश्न आजही उपस्थित करण्यात येतात.
या आणि महाविकास आघाडी सरकारसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न: भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकार दोन महिन्यात कोसळेल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते अशी वक्तव्य कशाच्या आधारावर करत आहेत? काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत का? नेमकं काय सुरू आहे?
रोहित पवार - स्वत:चे आमदार स्वत: कडे ठेवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. आपल्या पक्षातील आमदारांना 'अरे बाबांनो, ह्यांचे सरकार तीन महिन्यात पडणार आहे,' आश्वासन देत असतात.
दानवे साहेबांची शेतकऱ्यांच्या बाबतीतली किंवा सर्वसामान्यांबद्दलची वक्तव्यं पाहिली तर त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी असे वाटत नाही.
प्रश्न: देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा योग्य वेळी शपथविधी करू असं म्हटलं आहे.
रोहित पवार - ते वाट पाहत राहतील सरकार कोसळेल याची आणि पाच वर्ष कशी गेली त्यांना कळणारही नाही. देवेंद्र फडणवीस स्वत: विरोधी पक्षनेते आहेत. भाजपचे मोठे नेते आहे. पक्षाला एकत्रित ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. एकनाथ खडसे यांनीही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत.
रोहित पवारांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या पार्श्वभूमीवर ते पक्षातील लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत असतील. पण मला वाटत नाही सरकार कोसळेल. उलट जेवढी टीका सरकारवर होईल तेवढे सरकार मजबूत होईल.
प्रश्न: तुम्ही म्हटलं की, भाजपच्या आमदारांशी चर्चा सुरू आहे. याचा अर्थ भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत का?
रोहित पवार - मी केवळ आमदार आहे. माझ्यासारखेच आमदार आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. केवळ आमदार नाही तर मोठ्या पार्श्वभूमीचे नेतेसुद्धा आहेत.
आमचे नेते जेव्हा घोषणा करतील तेव्हा कळू शकेल. हे आमदार सत्ताधारी पक्षात येण्यासाठी म्हणून नव्हे तर त्यांच्या पक्षात त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटत असल्यामुळे येत आहेत.
प्रश्न: तुम्ही पवार कुटुंबाचे सदस्य आहात. शरद पवार तुमचे आजोबा आहेत. यामुळे तुमचे प्रश्न लवकर मार्गी लागतात किंवा तुम्ही मांडलेले प्रश्न तात्काळ सुटतात असं आहे का?
उत्तर : एखादा मुद्दा महत्त्वाचा असेल तर रोहित पवार काय किंवा कोणताही आमदार असो किंवा भाजपचाही एखादा आमदार असो प्रश्न गांभीर्याने घेतले जातात. एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबातील आहे म्हणून जास्त महत्त्व दिले जाते असे नाही.

फोटो स्रोत, facebook
पण कुटुंबातील व्यक्ती म्हणून अनेक लोक भेटण्यासाठी येत असतात. त्यांचे निवेदन मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच साहेबांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रश्न : पार्थ पवार हे तुमचे चुलत बंधू आहेत. पण गेल्या काही काळापासून पार्थ पवार हे पक्षाच्या विपरीत भूमिका घेताना दिसले. मराठा आरक्षणप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही भाषा केली. तुमची त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा होते का?
रोहित पवार - ते भूमिका घेतात ती महत्त्वाची आहे का? तर ती महत्त्वाची आहे. सुशांत सिंह प्रकरणी त्यांची भूमिका होती त्यांना न्याय मिळावा. आत्महत्या होती की हत्या याचा तपास व्हावा, असं त्यांना वाटत होतं. मराठा आरक्षणा प्रकरणीही हाच हेतू होता. हा प्रश्न वेळोवेळी मार्गी लागावा हीच त्यांचीही भावना होती.

फोटो स्रोत, @parthajitpawar
तो माझा चुलत भाऊ असला तरी मी त्याला सख्ख्या भावासारखाच मानतो. तो ही माझ्याबाबतीच तसाच आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या भूमिकेमागचा उद्देश पाहत असतो.
त्याची पद्धत काय होती? असेच ट्वीट का केले, तसेच का केले हे यापेक्षा आम्ही आमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची असते. त्याच्या भूमिकेमागे न्याय मिळावा असा विचार होता आणि तो महत्त्वाचा आहे असे आम्हाला आहे.
प्रश्न : चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं, की अजित पवार शरद पवार यांचे वारसदार नाहीत. उद्या मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर ते सुप्रिया सुळे यांना करतील. यावर तुमची प्रतिक्रिया काय?
रोहित पवार : चंद्रकांतदादा यांची वक्तव्य अशीच असतात. राजकीय दृष्टीकोनातून बातम्या व्हाव्यात यासाठी अशी वक्तव्य ते करतात. अशा वक्तव्यांवर आम्ही काय बोलणार? अशा गोष्टी ज्यांचा सर्वसामान्यांशी थेट संबंध येत नाही यावर खरं तर आम्ही विचार करत नाही आणि तसा विचारही आम्ही मनात आणत नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK
पवार कुटुंब चर्चेत असतं कारण शरद पवार आणि त्यांचे वलय. विरोधकांनाही पवारांवर बोलल्याशिवाय महत्त्व मिळत नाही असं अनेक तज्ज्ञही सांगतात.
प्रश्न : यानिमित्त एका प्रश्नाची सर्वाधिक चर्चा होते ते म्हणजे शरद पवार यांचे वारसदार कोण ? तुम्ही याचे उत्तर काय द्याल?
रोहित पवार - मी एवढंच सांगेन, की वारसदार कुणी व्यक्ती ठरवत नसतं लोक ठरवत असतात. एखाद्या पदासाठी किंवा गोष्टीसाठी आमच्या कुटुंबात कुणीही प्रयत्न करत नसतं. सर्वांचे एकच प्रयत्न असतात, जे संस्कार आम्हाला दिले गेले त्यानुसार लोकहिताचे काम करत रहायचे.
प्रश्न : नुकतीच पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबादारी तुमच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार आहे का?
रोहित पवार - जबाबदारी फक्त माझ्यावर सोपवली असे नाही. मी पक्षाचा घटक असल्याने राज्यात कुठेही निवडणूक असेल आणि उमेदवारांना आमचा फायदा होणार असेल तर आम्ही सहभागी होतो.

फोटो स्रोत, Twitter/Supriya Sule
गरज भासल्यास महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल. हे नेते ठरवतील.
प्रश्न: तुम्ही अनेकदा आदित्य ठाकरे यांच्यासोबतही अनेकदा सार्वजनिकरित्या दिसला. त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? गेल्या काही काळात त्यांच्यावरही अनेक आरोप केले गेले. त्याविषयी काय सांगाल?
रोहित पवार - आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या अडचणीत आम्ही मदत करत असतो. आदित्य ठाकरेंवर फेक अकाऊंटच्या माध्यमातून टीका झाली.
एवढी मोठी ताकद कोणत्या संघटनेकडे असेल याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले जात होते. अजेंडा होता. बिहारचे निवडणूक हा एकच हेतू होता. याचा आम्ही निषेध करतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








