हैदराबाद महानगरपालिका निवडणूक : भाजपला मिळालेल्या जागा हे भाजपचं यश म्हणायचं का?

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय जनता पार्टीने पुरेपूर जोर लावलेल्या आणि जोरदार शक्ति प्रदर्शन केलेल्या हैदराबाद मनपा निवडणुकीचा निकाल अखेर लागला आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा मिळवत मनपा राखली.

इथं मोठी ताकद असलेल्या एमआयएम पक्षानेही वर्चस्व कायम राखलंय. पण, भारतीय जनता पार्टीने लक्षवेधी कामगिरी करत 40 जागांचा आकडा ओलांडला आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या मतांना खिंडारही पाडलं.

या निवडणूक प्रचारात भाजपने अमित शाह, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उतरवलं होतं. पक्षाच्या बिग फोर म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांचा प्रचार आणि भाजपचा महापौर होणार ही अमित शाह यांची घोषणा. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचं या निवडणुकीतलं यश बघितलं गेलं पाहिजे. जोरदार शक्तिप्रदर्शन केलेल्या भाजपने हैदराबादमध्ये केलेली कामगिरी खरंच यशस्वी म्हणायची का?

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक आणि भाजपचं यश

हैदराबादमधल्या एका प्रचारसभेत एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी एकदा म्हणाले होते, भाजपने फक्त डोनाल्ड ट्रंपना प्रचारात उतरवायचं बाकी ठेवलंय.

भाजपने प्रचाराचा असा धुराळा उडवून दिला की ओवेसींचं म्हणणं फारसं चुकीचं नव्हतं. अमित शाह, योगी आदित्यनाथ, जे. पी. नड्डा आणि स्मृती इराणी हे बिग फोर भाजप नेते प्रचारसभांसाठी हैदराबादमध्ये ठाण मांडून बसले होते. भाजपसाठी हा प्रचार नाही तर शक्ती प्रदर्शन होतं. अमित शहांनी तर घोषणा केली महापौर भाजपचाच होईल.

भाजपने इतकं महत्त्व दिलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेर सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रीय समितीला 56, एमआयएमला 42 आणि भाजपला 46 जागा मिळाल्या. यात भाजपच्या जागा उठून दिसतात कारण, मागच्या निवडणुकीत 5 जागा मिळवलेल्या आणि राज्यात आतापर्यंत फारसा जनाधार नसलेल्या पक्षाने केलेली ही कामगिरी आहे. अशावेळी या निवडणुकीतली भाजपची कामगिरी समाधानकारक म्हणायची का?

भाजपने जी तयारी या निवडणुकीसाठी केली होती. त्या मानाने पक्षाला मिळालेलं यश कमी आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं आहे.

त्यांच्या मते, ''दुब्बाका विधानसभा मतदारसंघात झालेल्या फेरनिवडणुकीत अलीकडेच भाजपने विजय मिळवला. हा मतदारसंघ राष्ट्र समितीचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शेजारचा आहे. इथं मिळालेल्या विजयामुळे भाजपचा उत्साह दुणावला आणि त्यांनी हैदराबादमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली. इथं पूर्ण जोर लावला.''

हिंदू-मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण ही भाजपची रणनिती होती आणि त्यात ते 40% यशस्वी ठरले, असं वानखेडे यांना वाटतं.

''हैदराबादमध्ये 30 टक्के मुस्लीम जनता आहे. आणि 60 टक्के हिंदू. एमआयएम विरोधात टीकेची झोड उठवून मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण त्यांच्या बाजूने करायचं. आणि हिंदू मतं आपल्या बाजूने वळवायची ही भाजपची इथली चाल होती. निकालांमध्ये असं दिसतंय की, एमआयएमने आपली मतं राखली आणि भाजपला जी साठ टक्क्यांची मतं मिळवायची होती. त्यातली 40 टक्के त्यांनी मिळवली. पण, टीआरएसची मतं फोडण्यात भाजप यशस्वी झाले.''

भाजपने हैदराबादमध्ये इतका जोर का लावला?

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे 119 पैकी चार जागा होत्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 17 पैकी चार खासदार भाजपचे निवडून आले. पण, आताची महानगरपालिकेची निवडणूक मात्र भाजपने सर्व ताकदीनिशी लढली.

तीन कारणं :

  • एक राजकीय पक्ष म्हणून भाजपला पंचायत पासून पार्लमेंटपर्यंत सगळीकडे वर्चस्व मिळवायचं आहे. ती राजकीय महत्त्वाकांक्षा पक्षाच्या नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली आहे.
  • आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हैदराबाद महानगरपालिका क्षेत्रात तेलंगणा विधानसभेच्या 119 पैकी 24 जागा येतात. आणि लोकसभेच्या 17 पैकी 5. अशा या महानगरपालिकेकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं.
  • तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आणखी दोन वर्षांनी तेलंगणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका. त्यांची मोर्चेबांधणी. आणि कर्नाटक नंतर दक्षिणेत तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये हातपाय पसरायचे पक्षाचे मनसुबे आहेत.

अशावेळी हैदराबादची ही निवडणूक भाजपला तेलंगणा आणि दक्षिणेतल्या सत्तेची चावी वाटते का, तेलंगणामध्ये भाजपला आगेकूच शक्य होईल का?

मराठवाड्यातले राजकीय विश्लेषक आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अभ्यास असलेले श्रीकृष्ण उमरी बीबीसी मराठी बोलताना म्हणाले, ''दक्षिण भारतातल्या आगामी निवडणुकांसाठी भाजपची ही पायाभरणी आहे. भाजप कुठलीही निवडणूक हलक्यात लेखत नाही. ईशान्य भारताही पक्षाने प्रयत्नपूर्वक पाय रोवले. आताही केंद्रीय नेत्यांनी हैदराबादमध्ये ठाण मांडून जनतेचं म्हणणं ऐकायला आपण तिथे हजर आहोत हा संदेश लोकांना दिला आणि तेलंगणा राष्ट्र समितीबद्दल लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा फायदा घेतला.''

प्रभावहीन काँग्रेसमुळे भाजपला तेलंगणात संधी मिळाली का?

तेलंगणामध्ये निर्विवाद वर्चस्व असलेल्या केपीएस चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समिती पक्षाच्या जागा निवडणुकीत लक्षणीयरित्या कमी झाल्या आणि त्यांच्या निसटलेल्या जागा भाजपला मिळाल्यात. एमआयएमचं वर्चस्व राज्यात होतंच. भाजपची भरारी जशी लक्षणीय आहे. तसाच काँग्रेसचा पराभव सलणारा आहे. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या आहेत.

प्रभावहीन काँग्रेसमुळे भाजपला तेलंगणात संधी मिळाली का? शिवाय राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक ईव्हीएम यंत्राने न घेता मतपत्रिकेवर घेतली. त्यामुळे निकालांना उशीर झाला. पण, निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालांवर याचा काय परिणाम झाला. हेच प्रश्न आम्ही बीबीसी तेलगूचे संपादक जीएस राममोहन यांना विचारले.

"या निवडणुकीतून भाजपने राज्यातला दुसरा मोठा पक्ष म्हणून म्हणून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यापूर्वी तेलंगणा राज्यात ही जागा काँग्रेसची होती. पण, काँग्रेसच्या ढासळलेल्या कामगिरीचा फायदा उचलून भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने आपलं स्थान बळकट केलं. स्थानिक लोक, पूर आणि कोव्हिड परिस्थितीवरून टीआरएस सरकारवर नाराज होते. ती मतंही भाजपच्या बाजूने गेली. एमआयएमने आपली मतं राखली आणि टीआरएसची काही मतं भाजपला मिळाली. हा भाजपचा फायदा झाला."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)