जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा भाजपचा आरोप तृणमूलने फेटाळला

पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आला, हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. ममता बॅनर्जींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर ममता बॅनर्जी यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये येऊन नौटंकी करतात.

अमित शाह ट्वीट करून म्हणाले, "तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल अत्याचार, अराजकता आणि अंधःकाराच्या युगात गेला आहे.

"तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसा ही सरकारपुरस्कृत झाली आहे. या काळात ही हिंसा सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हे दुःखद आणि चिंताजनक आहे," असं अमित शाह म्हणाले.

मात्र ममता बॅनर्जी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला पश्चिम बंगालमध्ये बोलावतो, असं प्रत्युत्तर ममता बॅनर्जी यांनी दिलं.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "त्यांना काहीच काम नाही. ऐकणारं कुणीही नाही तरी कधी गृहमंत्री इथं येतात, कधी नड्डा येतात. ते फक्त आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करण्यास सांगतात."

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत राजकीय नेत्यांना निशाणा बनवणं चिंताजनक आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली.

नेमकं काय घडलं?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी दक्षिण 24 परगना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जे. पी. नड्डा यांनी केला आहे. या हल्ल्यात भाजप नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय हे जखमी झाल्याचंही नड्डा म्हणाले.

आपण केवळ बुलेटप्रूफ गाडीत असल्यामुळे वाचलो, असंही नड्डा यांनी म्हटलं आहे.

हा हल्ला पूर्वनियोजित होता. पोलिसांनी हल्लेखोरांना मदत केली, असा आरोपही भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)