You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबतचं वक्तव्य अजित पवारांना शांत करण्याचा प्रयत्न ?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? सुप्रिया सुळे की अजित पवार? ही चर्चा राजकीय वर्तुळात सतत रंगत असते.
अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. तर, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून, बदललेल्या राजकारणात सुप्रिया सुळे राज्यात सक्रिय दिसू लागल्यात. त्यामुळे पवार मुलीला राजकीय वारसदार बनवणार की पुतण्याला? हा प्रश्न शरद पवारांना मुलाखतीदरम्यान विचारला जातो.
सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले शरद पवार?
लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा यांच्या, सुप्रियाला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पहाता का? या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "माझ्या माहितीप्रमाणे त्यांना राज्याच्या राजकारणात रस नाही," असं वक्तव्य केलं.
"त्यांना (सुप्रिया) केंद्राच्या राजकारणात जास्त रस आहे. तिची आवड केंद्रातलं राजकारण आहे," असं शरद पवार म्हणाले.
उत्तराधिकारी कोण?
पण, त्याचवेळी शरद पवारांनंतर कोण? हा प्रश्न विचारण्यात आला, "राष्ट्रवादीत मोठ्या संख्यने तरूण नेते आहेत. जे नेतृत्व करू शकतात," असं म्हणत त्यांनी पहिलं नाव अजित पवारांचं घेतलं. त्यानंतर जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंसारखे अनेक तरूण नेते असल्याचं ते म्हणाले.
अजित पवारांचं नाव घेतलं असलं तरी, भाजपसोबत गेल्यामुळे शरद पवार अजित पवार यांच्यावर नाराज होते.
पण, राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांच्या पाश्वभूमिवर शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? हा प्रश्न उपस्थित होतो. पवार असं का म्हणाले? शरद पवारांच्या वक्तव्याचा राजकीय अन्वयार्थ काय? राजकीय विश्लेषकांच्या मते याचे दोन अर्थ असू शकतात.
एक - सुप्रिया सुळेंना खरंच राज्याच्या राजकारणात रस नाही
दोन- सुप्रिया स्पर्धा नाही असं सांगत नाराज अजित पवारांना शांत करण्याचा प्रयत्न
नाराज अजित पवारांना शांत करण्याचा प्रयत्न?
राजकीय विश्लेषकांच्या मते 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी लांबत असल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका रात्रीत सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून अजित पवार नाराज आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, पवारांचं वक्तव्य नाराज अजित पवार गटाला शांत करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगतात.
"राज्य मंत्रिमंडळात अजित पवारांचे समर्थक आहेत. त्यांच्या समर्थकांना अजित पवारांचं राजकीय भविष्य काय? याची चिंता आहे. त्यामुळे या गटाला शांत करण्यासाठी हे विधान करण्यात आलंय," असं ते पुढे म्हणतात.
शरद पवारांचा राजकीय वासरदार कोण? मुलगी का पुतण्या? ही चर्चा कायम सुरू असते. या चर्चांशी या वक्तव्याचा संबंध काय? यावर यदू जोशी सांगतात, "पार्थ पवारचा पराभव, रोहित पवारचा राजकाराणात प्रवेश. त्यात सुप्रिया सुळेंचं राज्यात महत्त्वं वाढवण्यात येईल अशी चर्चा. त्यामुळे शरद पवारांचे राजकीय वासरदार अजित पवार असतील का? ही चर्चा होत होती."
शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे, अजित पवारांचा राज्यातील मार्ग निर्धोक असल्याचे संकेत आहेत, असं ते म्हणतात.
यदू जोशींच्या मते, "याचा फायदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार अधिक समन्वयाने चालण्यास मदत होईल."
सुप्रिया दिल्लीत- राज्यात अजित
राष्ट्रवादी कॉंग्रेसचं राजकारण जवळून पहाणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सांगतात, "पवार कुटुंबात हे अलिखित ठरलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी दिल्लीत आणि अजित पवारांनी राज्याचं राजकारण सांभाळायचं."
आसबे सांगतात, "शरद पवारांनी स्वत:हून हे वक्तव्य केलं असतं तर, याला राजकीय दृष्टीने पहाता आलं असतं. सुप्रिया सुळे दिल्लीत आणि राज्यात अजित पवार हे ठरलेलं आहे. त्यामुळे हे बदलणार नाही असं पवारांनी पुन्हा स्पष्ट केलंय."
शरद पवारांनंतर राज्यात अजित पवार राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. अजित पवारांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेते आहेत.
"अजित पवारांना अनेक नेत्यांचा पाठिंबा असला तरी, शरद पवार सर्वोच्च नेते आहेत. अजित पवार नाराज होऊन भाजपसोबत गेल्यानंतरही नेते पवारांसोबतच राहिले. अजित पवारांनी एक वर्षानंतर नेत्यांचा विश्वास पुन्हा संपादन केला आहे," असं आसबे पुढे म्हणतात.
पक्षातील शंका दूर करण्याचा प्रयत्न?
महाविकास आघाडी सरकार स्थापनेत खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रिपदी पाहाण्याची इच्छा असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे अजित पवारांच्या जवळचे नेते अस्वस्थ झाले होते.
सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्यक संपादक मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "पवार घराण्यात सत्तेसाठी स्पर्धा नाही, असं त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे विधान पक्षातील शंका दूर करण्याचा प्रयत्न असावा. यापुढे या विधानात काहीच वाचण्यासारखं नाही."
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार हे शरद पवारांनंतर सर्वांत जास्त लोकप्रिय नेते आहेत. पण, शरद पवारांसमोर त्यांचा प्रभाव अजूनही कमी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
पवार दोन्ही पर्याय खुले ठेवतायत?
शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे उत्तराधिकारी कोण ही चर्चा टाळण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याचं, राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे यांच मत आहे.
"पवार केंद्रात कृषीमंत्री असताना राज्याची सूत्रं अजित पवारांच्या हातात दिली होती. आता, राज्यातील सर्व गोष्टी अजित पवारांना विचारून होताना दिसत नाहीत. याचं कारण, अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्याने शरद पवारांची नाराजी. शरद पवार, अजित पवारांना नाराजीचा इशारा देतात आणि नंतर माफ करतात," असं ते म्हणतात.
पद्मभूषण देशपांडे पुढे सांगतात, "शरद पवारांसारखा राजकारणी आपले पत्ते कधीच उघडे करणार नाही. सुप्रियांना मुख्यमंत्री करायचं असं त्यांनी ठरवलं असं नाही. पवारांनी दोन्ही पर्याय खुले ठेवले असावेत. योग्य संधी आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून ते निर्णय घेतील."
पण, गेल्या वर्षभरात सुप्रिया सुळेंचा राज्यातील राजकाणात प्रभाव वाढतोय. राज्यातील राजकारणात त्या रस घेताना दिसून येत आहेत. त्यावर बोलताना पद्मभूषण देशपांडे पुढे म्हणतात, "सुप्रिया राज्यात अॅक्टिव्ह झाल्यात. पक्षातील नेमणुकांमध्ये सक्रिय आहेत. पण, राज्याच्या संघटनेत त्यांचा थेट हस्तक्षेप नाही. कोरोनामुळे त्या महाराष्ट्रात आहेत आणि लोकांशी भेटीगाठी करून पक्ष संघटनेत रस घेतायत. मात्र, त्या पक्षाची सूत्रं मिळवण्याचा प्रयत्न करतायत, असं म्हणता येणार नाही."
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या ट्विटरवर नजर टाकली तर, त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न उपस्थित केल्याच दिसून येतंय. सुप्रिया सुळेंच्या राज्यात भेटीगाठी वाढल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)