You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंध्र प्रदेशात रहस्यमय आजाराची साथ; रक्तात आढळले 'हे' विषारी धातू
भारतात एकीकडे कोव्हिड-19 आजाराचं मोठं संकट असतानाच आता आंध्र प्रदेशात एका रहस्यमय आजाराची लाट आली आहे.
गेल्या शनिवारच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 500 जणांना या आजाराची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात शिसे आणि निकेल या विषारी धातूंचं प्रमाण आढळलं आहे.
लोक आकडी येऊन बेशुद्ध पडत असून लवकर बरेही होत आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांना हॉस्पिटमधून घरीही सोडलं जातंय. मुख्य म्हणजे आकडी येऊन बेशुद्ध होणं हेच लक्षण सगळ्या रुग्णांमध्ये आढळतंय.
रहस्यमय आजारामुळे एकाचा मृत्यू
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री ए. के. कृष्णा श्रीनिवास यांनी यावर अधिकृत माहिती दिली. श्रीनिवास यांच्यानुसार, आतापर्यंत 510 लोकांना याची लागण झाली असून त्यातल्या 430 जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलंय आणि एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे.
श्रीनिवास पुढे म्हणतात, "या आजारामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. आज तर 40 हून कमी रुग्ण दाखल झालेत. लोकांच्या भीतीचं कारण मी समजू शकतो. या आजारामागचं मूळ कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
दूषित पाणी किंवा अन्नाचं सेवन केल्यामुळे हा आजार झाला असल्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये. नवी दिल्लीतून आलेल्या टीमला रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यात शिसे (लेड) आणि निकेल आढळून आलं आहे.
एलुरू शहराच्या सरकारी हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. एवी मोहन म्हणतात, "आम्ही अजून काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यांच्या अहवालाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत."
हैदराबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमधले (एनआयएन) वैज्ञानिक याबद्दल म्हणतात, "एखाद्याला आकडी येणं यामागचं मुख्य कारण हे मेंदू किंवा मज्जासंस्थेशी निगडित असू शकतं. रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या धातूंचा अधिक अभ्यास करून ते रुग्णांच्या शरीरात कसे पोहचले याची तपासणी केली जाईल."
एनआयएनच्या टीमने एलुरू शहरातले पाणी, अन्न आणि तेलाचे नमुने घेतले आहेत. या टीममध्ये आरोग्य अधिकारी, साथीच्या रोगांचे तज्ज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि अन्नविषयक तज्ज्ञ सहभागी आहेत.हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)