'शरद पवार हे अजित पवार यांना वारसदार करणार नाहीत,' असं चंद्रकांत पाटील का म्हणाले?

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत का?

"जर शरद पवारांचे वारसदार अजित पवार असते आणि हे घरात राहिल्यामुळे त्यांना जाणवलं असतं, तर त्यांनी काकांशी वाद केला असता का? इतकी स्तुती करण्यासारखे शरद पवार आहेत, तर तुम्ही त्यांना का सोडलं होतं," असा प्रश्न विचारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार, शरद पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी इस्लामपूरच्या प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

एका भर बैठकीत काय झालं, हे मला जाहीररित्या सांगायला लावू नका, पक्ष कुणाचा आहे, याबाबत काय सांगितलं गेलं, हे मला इथं बोलायला लावू नका, असंही पाटील म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या रंगात आली आहे. त्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

पदवीधर मतदारसंघातील एका प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंद्रकांतदादा पाटील

'राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजलं की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो', असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

"मी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे संक्षिप्त रूप 'चंपा' असे केले. ते आता राज्यभर झाले आहे, पाटील यांची शरद पवारांवरील टीका ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आहे. पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे आणि देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जात असते. पवार यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

यावर चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

तसंच पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडलं होतं. हा इतिहास नाही का? आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल, तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असंही पाटील यांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांनी ही टीका करताना अजित पवार यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, The India Today Group

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि सुप्रिया सुळे

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री आणि पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.

विनाकारण कोणतेही मुद्दे काढून पक्षात भांडणं लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, पण त्यात त्यांना यश येणार नाही, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली.

"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण होईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी पक्षात काहीही वाद नाही. शरद पवार यांचं नेतृत्व सर्वांनाच मान्य आहे. सध्याच्या घडीला वारसदार वगैरे विषयच नाही," असं मलिक म्हणाले.

मुद्दामहून पवार कुटुंबीयात भांडण लागतील, त्याचा आपल्याला राजकीय फायदा घेता येईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यांच्या बोलण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही बिघडणार नाही, असंही मलिक यांनी म्हटलं.

पण गेल्या काही वर्षांतील प्रत्येक निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारसदाराबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. यंदाही हेच चित्र पुन्हा एकदा दिसून आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रं सध्या शरद पवार यांच्या हातात असली तरी भविष्यात पक्षाची वाटचाल कशी राहील, याची उत्सुकता सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य कशामुळे केलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला उचकवण्याचा प्रयत्न

अजित पवारांचं राजकारण जवळून पाहणारे 'न्यूज 18 लोकमत'चे पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते, "पवारांचा राजकीय वारसदार कोण, हा प्रश्न उपस्थित करून भाजप सातत्याने शह-काटशह आणि कुरघोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे."

नुकतंच विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार हे एका व्यासपीठावर आले होते.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार

यावेळी कर्तृत्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी पवारांसमोर केलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी शेलार यांचाच मुद्दा पुढे ओढून नेल्याचं अद्वैत मेहता यांना वाटतं.

ते सांगतात, "महाविकास आघाडी सरकार पुढच्या तीन महिन्यात पडेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे यांनी नुकतंच केलं होतं. सध्याचं सरकार अंतर्विरोधातून पडेल, एकमेकांत पाय अडकून पडेल अशा प्रकारची वक्तव्य भाजपचे नेते सातत्याने करत असतात. सर्वाधिक आमदार निवडून येऊनही आपलं सरकार न बनवता आल्यामुळे अस्वस्थतेतून त्यांची ही प्रतिक्रिया येत आहे.

त्यामुळे सध्याचं सरकार पाडण्यासाठीचे डावपेच म्हणून त्यांची ही खेळी असू शकते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उचकवण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत."

वैयक्तिक पातळीवर टीका-टीप्पणी

ज्येष्ठ पत्रकार आणि 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचे लेखक विजय चोरमारे यांच्याशीही बीबीसीने संपर्क साधला.

शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भाषणांचे साक्षीदार असणाऱ्या चोरमारे यांचं मात्र या प्रकरणाबाबत वेगळं मत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामागे कोणतंही राजकीय कारण दडलेलं नसून प्रचार वैयक्तिक पातळीवर घसरल्यामुळे त्यांच्या तोंडून ही टीका आल्याचं चोरमारे यांना वाटतं.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

ते सांगतात, "हाता तोंडाशी आलेली सत्ता गमावल्यामुळे भाजप अस्वस्थ आहे हे नक्की. पण सोबतच त्यांच्यावर 'चंपा' म्हणून टीका केली जाते. ही वैयक्तिक पातळीची टीका आहे. अजित पवारांनीच सर्वप्रथम ही टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावरील पाटील यांची नाराजी बाहेर येत आहे."

याशिवाय, "भाजप नेते सातत्याने सरकार पडणार म्हणत दावे करतात, त्याला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर दिलं जातं. पण हे सगळं होत असताना दोन्ही पक्ष राजकीय मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जाते. राजकीय संस्कृती विसरल्यानेच राजकारणादरम्यान सार्वजनिक संकेतांचं पालन केलं जात नाही. वारसदाराचा मुद्दा मांडल्याने हे सरकार पडणारही नाही किंवा सध्याच्या परिस्थितीत त्याने काही फरकही पडणार नाही," असं चोरमारे यांना वाटतं.

सध्यातरी अजित पवार राज्यात सुप्रिया सुळे केंद्रात

पवारांचा राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना यापूर्वी असंख्य वेळा विचारला गेला आहे.

गेल्या वर्षी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हादेखील हा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एका व्यासपीठावर

त्यावेळीही, "सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे आणि राष्ट्रीय राजकारणातच त्यांना रस आहे," असंच पवार म्हणाले होते.

अजित पवार तर कायम मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतेच, पण महाराष्ट्रात सुप्रिया सुळे याही पर्याय म्हणून चर्चेत राहिल्यात.

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न फेब्रुवारी 2018 मध्ये 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "का आवडणार नाही? कोणत्या भावाला आपली बहीण मुख्यमंत्री झालेली आवडणार नाही?"

याच मुलाखतीत वारसा हक्कावरून इतर कुटुंबांमध्ये झालेल्या वादाच्या संदर्भानं त्यांनी असंही म्हटलं होतं, की "बाकीच्यांमध्ये जे झालं ते पवारांमध्ये होणार नाही, हा या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो."

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कायमच 'ताईंचा' गट आणि 'दादांचा' गट, अशी चर्चा होत राहिली आहे. अजित पवारांचं प्रस्थ जरी राज्याच्या राजकारणात मोठं असलं तरी राष्ट्रवादीचे राज्यातले काही आमदार, नगरसेवक हे 'ताईंच्या जवळचे' म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा नेहमी होत राहिली आहे.

वारसदार लोकांनी निवडावा

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर घडलेलं राजकीय नाट्य आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

तेव्हाही हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी शरद पवार यांचा राजकीय वारसदार आता कोण? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता.

या लेखात मयुरेश कोण्णूर यांना ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी दिलेली एक प्रतिक्रिया प्रतिक्रिया आजही लागू होण्यासारखी आहे. प्रताप आसबे अनेक वर्षं शरद पवारांचं राजकारण जवळून पाहत आहेत.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, शरद पवार

त्यांच्या मते, "वारसदार हा लोकांनीच ठरवायचा असतो. पवारांनीही आपलं हे मत बोलून दाखवलं आहे. कुणाचं नाव पुढे केलं तरी लोक त्यांना स्वीकारतील का, हाही एक प्रश्न असतोच. त्यामुळे लोकांना काय अपील होतं, हेही पहावं लागेल.

कुटुंब आणि पक्षासोबतच राजकीय वारसदारी, हा एक प्रश्न असतो. ती राजकीय कार्यानं मिळते. राहुल गांधींना सोनियांनी उत्तराधिकारी म्हणून निवडलं. काय झालं हे आपण पाहतो. राज हे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार आहेत, असं सगळ्यांना वाटायचं. पण उद्धव यांना जरी वारसाहक्कानं शिवसेना मिळाली तरीही त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करावं लागलं. त्यामुळं राजकीय वारशासाठी कुणालाही कर्तृत्व दाखवावं लागेल," प्रताप आसबे म्हणतात.

अद्वैत मेहता याबाबत सांगतात, "शरद पवारच एकदा म्हणाले होते, की राजकीय वारसदार हा घरातलाच असायला पाहिजे, असं नाही. याचाच अर्थ तो बाहेरचाही असू शकतो. पण आता त्यासाठी जी नावं दिसताहेत, त्यात घरातली नावं म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार. बाहेरचे म्हणजे जयंत पाटील, ज्यांच्यावर पवारांचा विश्वास आहे. पण राजकारण कोणत्या दिशेला जातं यावरच हा वारसाहक्क अवलंबून असेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)