You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर हिंदुत्ववाद आणि सेक्युलरिझमबद्दल काय म्हणतात?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाविषयी, सेक्युलरिझम-हिंदुत्ववादाच्या भूमिकांविषयी, बॉलीवुड उत्तर प्रदेशला नेण्याच्या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यांविषयी आणि 'लव्ह-जिहाद' विषयी काही राज्यांत होणाऱ्या कायद्यांबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत उत्तरं दिलं. त्यांच्या या मुलाखतीचा हा संपादित अंश..
प्रश्न: दीड वर्षांपूर्वी सेक्युलरिझमचा झेंडा घेऊन लोकसभेच्या मैदानात आला होतात. आता शिवसेनेचं भगवं शिवबंधन तुमच्या हातात आहे. का?
उर्मिला मातोंडकर : तुम्हाला माझे तेव्हाचे इंटरव्ह्यूही आठवत असतील. तेव्हाही मी हिंदू धर्माबदल श्रद्धेनंच बोलले होते आणि आजही श्रद्धेनंच बोलते आहे. 'सेक्युलर' या शब्दाचा अर्थ असा अजिबात नसतो की ती व्यक्ती म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारी, धर्मावर विश्वास न ठेवणारी, धर्माच्या विरुद्ध असणारी. किंवा हिंदुत्वाचा असा अर्थ नाही की तुम्ही हिंदू धर्मावर प्रेम करा, तमाम दुसऱ्या धर्मांच्या चिथड्या उडवा, काहीही करा. किंवा हे म्हणजेच हिंदू धर्म आणि ते म्हणजे हिंदू धर्म नाही. अत्यंत सर्वसमावेशक आणि सहिष्णु असा हिंदू धर्म आहे. त्याला वाटेल ते रुप देऊन जर कोणी काही बोललं, तर केवळ ते काही हिंदुत्व होत नाही.
कोणताही पक्ष जेव्हा सत्तेत येतो तेव्हा त्यांची कामगिरी ही अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या एका वर्षात जी कामगिरी शिवसेनेनं आणि शिवसैनिकांनी केलेली आहे ती पाहता हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण कोविडमध्ये जशी लोकांची मदत केली, काही शिवसैनिकांचे प्राणही गेले, तेव्हा त्यांनी हे बघून मदत नाही केली की हा कोणत्या जातीचा आहे वा धर्माचा आहे, प्रांताचा आहे, भाषा कोणती बोलतो. त्यांनी झटून मदत सर्वांना केली. ते करायला ज्या धर्मात सांगितलंय तो धर्म हा हिंदू धर्म आहे.
प्रश्न: तुम्ही बाळासाहेबांच्या प्रतिमेला नमन करुन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी सेक्युलरिझमबद्दल काय म्हटलं आहे, लिहिलं आहे हे सगळं जाहीर आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उर्मिला मातोंडकर : बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वावरची भाषण मी ऐकलेली आहेत, प्रबोधनकार ठाकरेंचीही ऐकलेली आहेत. आपण त्यावरही बोलू शकतो. प्रबोधनकार ठाकरेंसारखी दुसरी कोणती हिंदू व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? ते आयुष्यभर झटले आणि समाजसेवा करत करत हिंदू धर्माचं प्रबोधन त्यांनी केलं. त्यांनी त्यावेळेस हिंदू धर्म किती महान आहे हे माहिती असतांनाही हिंदू धर्मात अस्पृश्यता, हुंडाबळी, जातीव्यवस्था जी आहे त्याच्यावर सडसडून टीका केली. माझ्याकरता कर्म अधिक महत्वाचं आहे. तो ही हिंदू धर्मातच सांगितलेला आहे. तो कर्मयोग माझा लोकांना दिसेल. मी कॉंग्रेससुद्धा जेव्हा सोडली तेव्हासुद्धा
मी सांगितलं की मला लोकांसाठी काम करायचं आहे, यापूर्वीही करत आलेले आहे.
प्रश्न: तुम्हाला असं वाटतं का की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यात फरक आहे? उद्धव ठाकरेंची शिवसेना ही अधिक सेक्युलर आहे का?
उर्मिला मातोंडकर : शिवसेना वेगळी आहे असं मला वाटत नाही. पक्षाच्या भूमिकेत वेळेनुसार बदल होत असतात. अटलबिहारी वाजपेयींच्या वेळेस भाजपा हा वेगळा पक्ष होता, मोदीजींच्या काळामध्ये तो एक वेगळा पक्ष आहे. अटलजींच्या काळात वेगळ्या भूमिका घेतल्या, आज वेगळ्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कॉंग्रेस वेगळी होती, इंदिरा गांधींच्या काळात वेगळी होती. तो सामाजिक परिवर्तनाचा भाग असतो. बाकी गोष्टींवर मी बाकी राजकीय भाष्य करु इच्छित नाही, पण जे काम उद्धव ठाकरे करत आहेत ते वाखाणण्यासारखं आहे आणि त्या कामाला पुढे नेण्याचं काम मला करायला आवडेल.
प्रश्न: लोकसभा निवडणुकीचवेळेस आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलात. आता राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सूचवलेल्या नावांमध्ये आपलं नाव आलं आहे आणि आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. एखाद्या पदाच्या महत्वाकांक्षेसाठी आपण राजकारणात येत आहात का असं म्हणता येईल का?
उर्मिला मातोंडकर :तुम्हाला हे कदाचित माहित नसेल की मला हेच पद कॉंग्रेसकडूनही देण्यात आलं होतं. पण माझे कॉंग्रेस पक्षात इतर काही इश्यू असल्यामुळे, केवळ पद मिळतं आहे म्हणून त्या पक्षात परत जाणं हे मला चुकीचं वाटलं. म्हणून कॉंग्रेसची ऑफर मी स्वीकारली नाही. ही गोष्टही मी सांगितली नसती कारण मला कोणत्याही प्रकारचा अवमान, अपमान कोणत्याही पक्षाचा करण्यात तथ्य वाटत नाही. पण कॉंग्रेसकडनंच ते बाहेर आल्यामुळे ते मी सांगते आहे. पद मला तिकडंही मिळत होतं आणि इकडंही मिळतं आहे.
जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा चोवीस तासांच्या आत मला बऱ्याच मोठ्या मोठ्या पक्षांचे कॉल आले, ऑफर आल्या. विधानसभेची निवडणूक तेव्हा तोंडावर होती. आजच्या काळात अनेक मोठे नेते पक्ष सोडतात, दुसऱ्यात जातात. अगदी काही तासांमध्ये ते निर्णय होतात. याच्यापेक्षाही भयंकर विरुद्ध विचारधारेकडे जातात. पण त्यांना कदाचित प्रश्न नाही विचारले जात. ते मीडियाचे आवडते असतात. मला विचारले जातात. त्यामुळे ते जे पद आहे ते मला तिथूनही ऑफर झालं होतं. ते पद मला अजून मिळालेलं नाही आहे, त्याची केवळ शिफारस झाली आहे. जर मला त्या पदाची अपेक्षा असती आणि त्याच्या हव्यासाकरता मी आले असते, तर ते पदाकरता नाव घोषित झाल्यावर मी आले असते.
प्रश्न: शिवसेनेचा इतिहास जर पाहिला तर या पक्षात महिला नेत्या आहेत, पण हे सरकार असेल किंवा मागचं सरकार असेल, कोणी महिला मंत्री झालेलं पाहायला मिळत नाही. आपल्याला त्याबद्दल काय वाटतं?
उर्मिला मातोंडकर :तसं असलं तरीही तितकीच ताकदवान महिला आघाडी शिवसेनेमध्ये आहे. विचारा-आचारनं अत्यंत धडाडीच्या महिला नेत्या त्यांच्याकडे आहेत. तेही तितकचं महत्वाचं आहे. पण आतापर्यंत मी याच्यावर विचार केला नव्हता. मला वाटतं की यावर शिवसेनेचे इतर ज्येष्ठ नेते उत्तर चांगलं देऊ शकतील.
प्रश्न: जर तुम्ही आमदार झालात तर तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल का?
उर्मिला मातोंडकर :माझी आता सुरुवातच झाली आहे. पहिलं कामही नाही मिळालं. चुकून मिळालं तर म्हणाल की त्याच्याकरताच गेला होतात. ते पहिलं तर येऊ दे. तेव्हाचं तेव्हा पाहू.
प्रश्न: योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन गेले. जे काही ते बॉलीवूड उत्तर प्रदेशमध्ये नेण्यासंदर्भात म्हणाले, ते तुम्हाला पटतं का? तुम्ही त्याकडे कसं बघता?
उर्मिला मातोंडकर :स्वतंत्र आणि लोकशाही असलेला देश आहे आपला. कोणीही कुठंही जावं, चित्रपट बनवावे, आपले उद्योग करावेत. त्यात काहीच बंधनं नाहीत. पण मुळातच जे नातं हिंदी चित्रपटसृष्टी आणि मुंबई शहराचं आहे, ते दोन-चार चित्रपटांचं नाही आहे. हिंदी चित्रपटसृष्टी जन्माला आली मुंबईमध्ये, तिथं ती फुलली, मोठा बहारदार वृक्ष झाला. दुनियाभरात सर्वात मोठी अशी फिल्म इंडस्ट्री ती झाली या शहरामध्ये. त्यामुळे ते एक वेगळं नातं आहे. त्या काही गोष्टी दोन दिवसांमध्ये बनणा-या नसतात. त्यांना वर्षानुवर्षं लागतात. बाकी, चित्रपट तर हिंदी विदेशांतही शूट होतात, देशाच्या अनेकानेक भागांत केले जातात. त्यामुळे कोणी त्यांच्या पिक्चर कुठे करायचा असेल तर तो करावा.
प्रश्न: सध्या प्रश्न 'लव्ह-जिहाद' याबद्दलचे जे कायदे काही राज्यांमध्ये होत आहेत त्याचा चर्चिला जातो आहे. आपला आंतरधर्मीय विवाह आहे. आपलं या कायद्यांबद्दलचं मत काय आहे?
उर्मिला मातोंडकर :माझी भूमिका हीच आहे की दर वेळेस निवडणुका आल्या की हे असल्या वेगवेगळ्या गोष्टी अचानक येतात. बोलल्या जातात. या धर्मात हे आहे, त्या धर्मात हे नाही असं बोलत बसण्यापेक्षा कामाच्या मुद्द्यांवर उत्तरं द्यावीत, प्रसारमाध्यमांनी चर्चा घ्याव्यात. माझ्या मते या कायद्यामध्ये ज्या प्रकारे बायकांना दाखवण्यात येणार आहे ते चुकीचं आहे.
कारण देशाच्या घटनेनं त्या मुलीला हक्क दिलेला आहे की तिने तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करावं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कितीपत घटनेच्या चौकटी बसतात यावर खरंतर खूप विचार करावा लागेल. हा असाच उठून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचा मुद्दाच नाही आहे. घटनेत या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या बसतात का त्याच्यावर विचार करण्याची जास्त आवश्यकता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)