रोहित पवार: निलेश राणे यांच्या धमकीला मी घाबरत नाही

निलेश राणे आणि रोहित पवार

फोटो स्रोत, Facebook / BBC

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात ट्विटरवरून वाकयुद्ध रंगलं आहे.

त्याबद्दल, तसंच महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी घडलेल्या राजकीय नाट्याबद्दल रोहित पवार यांनी बीबीसी मराठीच्या नीलेश धोत्रे यांना दिलेल्या सविस्तर मुलाखतीत चर्चा केली.

पाहा संपूर्ण मुलाखत -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

हा त्या मुलाखतीचा संपादित अंश -

निलेश राणे आमदार नाहीत किंवा खासदारही नाहीत. ते राजकारणात फारसे सक्रीयही नाहीत. मग तुम्ही त्यांच्या टीकेला उत्तर का देत आहात?

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी साखरेसंदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. त्याविषयी निलेश राणे यांनी ट्वीट केलं होतं. ती कमेंट मला काही योग्य वाटली नाही. त्यामुळे मी त्यावर रिप्लाय दिला. यानिमित्ताने पहिल्यांदाच त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला.

मात्र रिप्लाय केल्यानंतर त्यांचे विचार, त्यांची भाषा जवळून बघायला मिळाली. त्यानंतर मी काही जास्त प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडलो नाही. मात्र, नंतर तुपकरे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं. त्यावर निलेश राणे यांनी जे प्रत्युत्तर दिलं, त्याची भाषा योग्य नव्हती.

म्हणून मी भाषा या विषयावर त्यांना बोललो. त्यानंतर पुन्हा निलेश राणे सुरू झाले. आता मी त्याकडे दुर्लक्ष करतोय.

चर्चा करण्यासाठीसुद्धा विचारांची एक पातळी असावी लागते. तशी त्यांची पातळी आहे, असं मला जाणवलं नाही. अनेक मोठ्या लोकांनीही मला सांगितलं की दुर्लक्ष करणंच अधिक योग्य आहे. त्यामुळे यापुढे मी दुर्लक्षच करणार आहे.

सुरुवातीच्या काळात प्रत्युत्तर देऊन तुम्ही त्यांचं महत्त्व वाढवलं, असं नाही का तुम्हाला वाटतं?

एखाद्याचं महत्त्व वाढवायचं की कमी करायचं हा हेतू माझ्या मनात कधीच नसतो. ते शरद पवारांबद्दल बोलले. ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, एक अनुभवी नेते आहेत. म्हणून मी उत्तर दिलं होतं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ती भाषा वाचण्यासारखीही नाही आणि सांगण्यासारखीही नाही, हे नंतर जाणवलं.

पण ते सतत तुमच्याबद्दल बोलत आहेत. धमकीची भाषा वापरली. असंसदीय शब्द वापरले. त्यानंतर तुम्ही काहीच बोललेला नाहीत.

रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त येत असतो. त्यामुळे पोकळ धमकीला मी काही घाबरत नाही. ते सतत माझ्याविषयी बोलत आहेत. डॉ. प्रकाश आंबेडकर यासारख्या इतर नेत्यांवरही बोलत आहेत. पण त्यांच्यासारख्या लोकांना उत्तर देऊन माझा आणि माझ्या लोकांचा वेळ घालवू नये, असं मला वाटतं.

रोहित पवार शरद पवार

फोटो स्रोत, Rohit Pawar / twitter

तुम्ही निलेश राणेंना पर्सनली ओळखता का? तुमची आणि त्यांची भेट झाली आहे का कधी?

मी आमदार नितेश भाऊंना भेटलो आहे. ते अशाप्रकारे वक्तव्यं करत नाहीत. निलेश राणे त्यांचे भाऊ आहेत. दोघांमध्ये समानता असेल, असं वाटलं होतं. पण दोघं खूप सारखे आहेत, असं काही आता वाटत नाही.

तुमचे आणि नितेश राणे यांचे संबंध चांगले आहेत का?

आम्ही बोलतो, चर्चा करतो. एखादा मुद्दा मांडताना ते त्यांचं मत मांडतात. खूप चांगली ओळख आहे, असं नाही. पण किमान आम्ही चर्चा करू शकतो. त्यामुळेच कदाचित नितेश राणे लोकप्रतिनिधी आहेत आणि निलेश राणे नाही.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी केंद्राऐवजी राज्य सरकारला पत्र लिहियला हवं होतं. त्यांना कुणीच उत्तर दिलं नाही, तुम्ही दिलं. राष्ट्रीवादीतल्या इतर बड्या नेत्यांना त्यांना उत्तर का दिलं नाही?

आमच्या पक्षातले मोठे नेते सध्या लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत. त्यांचं लक्ष त्यावरच आहे, म्हणून कदाचित ते बोलले नसतील. माझ्याबाबतीत सांगायचं तर एखादी गोष्ट मला चुकीची वाटली तर मी लगेच व्यक्त होतो. हे चांगलं आहे की वाईट, मला माहिती नाही. पण फडणवीस साहेब जे बोलत होते ते मला योग्य वाटलं नाही.

शरद पवार साहेब केंद्र सरकारशी सातत्याने संवाद साधत असतात. पत्राच्या माध्यमातून किंवा फोनवरून ते बोलतात. चर्चा होत असते. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी काय करावं, काय करू नये, हे सांगण्यापेक्षा आणि सारखं राज्यपालांकडे जाण्यापेक्षा विरोधी पक्षनेते म्हणून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली तर ते जास्त योग्य ठरेल. जनतेच्या हिताचं असू शकेल.

रोहित पवार

फोटो स्रोत, Facebook

राज्यात भाजपने सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काही उत्तर देणार आहे का?

एखाद्या राजकीय स्ट्रॅटेजीला उत्तर म्हणून आपण एखादी स्ट्रॅटेजी आखू शकतो. पण भाजपने जी काही स्ट्रॅटेजी आखल्याचं दिसलं त्यात त्यांनी कुठले कपडे घालायचे, कसं उभं रहायचं, कोणत्या रंगाचे मास्क घालायचे, फलकांवर काय लिहायचं, कोणत्या घोषणा द्यायच्या, हे सगळं सांगितलं होतं.

महाराष्ट्रातल्या जनतेने यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. पण भाजपचे नेते सोडले तर सामान्य कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले नाही, असं चित्र दिसलं. हे कार्यकर्ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांनाही आज राज्यातली परिस्थिती माहिती आहे आणि यात त्यांचाच पक्ष जे राजकारण करत आहे, हे त्यांनासुद्धा पटलं नाही आणि म्हणूनच आंदोलनाच्या आवाहनला प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही.

निलेश आणि नितेश राणे भाजपच्या आंदोलनादरम्यान

फोटो स्रोत, Twitter / meNeeleshNRane

फोटो कॅप्शन, निलेश आणि नितेश राणे भाजपच्या आंदोलनादरम्यान

विरोधी पक्षाने हे समजून घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्राला राजकारणाची नाही तर सहकार्याची गरज आहे. सारखं महाराष्ट्राला कमी लेखून यांना काय मिळतं? आज महाराष्ट्र बांधण्याची गरज आहे. आज सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या आरोग्य संकटातून बाहेर पडत असताना पुढे जी आर्थिक अडचण दिसतेय, त्यातही सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवणं तितकंच गरजेचं आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणावर तीन पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन करतेवेळी जे काही राजकीय नाट्य रंगलं होतं, त्यावर ती पुस्तकं आहेत. ही पुस्तकं लिहिणाऱ्या तिन्ही पत्रकारांचा दावा आहे की या सर्व प्रक्रियेदरम्यान अजित पवार नाराज होते. अजित पवार खरंच नाराज होते का?

या तिन्ही पत्रकारांनी वेगवेगळ्या लोकांशी बोलून आपला दृष्टिकोन मांडला. पण काय झालं, कसं झालं, खरं काय झालं, हे खरंच कुणाला सांगता येणार नाही.

नाराज होते, नव्हते, त्यापेक्षा आज या सरकारमध्ये आदरणीय दादा आहेत, ते आमचे नेते आहेत आणि ज्या प्रकारे काम करत आहेत, पैसे नसतानासुद्धा रिसोर्सेसचं योग्य नियोजन करून लोकांना अडचणी येऊ नये, यासाठी ते प्रयत्न करत आहेत ना. काय झालं, यापेक्षा आज दादा कसं काम करत आहेत, याकडे जास्त लक्ष देऊया.

पुस्तकं लिहिणारे लेखक ज्येष्ठ आहेत. त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी बोलून लेखकांनी आपला दृष्टिकोन मांडला आहे. पण खरं काय झालं ते कुणाला सांगता येणार नाही. पण जे काही झालं, त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघूया.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती तो क्षण

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती तो क्षण

जे काही झालं त्यावर कुटुंबातले सदस्यच सांगू शकतील, कारण जे काही नाट्य झालं त्यानंतर कुटुंबातल्या सदस्यांकडूनच त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांनी सांगायला हवं की नेमकं काय झालं होतं?

कुटुंबतला वरिष्ठ क्रम बघितला तर साहेब, दादा, ताई आणि त्यानंतर माझा नंबर येतो. त्यामुळे ते उत्तर देतील. मी माझ्याबाजूने बघताना फार बॅलन्स्ड आणि प्रॅक्टिकल दृष्टीने बघतोय. माझ्यासाठी 'आज' महत्त्वाचा आहे. जनतेसाठी आणि तरुणांसाठी आज काय करताय, आणि यांच्या भविष्यासाठी काय करणार, हे जास्त महत्त्वाचं आहे.

ज्यावेळी अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत गेले, तेव्हा अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांची जुळवाजुळव करायची होती, त्याची जबाबदारी म्हणजे त्यांना दिल्ली, हरियाणाला हलवण्याची जबाबदारी पार्थ पवार यांना देण्यात आली होती, असा दावा सुनिल सूर्यवंशी यांनी आपल्या पुस्तकात केला. यासंदर्भात तुमची पार्थ पवारांशी काही चर्चा झाली का? आणि पार्थ पवारांवर आमदारांना दिल्ली, हरियाणात नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, यात काही तथ्य आहे का?

अशी काही चर्चा करण्याची वेळ त्यावेळी नव्हती... त्याच्या बाजूनेही आणि माझ्या बाजूनेही. त्यावेळी वरिष्ठ लोक चर्चा करत होते, रणनीती आखत होते. तिथेही आम्ही काही मोठी भूमिका बजावली, असं मला वाटत नाही.

मी वैयक्तिकरीत्या तर काही भूमिका पार पाडली नाही. पार्थने पार पाडली असावी. ती परिस्थितीच इतकी मोठी होती की माझ्याकडे अनुभव असतानासुद्धा मी फक्त आमदारांशी बोलणं, चर्चा करणंस यापलीकडे काही केलं नाही.

त्यावेळी तुमच्या मनात काय सुरू होतं?

दादांकडे बघताना मी सांगू शकतो की त्यांच्या कामाची पद्धत मला फार आवडते. कामाचा ताण असला की कधीकधी ते चिडतात, असं लोक बोलतात. पण, त्यांच्या मनात काही नसतं. ते मनमोकळे असतात. कुणी एखादं काम सांगितलं की सुरुवातीला ते कदाचित म्हणतील की हे काय घेऊन आला आहे. पण ते समजून घेतील आणि लेगच काम करतील, अशी काकांची पद्धत आहे. काका भावनिक आहेत. पण ते दाखवत नाहीत. त्या परिस्थितीत आमदार म्हणून नाही तर पुतण्या म्हणून मला विश्वास होता की कुटुंब खंबीर आहे. त्यामुळे त्याबाबतीत काही अडचण होईल, असं मला वाटत नव्हतं. पण, कुटुंबाचा एक भाग म्हणून टेंशन येतंच. पण मन सांगत असतं की घाबरू नको, सगळं चांगलं होईल आणि तसंच झालं आणि आज मी खूश आहे.

तुमच्या आमदारकीची सुरुवातच अशा कुठल्यातरी मोठ्या राजकीय नाट्याने होईल, असं तुम्हाला वाटलं होतं का?

अनेकांना असं सगळं बघण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव घ्यावा लागतो. आम्ही पहिल्यांदाच आमदार झालो आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यामुळे हा अनुभव कमी वेळत आम्हाला मिळाला. या अनुभवाचा येणाऱ्या काळात लोकांच्या हितासाठी आणि राजकारणात टिकण्यासाठी वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)