हैदराबाद महापालिका निवडणूक : कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

हैदराबाद महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही.

हैदराबाद महापालिकेच्या एकूण 150पैकी 149 जागांचा निकाल हाती आलाय.

यामध्ये टीआरएसने 55 जागा जिंकल्या आहेत.

भाजपला 48 जागी विजय मिळालाय.

तर MIMने 44 जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेसला फक्त 2 जागी यश मिळालंय.

गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने 48 जागा जिंकत मोठा पल्ला पार केला असून हा पक्षासाठी मोठा विजय असल्याचं भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांनी म्हटलंय.

GHMC निवडणूक निकालांबद्दल शुक्रवारी (4 डिसेंबर) संध्याकाळी बीबीसीच्या प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला 100 जागा जिंकण्याची अपेक्षा होती. तितक्या जागा मिळालेल्या नसल्या तरी आमची कामगिरी चांगली आहे."

या निवडणुकीत काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्यायत.

त्यानंतर तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांनी पदाचा राजीनामा दिलाय.

GHMC मध्ये एकूण 150 जागा आहेत. या ठिकाणी सध्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हैदराबादमध्ये रोड-शो केला. तर स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांच्यासारखे केंद्रीय मंत्री हैदराबादमध्ये प्रचारासाठी गेले होते. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार तेजस्वी सूर्या यांनी आठवडाभर प्रचार केला होता.

बिहारमध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार, वरिष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्यावर पक्षाने या निवडणुकांची जबाबदारी सोपवली होती.

हैदराबाद महापालिका निवडणूक

या आधी झालेल्या महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ला 99 जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन औवैसी यांच्या एमआयएमला 44, तर भाजपच्या पदरात फक्त 4 जागा पडल्या होत्या.

सामान्यत: महापालिका निवडणूक ही स्थानिक मुद्यांवर लढली जाते. वीज, पाणी, रस्ते आणि कचरा हे पालिका निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतात. राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील मोठे नेते पालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यास, ही मोठी गोष्ट मानली जाते.

प्रादेशिक पक्षांचे अध्यक्ष प्रचारात उतरल्यास आपण समजू शकतो. पण, एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे नेते प्रचारात उतरल्यास, लक्षात येतं की या निवडणुकीत त्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)